बकोरियांची पाठ फिरताच महावितरणची घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 08:41 PM2019-07-06T20:41:45+5:302019-07-06T20:45:08+5:30

सहव्यवस्थापक संचालकपदी ‘आयएएस’ दर्जाचा अधिकारी हवा

Mahavitaran's administration disturbed after bakoriya leave in Aurangabad | बकोरियांची पाठ फिरताच महावितरणची घडी विस्कटली

बकोरियांची पाठ फिरताच महावितरणची घडी विस्कटली

googlenewsNext

औरंगाबाद : महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांची दीड महिन्यापूर्वी बदली झाल्यानंतर शहरातील महावितरणची सेवा ढेपाळली आहे. शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, ग्राहकांच्या तक्रारी ऐकून न घेणे, चुकीची बिले अदा करणे, अभियंते- कर्मचाऱ्यांची मनमानी वाढणे, बदली केलेल्या कामचुकार अभियंते- कर्मचाऱ्यांना पुन्हा शहरात सोयीच्या ठिकाणी पदस्थापना देण्याचे प्रकार वाढले आहेत. 

दोन वर्षांपूर्वी महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी ओम प्रकाश बकोरिया यांची नेमणूक झाली. सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी कामचुकार अभियंते- कर्मचाऱ्यांवर कारवाईचा दंडुका उगारला. त्यामुळे महावितरणच्या कारभाराला बरीच शिस्त आली होती. दोन वर्षांत शहराच्या वीज वितरण सेवेत आमूलाग्र सुधारणा झाल्या होत्या. आता किरकोळ पावसातही वीजपुरवठा खंडित होत आहे. महावितरणने केलेल्या मान्सूनपूर्व कामांचे पितळ महिनाभरातच उघडे पडले. पाऊस नसतानाही अनेक वसाहतींमध्ये रोज रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज ग्राहक यासंबंधी अभियंत्यांना फोन करतात; परंतु अभियंते किंवा कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. 

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. याप्रकरणी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी कार्यकारी अभियंत्यास निलंबित केले. मात्र, त्यानंतरही फारशी परिस्थिती सुधारलेली नाही. सातत्याने याठिकाणचा वीजपुरवठा खंडित होत आहे. महावितरणने केंद्रीय वीज बिल प्रणाली स्वीकारली आहे. यामुळे अचूक व वेळेवर वीज बिल मिळेल, असा दावा कंपनीने केला होता. मात्र, स्थानिक प्रशासनाने या ग्राहकोपयोगी प्रणालीलाच हरताळ फासला आहे. चुकीचे मीटर रीडिंग अथवा रीडिंग न घेताच ग्राहकांना बिले मिळत आहेत. यावर मीटर रीडिंग एजन्सीवर कडक कारवाई करण्यात महावितरण हयगय करीत आहे. अनेक भागांत ग्राहकांना वेळेवर बिल मिळत नाही, त्यामुळे ग्राहकांना लेट पेमेंटचा भुर्दंड बसत आहे. चुकीच्या रीडिंगबाबत महावितरण फेरपडताळणी करण्याचा देखावा करीत आहे. मात्र त्यातूनही ठोस काही निष्पन्न होत नसल्याने ग्राहक संतापले आहेत. 

वरिष्ठांचे नियंत्रण राहिले नाही
बकोरिया यांच्या कार्यप्रणालीमुळे अनेक अभियंत्यांचे हितसंबंध दुखावले गेले. अनेक संघटनांनी त्यांच्या बदलीसाठी जोर लावला होता. अखेर मेमध्ये त्यांची बदली झाली. ही बातमी समजताच काही अभियंत्यांनी दौलताबादजवळील एका हॉटेलमध्ये मोठा जल्लोषही केला होता. त्यात मराठवाड्यातील बऱ्याच वरिष्ठ अभियंत्यांनी हजेरी लावली होती. बदली झाल्यानंतर ते तात्काळ कार्यमुक्त झाले. मात्र, त्यानंतर अभियंते व कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांचे नियंत्रण राहिलेले नसल्यामुळे ते कुणालाही जुमानत नसल्याचे सध्याचे चित्र अनुभवास येत आहे.

Web Title: Mahavitaran's administration disturbed after bakoriya leave in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.