Maharashtra's team in the final round | महाराष्ट्राचा संघ अंतिम फेरीत
महाराष्ट्राचा संघ अंतिम फेरीत

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे आयोजित अखिल भारतीय टी २0 दिव्यांग चषक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने आज झालेल्या उपांत्य फेरीत आंध्र प्रदेशचा ३५ धावांनी पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. महाराष्ट्राची विजेतेपदाची गाठ उद्या राजस्थान संघाविरुद्ध पडणार आहे.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ९ बाद १५६ धावा केल्या. महाराष्ट्राकडून अभिलेष लोखंडे याने ४६ चेंडूंत ७ चौकारांसह ५२ व ज्योतीराम घुले याने २४ चेंडूंत ५ चौकारांसह ३४ धावा केल्या. जुनैद नेहरीने १८ व राहुल शिवरकर याने १३ धावा केल्या. आंध्र प्रदेशकडून सुरेंद्र याने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात आंध्र प्रदेशचा संघ १८.४ षटकांत १२१ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून व्हीसीएम रेड्डीने ४२ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा करीत एकाकी झुंज दिली. नवीन याने २३ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्रकडून डी. जाधव याने २२ धावांत २ व विकी रणदिवे याने १६ धावांत ३ गडी बाद केले. दुसऱ्या उपांत्य फेरीत राजस्थानने तेलंगणा संघाचा ८0 धावांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. राजस्थानने प्रथम फलंदाजी करीत १९.४ षटकांत १६२ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून सुरेशने ५६ व नाज याने ४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात तेलंगणाचा संघ १५ षटकांत ८२ धावांत गारद झाला. उद्या सकाळी ८.३0 वा. महाराष्ट्र व राजस्थान यांच्यात अंतिम सामना रंगणार असल्याचे आयोजन समितीतर्फे सय्यद जमशीद व संजीव बालय्या यांनी कळवले आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.