Minor boy stabbed one of the cottages and murdered in Aurangabad | कानाखाली मारल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने एकाचा कैचीने भोसकून केला खून
कानाखाली मारल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने एकाचा कैचीने भोसकून केला खून

औरंगाबाद: भाडेकरूंना का त्रास देतो, असा जाब विचारत कानाखाली मारल्यामुळे संतप्त झालेल्या १७ वर्षीय मुलाने (विधीसंघर्षग्रस्त बालक) एका जणाला धारदार कैचीने सपासप भोसकून खून केला. ही खळबळजनक घटना शनिवारी(दि. १२)रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास किराडपुरा परिसरातील रहेमानिया कॉलनी येथील एका हॉटेलजवळ घडली. या घटनेनंतर किराडपुऱ्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

समद खान अहेमद खान (वय ४०,रा. कैसर कॉलनी,)असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याविषयी जिन्सी पोलिसांनी सांगितले की, समद यांच्या मालकीची रहेमानिया कॉलनीत दोन मजली इमारत आहे. तळमजल्यावर दुकानाचा गाळा आहे.असून तो त्यांनी चायनिज हॉटेल चालकास भाड्याने दिला आहे. शिवाय वरच्या मजल्यावर चार ते पाच भाडेकरू राहतात. त्यांच्या भाडेकरूंनाना परिसरातील अल्पवयीन तरूण समीर (नाव बदलले)नेहमी  येता-जाता शिवीगाळ करतो,  त्यांच्या घरात घुसतो, असे समद यांच्या कानावर आले होते. त्यामुळे समद यांनी काही दिवसापूर्वी समीरची समजूत काढली होती.

मात्र, त्यानंतरही समीरकडून समद यांच्या भाडेकरूंना त्रास देणे सुरूच होते. समदखान हे आज शनिवारी दुपारी भाडेकरूंकडे किरायाचे पैसे घेण्यासाठी आले असता. समीरकडून होणारा त्रास कमी होण्याऐवजी वाढल्याचे भाडेकरूंनी त्यांना सांगितले. समीर येण्या-जाण्याच्या रस्त्यात बसून गांजा पित बसतो, यामुळे महिला आणि लहान मुलांना त्याचा त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले होते. समीरला पुन्हा समज देतो, असे भाडेकरूंना सांगून ते इमारतीतून खाली आले. तेव्हा रस्त्यातच त्यांना समीर बसलेला दिसला. तु भाडेकरूंना का त्रास देतो, असे समद यांनी समीरला खडसावून विचारले. तेव्हा समीरने त्यांना उलट उत्तर दिले. यामुळे संतप्त समद यांनी समीरच्या कानाखाली मारली. 

कानाखाली मारल्यानंतर समीर हा घाबरून निघून जाईल, असे त्यांना वाटले आणि  घरी जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर पायी जाऊ लागले.  समद यांनी मारल्याचा प्रचंड राग समीरला आल्याने गल्लीत समोरच असलेल्या टेलरच्या दुकानात तो घुसला आणि तेथे पडलेली कपडे कापण्याची धारदार आणि अनकुचीदार कैची उचलली.  हॉटेलच्या भिंतीलगतच समद यांना गाठून समीरने त्यांच्यावर कैचीने सपासप अनेक वार केले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या समद यांना प्रत्यक्षदर्शींनी रूग्णवाहिकेतून घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी समद यांना तपासून मृत घोषित केले. 


Web Title: Minor boy stabbed one of the cottages and murdered in Aurangabad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.