पैशांचा पाऊस पडलाच नाही; भोंदूबाबाने हैद्राबादच्या दोघांना लावला ११ लाखांचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 04:04 PM2019-05-10T16:04:27+5:302019-05-10T16:09:38+5:30

पैशांचा पाऊस पडून ७ कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष 

Money did not rain; fake Baba has looted a total of 11 lakhs from Hyderabad's two person | पैशांचा पाऊस पडलाच नाही; भोंदूबाबाने हैद्राबादच्या दोघांना लावला ११ लाखांचा चुना

पैशांचा पाऊस पडलाच नाही; भोंदूबाबाने हैद्राबादच्या दोघांना लावला ११ लाखांचा चुना

googlenewsNext
ठळक मुद्देसुरुवातीला विधी सुरु करण्याच्या नावाखाली २ लाख रुपये घेतले यानंतर दोघांना उरलेली रोख रक्कम आणि धनादेश घेऊन बोलावले लातूरजवळ पोलिसांनी धमकावल्याचे नाटक

औरंगाबाद : पैशांचा पाऊस पाडून तुम्हाला पाच ते सात कोटी रुपये मिळवून देतो, असे आमिष दाखवून हैदराबादच्या दोघांची औरंगाबादेतील भोंदूबाबाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने ११ लाखांची फसवणूक केली. हा प्रकार ४ मे रोजी घडला. भोंदूबाबाने मागणी केलेले पैसे देऊनही पैशांचा पाऊस तर पडला नाहीच; पण दोघांना लाखोंचा चुना लागला.

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या हैदराबाद येथील डी. सत्यनारायण आणि त्यांचे मित्र सय्यद जहांगीर सय्यद अब्दुल अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत. सत्यनारायण हे चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये मॅकेनिक म्हणून आठ ते दहा वर्षांपासून काम करतात. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक अडचणीत असल्याने त्यांनी त्यांचा मित्र सय्यद जहांगीर याला सांगितले होते. जहांगीरच्या ओळखीचा सुरेश खत्री याने औरंगाबादेतील साहेब खान यासीन खान पठाण ऊर्फ सत्तार बाबा हा खूप करामती आहे. तो तुमची परेशानी २५ लाख रुपयांत दूर करू शकतो, असे तीन वर्षांपासून सांगत होता. यानंतर त्यांचे औरंगाबादेतील साहेब खानशी मोबाईलवर बोलणे झाले. तेव्हा त्याने २५ लाख रुपये औषधांसाठी लागतात. ही रक्कम तुम्ही दिल्यास तुम्हाला पाच ते सात कोटी रुपये देतो, असे सांगितले. एवढे पैसे नसल्याचे दोन्ही मित्रांनी त्यास सांगितले.

साहेब खानच्या सांगण्यावरून फेब्रुवारी महिन्यात दोन्ही मित्र औरंगाबादेत आले आणि जळगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले. तेव्हा तेथे साहेब खान आला. तेव्हाही दोन्ही मित्रांनी त्यांच्याकडे एवढे पैसे नसल्याचे सांगितले. त्यावेळी तुम्ही किती देऊ शकता, असे विचारले असता त्यांनी त्यांना दोन लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यावेळी तो म्हणाला की, दोन लाख रुपये द्या, मी विधी सुरू करतो. त्याच्यावर विश्वास ठेवून दोन्ही मित्रांनी त्यास दोन लाख रुपये दिले. दरम्यान, साहेब खानने त्यांच्याशी संपर्क साधला असता तेव्हा त्यांच्याकडे केवळ साडेसहा लाख रुपये जमा झाल्याचे सांगितले. तेव्हा ही रक्कम आणि दोन चेक घेऊन औरंगाबादेत बोलावले. ४ मे रोजी सय्यद जहांगीर आणि डी. सत्यनारायण शहरात आले आणि जळगाव रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये थांबले. तेथे साहेब खान आला. 

दोघांना कारमधून नेले लातूरकडे
लातूरकडे साहेब खान ऊर्फ सत्तार बाबाने ४ मे रोजी हॉटेलमध्ये सय्यद जहांगीर आणि डी. सत्यनारायण यांच्याकडून साडेसहा लाख रुपये आणि अडीच लाखांचे दोन धनादेश घेतले. यानंतर ४ वाजेच्या सुमारास तो स्वत:च्या कारमध्ये सय्यद आणि डी. सत्यनारायण यांना बसवून हैदराबादकडे निघाला. औरंगाबादपासून शंभर ते दीडशे किलोमीटरवर रस्त्यात आपल्याला विधीसाठी लागणारे औषध मिळणार असल्याचे म्हणाला. त्यानुसार त्याने रस्त्यात पेट्रोलपंपाजवळ कार थांबविली. त्यानंतर त्याच्या ओळखीचा एक जण तेथे आला आणि त्याने औषधाच्या दोन-तीन बाटल्या साहेब खानला दिल्या. साहेब खानने साडेसहा लाखांच्या रोकडपैकी काही रक्कम त्याला दिली. त्यानंतर तो त्यांना म्हणाला की, आता सर्व साहित्य आले आहे. आता आपण हैदराबादला जाऊ आणि तुमचा विधी करू, असे म्हणून पुढील प्रवासाला निघाले. 

पोलिसांनी धमकावले
लातूरपासून काही अंतरावर ते असताना साहेब खानने पुन्हा कार थांबविली. त्याचवेळी पोलिसांची गाडी तेथे आली. यावेळी एक जण पोलिसांच्या युनिफॉर्मवर होता, तर अन्य तिघे सिव्हिल ड्रेसवर. तेव्हा त्यांनी त्यांच्याजवळ येऊन तुम्ही कोण आहात, येथे काय करता, असे विचारले. त्यावेळी घाबरलेल्या सत्यनारायण आणि जहांगीर यांनी त्यांना साहेब खानची लिफ्ट घेतल्याचे खोटे सांगितले. साहेब खानजवळील पिशवीत औषधाच्या बाटल्या, लिंबू, पांढरे दगड, अगरबत्ती आदी वस्तू पाहून तुम्ही जादूटोणा करता क ा, असे ओरडून साहेब खानवर एका पोलिसाने लाठी उगारली. यावेळी एक  पोलीस कर्मचारी कारमध्ये बसून साहेब खानला पोलीस ठाण्यात चल, असे म्हणून घेऊन गेला, तर इतर पोलिसांनी त्याच्या जीपमध्ये सत्यनारायण आणि जहांगीर यांना बसविले आणि काही अंतरावर नेल्यांनतर उतरवून देत एका एस.टी. बसमध्ये बसवून दिले.  

दगाबाजी झाल्याचे लक्षात येताच आले औरंगाबादला
साहेब खानने आपल्यासोबत दगाबाजी केल्याचे लक्षात येताच सत्यनारायण आणि जहांगीर हे पहाटे पाच वाजेच्या सुमारास एस.टी. बसने औरंगाबादेत परतले. त्यानंतर त्यांनी साहेब खानचे घर गाठले. मात्र, तो घरी नसल्याचे त्याच्या मुलाने त्यांना सांगितले. मात्र, औषधी बाटल्या देण्यासाठी रस्त्यात हाच तरुण आला होता, हे दोन्ही मित्रांच्या लक्षात आले. यानंतर साहेब खानविरोधात तक्रार देण्यासाठी ते सिडको ठाण्यात गेले; परंतु ९ मेपर्यंत त्यांचा अर्जच घेण्यात आला नाही. आज त्यांचा अर्ज घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली.

Web Title: Money did not rain; fake Baba has looted a total of 11 lakhs from Hyderabad's two person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.