मराठवाड्यात अवकाळी पावसाचे तांडव; पाच जणांचा वीज पडून मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 01:57 PM2019-04-17T13:57:17+5:302019-04-17T14:03:54+5:30

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रबी पिकांसह घरांचेही नुकसान झाले आहे.

Marathwada rainy days incessantly; Five people die of electricity! | मराठवाड्यात अवकाळी पावसाचे तांडव; पाच जणांचा वीज पडून मृत्यू!

मराठवाड्यात अवकाळी पावसाचे तांडव; पाच जणांचा वीज पडून मृत्यू!

googlenewsNext

औरंगाबाद : अवकाळी पावसाने मराठवाड्यात तांडवच घातले आहे. सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसामुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. परभणी, बीड, नांदेड जिल्ह्यात पाच जणांचा वीज पडून मृत्यू झाला. तर ३९ शेळ्या-मेंढ्यासह तीन जनावरे दगावली आहेत. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रबी पिकांसह घरांचेही नुकसान झाले आहे.

भोकर, कंधारमध्ये दोन ठार
नांदेड शहर व जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला़ या पावसाने आंबा, केळी पिकांचे नुकसान झाले़ त्याचवेळी अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले़ भोकर आणि कंधार तालुक्यात वीज पडून दोन जण मरण पावले.
मंगळवारी सायंकाळी ५ वाजता पाऊस सुरु झाला़ वाऱ्यांबरोबर पावसाचा जोर वाढत गेला़ पाऊण तास पाऊस झाला़ दरम्यान, भोकर येथे दासा गणेश उपाटे (वय ४२, रा़बारड) यांचा वीज पडून मृत्यू झाला़ तर नावंद्याचीवाडी (ता.कंधार) येथील अनिताबाई व्यंकटी केंद्रे (वय ४५) या शेतात चारा आणायला गेल्या होत्या. वीज कोसळून त्या भाजल्या. त्यांना कंधारच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुसऱ्या एका घटनेत गजानन केंद्रे हा जखमी झाला़ कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ़अरविंद फिसके व पार्वती वाघमारे यांनी उपचार करून त्याला नांदेड येथे हलविले़ तसेच जिल्ह्यात नायगाव, लोहा, भोकर, नरसी, मुदखेड तालुक्यात पाऊस झाला़ ग्रामीण भागात घरांवरील पत्रे उडाले़ रस्त्यावरील वृक्षही उन्मळून पडले़ नांदेड शहरातही पाऊस सुरु होताच वीजपुरवठा ठप्प झाला़ 

झाडाचा आसरा घेणे ह्यत्यांच्याह्ण जिवावर बेतले
विजांचा कडकडाट झाला अन् अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. म्हणून तिघे मेंढपाळ मेंढ्यासह लिंबाच्या झाडाच्या आसऱ्याला गेले. तिथेच घात झाला. त्याच झाडावर वीज पडून दोन मेंढपाळ जागीच ठार झाले, तर एक जण जखमी झाला आहे. शिवाय ३९ शेळ्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. ही घटना १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पाथरी तालुक्यातील अंधापुरी येथे घडली. 
बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील सुरनवाडी येथील ३०० मेंढ्या आणि ५७ शेळ्यांचा कळप मागील तीन महिन्यांपासून पाथरी तालुक्यातील अंधापुरी शिवारात दाखल झाला होता. या मेंढ्यांचा सांभाळ करण्यासाठी ६ जण, तर शेळ्यांचा सांभाळ करण्यासाठी तीन जण आले होते. १५ एप्रिल रोजी अंधापुरी येथील शेतकरी चंद्रकांत मोरे यांच्या शेतात पिण्याच्या पाण्याची सोय असल्याने ते या भागात रमले. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अंधापुरी परिसरात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. या पावसापासून बचाव करण्यासाठी तीन मेंढपाळांनी शेळ्या-मेंढ्यासह शेतातील लिंबाच्या झाडाचा सहारा घेतला. ते झाडाखाली थांबले असता काही क्षणातच या झाडावर वीज कोसळली. त्यामध्ये लिंबाजी सीताराम काळे (३५) व कृष्णा रामभाऊ शिंदे (१७) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रामभाऊ साधू शिंदे हे जखमी झाले. यावेळी ५७ पैकी ३९ शेळ्यांचाही मृत्यू झाला. याबाबतची माहिती अन्य शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर जखमी रामभाऊ शिंदे यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तर दोन्ही मयतांचे मृतदेह पाथरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मंगळवारी शवविच्छेदन करुन दोघांचे मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. 

बीडमध्ये एक ठार
बीड जिल्ह्यात मंगळवारीदेखील काही तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. धारूर तालुक्यातील हसनाबाद, कोळपिंप्री, पांगरी, आवरगाव परिसरात गारांसह पाऊस झाला. सोमवारी रात्री  देवदहीफळ येथे वीज पडून एक जण ठार झाला. गेवराई तालुक्यातील भोगलगाव शिवारात सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान टरबुजाच्या शेतात काम करणाऱ्या अंजना दत्तात्रय लिंबुरे ( वय ३१) या महिलेच्या अंगावर वीज पडली. त्यांच्यावर सध्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सेनगावात मोबाईल मनोरा कोसळला
सेनगाव (जि.हिंगोली) येथील २५० फूट उंच बीएसएनएलचा मनोरा मंगळवारी झालेल्या वादळी पावसाने कोळसला. या मनोऱ्याखाली चार घरे, दोन जनावरे व एक चारचाकी वाहनही दबली आहेत. या घटनेत अशोक कांबळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर घरातील आठ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. 
अशोक कांबळे, सुनील रणबावळे, दीपक आठवले व अन्य एकजण यांच्या घराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या जीवितहानी झाली नाही. हा मनोरा जुन्या ग्रामीण रूग्णालयाच्या दिशेने पडला. मागील अनेक वर्षांपासून या धोकादायक मनोऱ्याची साधी दुरूस्तीही करण्यात आली नव्हती. घटनेनंतर तास उलटला तरी प्रशासन घटनास्थळी आले नव्हते. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात वादळी वारा व विजेच्या कडकडटांसह १६ एप्रिल रोजी पुन्हा अवकाळी पाऊस झाला.  वसमत तालुक्यातील कौठा येथे वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला. दोन दिवसांपासून कौठा येथे वीज अखंडित आहे. कळमनुरीतही विजेच्या कडकडाटांसह वादळी वारे होते.  हळद व गव्हाचे नुकसान झाले आहे.

Web Title: Marathwada rainy days incessantly; Five people die of electricity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.