लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे आव्हान आम्ही स्वीकारले असून, त्यांच्याच मतदार संघात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे़ तेव्हा हा मेळावा भाजपाने उधळून दाखवावा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे़
परभणी येथे एका कार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी असभ्य भाषा वापरत शेतकरी संघटना एक नंबरचा शत्रू आहे़ जर सरकारच्या विरोधात टीका होत असेल तर त्या सभा उधळून लावा, अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या़ लोणीकरांच्या या वक्तव्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम यांनी बुधवारी पत्रक काढून आमच्या सभा उधळून दाखवा, असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १५ सप्टेंबर रोजी तुळजापूर आणि २७ सप्टेंबर रोजी वैजापूर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे़ तेव्हा लोणीकर यांनी ही सभा उधळून दाखवावी, असे आव्हान दिले आहे़