Magova 2017: Last year waiting for the convenience of the Aurangabad transport sector | मागोवा २०१७ : औरंगाबाद वाहतूक क्षेत्राचे सुविधांच्या प्रतीक्षेतच सरले वर्ष

- संतोष हिरेमठ  

औरंगाबाद : बससेवा, रेल्वे, विमान या दळणवळण आणि वाहतूक सुविधा परिपूर्ण असल्यावर कोणत्याही शहराचा विकास फास्ट ट्रॅकवर येतो. गेल्या काही वर्षांत औरंगाबाद शहरातील वाहतूक सुविधांमध्येही अनेक चांगल्या बाबी मिळाल्या आहेत; परंतु सरत्या वर्षात वाहतूक क्षेत्राच्या पदरात फार काही नवीन पडले नाही. नवीन विमानसेवा, सक्षम शहर बससेवा, मुंबईसाठी नवी रेल्वे, बसपोर्ट यासह अनेक सुविधांची नुसती वाट पाहण्यातच वर्ष निघून गेले. 

दिवाळीत एसटी कर्मचार्‍याचा संप
सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यानी १७ आॅक्टोबर रोजी उगारलेल्या बेमुदत संपाच्या हत्याराने पहिल्यांदाच प्रवाशांसाठी आरटीओ कार्यालयाच्या मदतीने खाजगी बसेस रस्त्यांवर उतरविण्याची नामुष्की राज्य शासनावर ओढावली. खाजगी वाहतूकदारांनीही मिळालेल्या संधीचा फायदा उचलत अवाच्या सव्वा भाडे उकळून प्रवाशांची अडवणूक केली. तब्बल चार दिवस हा संप चालल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले. जिल्ह्यातील आठ बसस्थानकांतून ५०० पैकी एकही बस रस्त्यावर धावली नाही. कर्मचार्‍यानी पुकारलेला संप अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागे घेतला आणि लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला. ऐन दिवाळीत एसटीला चार दिवसांत तब्बल अडीच कोटींचा फटका बसला आहे. 

बसपोर्टची प्रतीक्षाच
पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची अवस्था अंत्यत बिकट झाली असून, ते अखेरच्या घटका मोजत आहे. याठिकाणी बसपोर्ट उभारण्याची घोषणा जानेवारी २०१६ मध्ये झाली. डिझाईन-बिल्ड-फायनान्स-ट्रान्स्फर-लीज’ या तत्त्वावर बसपोर्ट बांधण्यात येणार आहे. बसपोर्ट जाहीर केल्याच्या वर्षभरानंतर म्हणजे जानेवारी २०१७ मध्ये निविदा प्रक्रिया सुरू झाली; परंतु ही प्रक्रिया रेंगाळली. गेल्या दोन वर्षांपासून बसपोर्टची नुसती प्रतीक्षा करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. बसपोर्टची नेमक ी उभारणी कधी होईल, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.

मुंबईसाठी नव्या रेल्वेला ‘खो’
नांदेड-मुंबई नवीन रेल्वेला रेल्वे बोर्डाकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे; परंतु मुंबईत रेल्वेच्या गर्दीमुळे मध्य रेल्वेवर प्रचंड ताण आहे. त्यामुळे या रेल्वेचा निर्णय मध्य रेल्वेवर सोपविला आहे. मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करून ही नवीन रेल्वे चालविण्यात येणार आहे. मुंबईसाठी सध्या चार प्रमुख रेल्वे आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी आणखी एका रेल्वेची मागणी होत आहे. जूनमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या औरंगाबाद दौर्‍यानंतर नांदेड विभागास नांदेड ते मुंबईसाठी लवकरच नवीन रेल्वे मिळणार असल्याची घोषणा नांदेड विभागाने केली; परंतु नव्या रेल्वेला ‘खो’ देण्यात येत असल्याचे दिसते.

आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेकडे लक्ष
चिकलठाणा विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो टर्मिनलमध्ये रूपांतर करून १ जून २०१६ पासून या ठिकाणाहून देशांतर्गत एअर कार्गो सेवेला सुरुवात करण्यात आली. ही सेवा सुरू करताना पुढील तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात विमानतळावरून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवेची प्रतीक्षाच करण्याची वेळ आली. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन संस्था म्हणून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्या. स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नव्या वर्षातच विमानतळ विस्तारीकरणाला वेग येण्याची शक्यता आहे.

शहर बससेवा अपुरीच
किफायतशीर प्रवासासाठी शहर बसला प्राधान्य दिले जाते; परंतु औरंगाबादेत बोटावर मोजता येईल इतक्या शहर बसेस ठराविक रस्त्यांवर धावत आहेत. २०१७ या वर्षातही त्यात वाढ झाली नाही.  वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी शहरात जवळपास १५० बसेसची गरज आहे. स्मार्टसिटीअंतर्गत शहरात शहर सेवा सुरू करण्यासाठी महापालिकेकडून हालचाल सुरू आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या टप्प्यात पाच बस खरेदी करून त्या चालविण्यासाठी महामंडळाला देण्यात येणार आहेत. 

