मराठवाडा कोरडाच; काही जिल्ह्यांत पावसाची तुरळक हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 03:59 PM2019-07-09T15:59:08+5:302019-07-09T16:02:56+5:30

अनेक ठिकाणच्या पेरण्या रखडल्या 

Marathwada looking for heavy rain ; Short rains in some districts | मराठवाडा कोरडाच; काही जिल्ह्यांत पावसाची तुरळक हजेरी

मराठवाडा कोरडाच; काही जिल्ह्यांत पावसाची तुरळक हजेरी

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वदूर पावसाची आवश्यकतानांदेड, परभणी हे दोन जिल्हे सोडले तर बाकी ठिकाणी तुरळक पाऊस झाला.

हिंगोली/बीड/जालना/लातूर/उस्मानाबाद : मराठवाडा अजूनही कोरडाच असून सोमवारी काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम  प्रकारचा पाऊस झाला. मराठवाड्यात अद्यापही सर्वदूर पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून पेरण्या रखडल्या आहेत. सोमवारी नांदेड, परभणी हे दोन जिल्हे सोडले तर बाकी ठिकाणी तुरळक पाऊस झाला. 

हिंगोली : जिल्ह्यात ८ जुलै रोजी काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. जिल्ह्यात सकळापासूनच ढगाळ वातावरण होते. अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. हिंगोली शहरात सोमवारी सायंकाळी ६ वाजता जवळपास दोन तास दमदार सरी बरसल्या. तर नर्सी नामदेव, कनेरगाव नाका येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, वारंगा फाटा, पोत्रा परिसरातही चांगला पाऊस झाला. वसमत तालुक्यातील अडगाव रंजे, हट्टा, कौठा परिसरात काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. सेनगाव शहरासह कडोळी येथे जोरदार पाऊस झाला. औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार, हट्टा  येथेही हलक्या सरी बरसल्या. तसेच सवना, बासंबा व कळमनुरी, नांदापूर या ठिकाणी पाऊस झाला. बहुतांश भागात शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहे. 

जालना : शहरासह भोकरदन भोकरदन तालुक्यातील पारध व  परिसरात सोमवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे  पसिरातील नदी -नाले ओथंबून वाहिले. दरम्यान पारध जवळील पद्मावती धरणाचा पाणीसाठा ९५ टक्यांपर्यंत पोहोचला होता. रात्री असाच पाऊस सुरू राहिल्यास हे धरण भरणार असल्याचे पाटबंधारे विभागातील सूत्रांनी सांगितले. अंबड तालुक्यातील शहागड परिसरातही सोमवारी दुपारी बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. जालना शहरातही सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातील धामणा धरणाच्या सांडव्यातून अद्यापही पाणी वाहत आहे. धरण फुटण्याची भीती मात्र, ओसरल्याचे सांगण्यात आले. 


लातूर : गेल्या आठ दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या पावसाने सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लातूर शहरात हजेरी लावली़ रिमझिम झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली़ पावसाळा सुरू झाल्यापासून अद्याप एकदाही जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला नाही़ त्यामुळे अजूनही खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत़ केवळ दहा टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत़ सोमवारी सायंकाळी शहरातील पाच नंबर चौक, हरंगुळ, वरवंटी, खाडगाव आदी भागात जवळपास तासभर पाऊस झाला़ उदगीर तालुक्यातील वाढवणा, सुकणी, उमरगा, किनी यल्लादेवी, येरोळ, आदी भागात रिमझिम पाऊस झाला आहे़ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पेरणीची चिंता लागली आहे़ 

उस्मानाबाद : जिल्ह्यात अद्याप एकही मोठा पाऊस झालेला नाही़ मात्र, मागील काही दिवसांपासून नियमित रिमझिम पाऊस सुरु झाला आहे़ तीन दिवसांपासून कधी दुपारी तर कधी सायंकाळी हलक्या सरी बरसत आहेत़ सोमवारीही दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद शहर व परिसरात हलक्या सरी बरसल्या़ याशिवाय, तडवळा, येडशी, तेर भागातही  रिमझिम पाऊस झाला़ 

बीड : यावर्षी म्हणावा तसा पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. जिल्ह्यातील सर्व ६३ महसूल मंडळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर अनेक ठिकाणच्या पेरण्या बाकी आहेत. ज्या ठिकाणी पेरणी व कापूस लागवड झाली आहे, त्या ठिकाणी येत्या दोन दिवसात पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. पावसाने दडी मारल्यामुळे चारा, पाण्याचे संकट कायम आहे. 

Web Title: Marathwada looking for heavy rain ; Short rains in some districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.