साहित्य प्रसारासाठी मराठी प्रकाशन संस्थांची डिजिटल वाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:50 AM2018-05-18T00:50:22+5:302018-05-18T01:11:19+5:30

सोशल माध्यमांनी समाजमनावर कब्जा मिळविल्यानंतर प्रत्येक क्षेत्र त्यानुसार स्वत:ला बदलून घेत आहे. मराठी प्रकाशन जगतानेही सोशल मीडियावरील वाचकांवर लक्ष केंद्रित केले असून, साहित्यातील जुन्या आणि नवीन पुस्तकांच्या परिचयासाठी डिजिटल वाट चोखाळली आहे. पुस्तकाचा आशय, समर्पक चित्रे, निवेदन आणि संगीत, अशा नावीन्यपूर्ण माध्यमातून वाचकांपर्यत पोहोचत आहे.

Marathi publishing houses for digital promotion of literature! | साहित्य प्रसारासाठी मराठी प्रकाशन संस्थांची डिजिटल वाट!

साहित्य प्रसारासाठी मराठी प्रकाशन संस्थांची डिजिटल वाट!

googlenewsNext
ठळक मुद्दे सोशल मीडियावर पुस्तकांची संगीतमय ओळख

भागवत हिरेकर 
लोकमत न्यूज नेटवर्क 

औरंगाबाद : सोशल माध्यमांनी समाजमनावर कब्जा मिळविल्यानंतर प्रत्येक क्षेत्र त्यानुसार स्वत:ला बदलून घेत आहे. मराठी प्रकाशन जगतानेही सोशल मीडियावरील वाचकांवर लक्ष केंद्रित केले असून, साहित्यातील जुन्या आणि नवीन पुस्तकांच्या परिचयासाठी डिजिटल वाट चोखाळली आहे. पुस्तकाचा आशय, समर्पक चित्रे, निवेदन आणि संगीत, अशा नावीन्यपूर्ण माध्यमातून वाचकांपर्यत पोहोचत आहे.
इंटरनेट आणि सोशल माध्यमांवर वावरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ‘सोशल’ झालेल्या नवीन आणि जुन्या वाचकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मराठी साहित्य विश्वातील प्रकाशन संस्थांनी पारंपरिक मार्गाबरोबरच सोशल मीडियाशीही मैत्री केली आहे. यातून पुस्तकांचा आशय प्रभावीपणे मांडण्यासाठी दृकश्राव्य पद्धतीने चित्रफिती तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे यात जुन्या आणि नवीन साहित्यकृतींबरोबर लहान मुलांच्या गोष्टींच्या पुस्तकांचाही समावेश केला आहे.
निवेदन, संगीत आणि कार्टून्स...
प्रकाशकांच्या नव्या प्रचारतंत्रामुळे वाचकांना पुस्तकात असलेली गोष्ट समजून घेण्यासाठी पाठीमागच्या पानावरचा मजकूरही वाचण्याची गरज राहिलेली नाही. कारण पुस्तकातील मजकूर निवेदन शैलीत असून, पुस्तकाच्या आशयानुसार छायाचित्रे, त्याचप्रमाणे संगीत आणि कार्टून्सचाही वापर केलेला आहे. त्यामुळे पुस्तकाचा परिचय करून देणा-या या एक-दोन मिनिटांच्या चित्रफिती आता परिणामकारक ठरत आहेत.
म्हणून नेटक-यांकडे मोर्चा
देशातील साक्षरता वाढत असून, नेल्सन इंडियाच्या २०१५ अहवालानुसार २०२० पर्यंत भारतातील साक्षरता ९० टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. तर दुसरीकडे देशातील मोबाईल इंटरनेट वापरणा-यांची संख्या जून २०१८ पर्यंत ४७८ मिलियन इतकी होणार आहे. इंटरनेट अ‍ॅण्ड मोबाईल असोसिएशन आॅफ इंडियाने आपल्या अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे. साक्षरता आणि इंटरनेट दोन्ही गोष्टींमुळे आता दुकाने अथवा पुस्तक प्रदर्शनातून पुस्तक खरेदी करणारा वाचक आता आॅनलाईनही पुस्तक खरेदी करू लागला आहे. अशा इंटरनेटवर अधिक काळ राहणा-या वाचकांपर्यंत प्रकाशित साहित्य पोहोचवण्यासाठी मराठी प्रकाशन संस्थांनीही आता डिजिटल मार्ग जवळ केला आहे.

पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी नव्या पद्धतीने सोशल मीडियावर हा प्रयोग केला आहे. सिनेमाप्रमाणे पुस्तकाचा टीझर अशी कल्पना आहे. त्यामुळे पुस्तकाविषयी चर्चा होत आहे. वाचक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. पुस्तकाचा ट्रेलर ही कल्पना परिणामकारक ठरते. वाचकांचा चांगला प्रतिसाद याला मिळत आहे. 
सदानंद बोरसे, संपादक, राजहंस प्रकाशन
---
सकारात्मकपणे बघायला हवे
डिजिटालायझेशमुळे प्रकाशकांना वेगवेगळे प्रयोग करावे, असं वाटत आहे. गेल्या दोन वर्षात पुस्तकांची विक्री घटली आहे. पुर्वी इतर साहित्याबरोबर कांदबरी साहित्य प्रकाराचा एक वाचकवर्ग होता. तोही अलीकडे कमी झाला आहे. त्यामुळे काळजी करावी अशीच परिस्थिती आहे. काही वर्षांपूर्वी रशियात पुस्तकांचा खप कमी झाला होता. त्यानंतर ई-बुक मोफत टाकली. मग आवडलेले पुस्तक वाचक विकत घेऊ लागला. त्याअंगाने या प्रयत्नाकडे पाहायला हवे. आता हा नवीन प्रयोग प्रकाशन संस्था करत आहेत. त्याचा लगेच परिणाम दिसणार नाही. यातून चांगले होईल. पण सकारात्मक अंगाने त्याकडे बघायला हवे.
बाबा भांड, अध्यक्ष, राज्य साहित्य संस्कृती मंडळ

Web Title: Marathi publishing houses for digital promotion of literature!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.