...अन् गुलाबी रिक्षा अवतरल्या
आरटीओ कार्यालयाकडून सहा महिन्यांत महिलांसाठी विशेष अशा गुलाबी रंगाच्या रिक्षांचे २२ परवाने देण्यात आले; परंतु प्रत्यक्षात आरटीओ कार्यालयाकडून तपासणी झाल्यानंतर काळ्या रंगाच्याच रिक्षा चालविण्यात आल्या. यामध्ये गुलाबीऐवजी काळा रंग असतानाही रिक्षांची पासिंग केल्याचा प्रकारही समोर आला. हा प्रकार मे महिन्यात ‘लोकमत’ने ‘गुलाबी रिक्षा कोणी पाहिली का?’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून समोर आणला. वृत्त प्रकाशित होताच खडबडून जागे झालेल्या आरटीओ कार्यालयाने  रिक्षांचा शोध सुरू केला. कारवाईनंतर रिक्ष़ा रस्त्यावर दिसू लागल्या.

नव्या वर्षातच मॉडेल रेल्वेस्टेशनचा दुसरा टप्पा
मॉडेल रेल्वेस्टेशनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर तात्काळ दुसर्‍या टप्प्यातील काम सुरू होणे अपेक्षित होते. ३ जुलै २०१५ रोजी दुसर्‍या टप्प्यातील जुन्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही झाले; परंतु २०१६ आणि सरत्या वर्षातही हे काम सुरूच झालेले नाही. निधीच्या प्रतीक्षेमुळे हे काम आणखी पुढे ढकलल्या गेले आहे. रेल्वे आणि केंद्रीय पर्यटन विभागाकडून होणारे काम आता थेट पुढच्या वर्षीच मार्गी लागणार आहे. मुकुंदवाडी स्टेशनवर प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा देण्यासाठी रेल्वेने सुरू केलेली विकासकामे एप्रिलअखेर पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु त्यालाही आता नव्या वर्षांचा मुहूर्त उजाडणार आहे.

नव्या विमानाचे ‘टेकआॅफ ’ लांबणीवर
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडान योजनेंतर्गत मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी द डेक्कन चार्टर्सने तयारी दर्शविली. वेळापत्रकाचे नियोजनही झाले; परंतु पुढे काही झाले नाही. इंडिगो कंपनीच्या पथकाने फेब्रुवारी महिन्यात विमानतळास भेट देत सोयी-सुविधांची पाहणी केली होती. तेव्हापासून चिकलठाणा विमानतळ प्राधिकरण ‘इंडिगो’कडून प्रतिसादाची प्रतीक्षा करीत आहे, तर दिल्ली-औरंगाबाद सेवेसाठी झूम एअरने तयारी दर्शविली. आॅक्टोबरअखेर ही नवीन विमानसेवा सुरू होणार असल्याचे प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले; परंतु संबंधित कंपनीकडून विमानसेवा सुरू करण्यास उशीर होत असल्याने या नव्या विमानाचे ‘टेकआॅफ ’ लांबणीवर पडले आहे.

रेल्वे अधिकार्‍याचा व्हीआयपी थाट बाजूला 
रेल्वे प्रशासनाने आॅक्टोबरमध्ये ‘व्हीआयपी’ संस्कृ ती मोडीत काढण्याचा निर्णय घेतला; परंतु  रेल्वेमंत्र्यांच्या सूचनेनंतरही दौर्‍याच्या नावाखाली दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍याचा ‘व्हीआयपी’ थाट सुरूच होता. हा प्रकार ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून समोर आणताच  खडबडून जागे झालेल्या वरिष्ठ अधिकार्‍यानी ‘व्हीआयपी’ संस्कृ तीला दूर करून अखेर सामान्य बोगीतून प्रवास करणे सुरू केले. वरिष्ठ अधिकार्‍याना सामान्य बोगीत पाहून रेल्वे प्रवासीदेखील थक्क होऊन जात आहेत. ‘दमरे’चे महाव्यवस्थापक पहिल्याच वार्षिक निरीक्षणाचे निमित्त साधून २८ जानेवारीला विशेष बोगीने औरंगाबादला आल्यानंतर शिर्डी आणि शनी शिंगणापूरला जाऊन देवदर्शन केले होते. हा प्रकारही ‘लोकमत’ने उघडकीस आणला.


Web Title: Magova 2017: Last year waiting for the convenience of the Aurangabad transport sector
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.