‘मेड इन औरंगाबाद’ची जपानभरारी!

By गजानन दिवाण | Published: November 23, 2017 10:55 AM2017-11-23T10:55:04+5:302017-11-23T11:10:48+5:30

औरंगाबाद : जगभरात सॉफ्टवेअर उत्पादनात दबदबा अमेरिकेचा. त्यामुळे भारतातील दिग्गज कंपन्यादेखील सॉफ्टवेअर उत्पादने तेथूनच आयात करतात. हा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न औरंगाबाद शहराने केला असून, मराठमोळ्या तरुणांनी तयार केलेली सॉफ्टवेअर उत्पादने लवकरच जपानच्या बाजारात दिसणार आहेत.

 'Made in Aurangabad' moving to Japan! | ‘मेड इन औरंगाबाद’ची जपानभरारी!

‘मेड इन औरंगाबाद’ची जपानभरारी!

googlenewsNext
ठळक मुद्देसॉफ्टवेअर उत्पादनात मराठी पाऊल

गजानन दिवाण
औरंगाबाद : जगभरात सॉफ्टवेअर उत्पादनात दबदबा अमेरिकेचा. त्यामुळे भारतातील दिग्गज कंपन्यादेखील सॉफ्टवेअर उत्पादने तेथूनच आयात करतात. हा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न औरंगाबाद शहराने केला असून, मराठमोळ्या तरुणांनी तयार केलेली सॉफ्टवेअर उत्पादने लवकरच जपानच्या बाजारात दिसणार आहेत. यासंदर्भात औरंगाबादेतील ‘फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस’ या कंपनीने अलीकडेच सॉफ्टबँक या जपानी कंपनीशी करार केला आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आनंद माहूरकर या तरुणाने गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून आपली बलस्थाने हेरून २०१० साली या कंपनीची स्थापना केली. अमेरिकेतील बोस्टनमध्ये या कंपनीचे मुख्यालय आहे. मराठी मातीशी नाळ जोडल्या गेलेल्या माहूरकर यांनी त्याचवर्षी या कंपनीचे सातासमुद्रापार औरंगाबादेतही एक कार्यालय सुरू केले. हीच कंपनी आता मराठवाड्यातील मराठी तरुणांनी निर्माण केलेली सॉफ्टवेअर उत्पादने जपानला निर्यात करणार आहे.

आनंद यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अंबाजोगाईत झाले. आई-वडील दोघेही शिक्षक. बारावीला गुणवत्ता यादीत आल्याने औरंगाबादेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. घरात नोकरीचेच वातावरण असल्याने पुढे पुण्यात एका कंपनीत मेकॅनिकल इंजिनियर म्हणून नोकरी केली. ती करीत असताना त्यांनी संगणकाचे ज्ञान घेतले. पुण्यात मन न रमल्याने परत औरंगाबादेत येऊन एका कंपनीत नोकरी केली. मेकॅनिकल इंजिनिअरमधील सॉफ्टवेअर अभियंत्याचे गुण हेरून त्यांना मुंबईला एका विशेष प्रकल्पावर पाठविण्यात आले. तेथेही न रमलेल्या आनंद यांनी १९९९ साली पुन्हा पुण्यात एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी सुरु केली. नंतर मुंबईतील एका कंपनीच्या माध्यमातून थेट अमेरिका गाठली. त्या कंपनीचा व्यवसाय २५ कोटींवरुन ३५० कोटींवर नेला. अगदी नवीन ब्रॅण्ड असलेल्या कंपनीच्या मालकाला आपण कोट्यवधी रुपये मिळवून देऊ शकतो, तर आपणच तो व्यवसाय करून अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न का सोडवू शकत नाही, या विचारातून त्यांनी २०१० साली ‘फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस’ कंपनीची स्थापना केली. एकही पैशाची गुंतवणूक नाही. केवळ आयडिया हीच त्यांची गुंतवणूक. सॉफ्टवेअरमधील कुठलीही डिग्री वा सर्टिफिकेट कोर्स नाही.

केवळ अनुभवाच्या जोरावर ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ क्षेत्रात जगभरातील दिग्गजांच्या यादीत त्यांचे नाव पहिल्या काहींमध्ये घेतले जाते. हे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? आपण कुठले कपडे घालायला पाहिजे, कुठली फॅशन आपल्याला सूट करते, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी कुठल्याही माणसाची गरज यापुढे राहणार नाही. तुमची पर्सनॅलिटी, तुमचे विचार याचा अभ्यास करून कॉम्पुटरच तुम्हाला हे सांगेल. साधारण न पटणारीच ही गोष्ट. देशभरातून आलेल्या जवळपास ४० प्रतिनिधींसमोर गुरुवारी आणि शुक्रवारी औरंगाबादेत या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा डेमो दाखविला जाणार आहे. लवकरच अशी अनेक सॉफ्टवेअर उत्पादने औरंगाबादेत तयार केली जातील आणि भारतासह जगभराला ती पुरविली जातील, अशी माहिती ‘फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माहूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.


त्याची सुरुवात जपानपासून झाली आहे. सॉफ्ट बँक नावाच्या जपानी कंपनीने आपल्या कंपनीत ५० कोटींची गुंतवणूक केली. भारतात आपल्या एकमेव कंपनीशी त्यांनी जॉइंट व्हेंचर केले आहे. औरंगाबादेत आपण जी टेक्नॉलॉजी डेव्हलप करू ती जपानमध्ये नेऊन ते विकतील. तिथे आपण त्यांना कंपनीचा ५१ टक्के भाग दिला आहे. तेथे मार्केटची पूर्ण जबाबदारी त्यांचीच असेल, असे माहूरकर यांनी सांगितले.
तरुणांना प्रशिक्षण
औरंगाबादेतील एमआयटी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि जेएनईसीच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल. स्किल डेव्हलपेमेंट केले जाईल. याच तरुणांना पुढे आपल्या कंपनीत सामावून घेतले जाईल. भविष्यात याच मराठी तरुणांनी तयार केलेली सॉफ्टवेअर उत्पादने जगभरात निर्यात केली जातील.
-आनंद माहूरकर,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस
.....................

Web Title:  'Made in Aurangabad' moving to Japan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.