दख्खनचे सुभेदार महाराजा करणसिंहाचे स्मारक दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 06:32 PM2019-05-07T18:32:30+5:302019-05-07T18:33:12+5:30

खाम नदीच्या पश्चिमी काठावरील विद्यमान गोलवाडीच्या शिवारात बादशहा औरंगजेबाचा दख्खणचा सुभेदार महाराजा करणसिंह चिरनिद्रा घेत आहेत. इतिहासाच्या या खाणाखुणा उपेक्षित आहेत. 

The memorial of Deccan's governor, Maharaja Karan Singh, was neglected | दख्खनचे सुभेदार महाराजा करणसिंहाचे स्मारक दुर्लक्षित

दख्खनचे सुभेदार महाराजा करणसिंहाचे स्मारक दुर्लक्षित

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर

कर्णपुरा परिसर ज्यांच्या नावाने ओळखला जातो ते बिकानेरचे महाराजा करणसिंह. इ.स.१६६९ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर आताच्या गोलवाडी परिसरात  त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले, तेथे छत्री उभारण्यात आली. शहराच्या इतिहासाची साक्षीदार असलेल्या छत्रीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या छत्रीचे माहात्म्य कोणालाच माहीत नाही. 

औरंगजेब बादशहाने बिकानेरचे महाराजा करणसिंह यांना दख्खनचे सेनाप्रमुख म्हणून नेमले होते. औरंगाबादेतील खाम नदीच्या पूर्वेस कर्णपुरा गाव वसवून  करणसिंह सैन्यासह तेथे राहत होते. तेथे त्यांनी ‘राजाचा महाल’ आणि ‘राणीचा महाल’म्हणून ओळखले जाणारे दोन महालही उभारले होते. या महालालगतच महाराजांनी आपले कुलदैवत (राठोड राजपुतांचे कुलदैवत) ‘श्री करणी देवी’चे मंदिर १६६० ला स्थापन केले. या देवीलाच भाविक  कुणी ‘तुळजाभवानी’ तर कुणी ‘कर्णपुरा देवी’ म्हणून ओळखतात.

महाराजा करणसिंहांचे सैनिक देवीचे दर्शन घेऊन, शस्त्रपूजा करून सीमोल्लंघन करीत असत. कर्णपुऱ्यातील सीमोल्लंघनाची ही परंपरा आजमितीपर्यंत सुरूआहे. मंदिराचे संस्थापक  महाराजा करणसिंहांचा जन्म १० जुलै १६१६ ला झाला होता. दख्खनचे सेनाप्रमुख म्हणून नेमणुकीनंतर त्यांनी कर्णपुरा, केसरसिंहपुरा आणि पद्यपुरा (पदमपुरा) नावाची तीन गावे वसविली होती. जी आज औरंगाबाद शहरातील वसाहती म्हणून ओळखल्या जातात.

तत्कालीन इंग्रज सरकार आणि महाराजांच्या वारसांमध्ये करार होऊन ब्रिटिश सरकारने बिकानेर सीमेलगतची बाबलरास आणि रतनखेरा ही दोन गावे महाराजांच्या वारसांना देऊन त्याच्या बदल्यात कर्णपुरा, केसरसिंहपुरा आणि पदमपुरा १९०४ साली ब्रिटिशांनी घेतले होते. आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे २२ जून १६६९ पर्यंत महाराजा करणसिंह  कर्णपुऱ्यातच राहत होते. त्यावेळी ‘चुरू’चे  ठाकूर कुशलसिंह कर्णपुऱ्यातच होते. त्यांनीच करणसिंहाचा अंत्यविधी केला.

गोलवाडी परिसरात जेथे अंत्यविधी करण्यात आला त्याठिकाणी करणसिंह महाराजांचे स्मारक म्हणून दगडी छत्री बांधण्यात आली. सुमारे १५ फूट उंचीची ही गोलाकार छत्री आज एकटीच उभी आहे. या छत्रीच्या ओट्याचा काही भाग आता पडू लागला आहे. चारीबाजूने गवत वाढले आहे. रस्त्यापासून आत एका शेतात कोपऱ्यात ही छत्री असल्याने तेथपर्यंत सहजासहजी कुणी जात नसल्यामुळे ती अजून टिकून आहे. पुरातत्व विभागालाही या छत्रीची माहिती नसावी. कारण, शहरात व आसपासच्या परिसरात अशा राजा, महाराजांच्या अनेक छत्र्या आहेत. त्या  आता शेवटच्या घटका मोजत आहेत. 

Web Title: The memorial of Deccan's governor, Maharaja Karan Singh, was neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.