औरंगाबाद शहरात ‘लॉजिस्टिक हब’ची क्षमता; जिल्हा व्यापारी महासंघाने घेतला पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 01:38 PM2017-11-17T13:38:29+5:302017-11-17T13:44:10+5:30

लॉजिस्टिक हब उभारण्यासाठी औरंगाबाद मोठे डिस्टिनेशन ठरत आहे. महाराष्ट्रातील नव्हे, तर पश्चिम भारतातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून या ऐतिहासिक शहराकडे पाहिले जात आहे. विविध क्षेत्रातील उत्पादन करणा-या  कंपन्यांनी येथे वेअरहाऊस उभारावे, यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाने पुढाकार घेतला असून त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहे. 

'Logistic Hub' capacity in Aurangabad city; Initiatives taken by District Traders Federation | औरंगाबाद शहरात ‘लॉजिस्टिक हब’ची क्षमता; जिल्हा व्यापारी महासंघाने घेतला पुढाकार

औरंगाबाद शहरात ‘लॉजिस्टिक हब’ची क्षमता; जिल्हा व्यापारी महासंघाने घेतला पुढाकार

googlenewsNext
ठळक मुद्दे वस्तू व सेवा कर (जीएसटी) मुळे देशात लॉजिस्टिकमधील सप्लाय चेन नेटवर्कमध्ये मोठा बदल होणार आहे.जही देशात ६० टक्के मालवाहतूक ही रस्त्यानेच होते. ३२ टक्के वाहतूकही रेल्वेने व ७.६० टक्के मालवाहतूक बंदरावर होते, तर अवघा ०.१ टक्के मालवाहतूक एअरपोर्टने होते. औरंगाबाद आॅटोमोबाइल हब म्हणून पुढे आले आहे. येथील वाळूज, बीड बायपास रोड, पुणे रोड आदी महामार्गावर मोठ्या कंपन्यांनी वेअरहाऊस उभारले आहेत.

-  प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : वस्तू व सेवा कर (जीएसटी) मुळे देशात लॉजिस्टिकमधील सप्लाय चेन नेटवर्कमध्ये मोठा बदल होणार आहे. कंपन्या मालवाहतूक करण्यासाठी देशातील मध्यवर्ती ठिकाणी वेअरहाऊस उभारतील. लॉजिस्टिक हब उभारण्यासाठी औरंगाबाद मोठे डिस्टिनेशन ठरत आहे. महाराष्ट्रातील नव्हे, तर पश्चिम भारतातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून या ऐतिहासिक शहराकडे पाहिले जात आहे. विविध क्षेत्रातील उत्पादन करणा-या  कंपन्यांनी येथे वेअरहाऊस उभारावे, यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाने पुढाकार घेतला असून त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहे. 

लॉजिस्टिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते उत्पादनातील १४ ते १५ टक्के खर्च लॉजिस्टिकवर येतो. आजही देशात ६० टक्के मालवाहतूक ही रस्त्यानेच होते. ३२ टक्के वाहतूकही रेल्वेने व ७.६० टक्के मालवाहतूक बंदरावर होते, तर अवघा ०.१ टक्के मालवाहतूक एअरपोर्टने होते. जीएसटी करप्रणाली लागू  झाल्यामुळे आता उत्पादन पुरवठा साखळीमध्ये मोठा बदल होणार आहे. मोठ्या कंपन्या देशाच्या मध्यवर्ती भागात वेअरहाऊस उभारण्यासाठी आखणी करीत आहे. जेथून कमीत कमी वेळात देशाच्या कोणत्याही भागात उत्पादन पाठविता येतील, अशा क्षेत्राची निवड केली जात आहे. जिथे उत्पादन होत आहे त्याच शहरातून रस्ते, रेल्वे, विमानाद्वारे मालवाहतूक होईल. त्या ठिकाणाहून समुद्र बंदरे काही तासांच्या अंतरावर असतील. याचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. 

औरंगाबाद आॅटोमोबाइल हब म्हणून पुढे आले आहे. येथील वाळूज, बीड बायपास रोड, पुणे रोड आदी महामार्गावर मोठ्या कंपन्यांनी वेअरहाऊस उभारले आहेत. यात इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, फार्मास्टिकल्स, सीडस् अ‍ॅण्ड स्टील, कापड आदींचा समावेश आहे. औरंगाबाद शहर जसे महाराष्ट्राचा मध्यबिंदू आहे तसेच पश्चिम भारताचाही मध्यभाग आहे. येथून गुजरात, मध्यप्रदेश, गोवा या राज्यांत १० ते १५ तासांत पोहोचता येते. डीएमआयसी,सोलापूर-धुळे महामार्ग, समृद्धी महामार्गामुळे  रस्त्याद्वारे मालवाहतूक आणखी वेग घेईल, तसेच येथे जागाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. माळीवाडा येथे रेल्वेचा कंटेनर डेपो आहे. येथून मोठ्या प्रमाणात रेल्वेद्वारे मालवाहतूक होत आहे. विमानतळही जवळ आहे. येथून भविष्यात कॉग्रो सेवाही गती घेईल. याशिवाय जालना येथे ड्रायपोर्ट बनत आहे. यामुळे लॉजिस्टिक हबसाठी औरंगाबादला महत्त्व प्राप्त होत आहे. याचा विचार करून सरकारने करमाड येथे राज्यस्तरीय औषधी भांडार उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 

आॅस्ट्रेलियन कंपनीचा शहरात सर्व्हे 
आॅस्ट्रेलियातील एका लॉजिस्टिक कंपनीच्या प्रतिनिधींनी औरंगाबादेत येऊन सर्व्हे केला. येथील दळणवळणाची परिस्थिती, पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे व विमानाची कनेक्टिव्हिटी. जमिनीची उपलब्धता, किमती आदींचा यात समावेश होता. या आॅस्ट्रेलियन कंपनीच्या भारतातील प्रतिनिधींनी येथे मुक्कामही केला होता. येथील काही उद्योजक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांशी त्यांनी संपर्क साधला व संपूर्ण परिस्थितीचा अहवाल तयार केला. 

यासंदर्भात मालवाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष फय्याज खान यांनी सांगितले की,विदेशातील लॉजिस्टिक कंपन्या भारतात येण्यास उत्सुक आहे. आॅस्ट्रेलियन कंपनीच्या प्रतिनिधींनी औरंगाबादेत येण्यापूर्वी पुणे व नागपूर येथेही सर्व्हे केला होता. औरंगाबाद मध्यवर्ती ठिकाण असल्याने त्यांनी येथे पसंती दिली; पण पायाभूत सुविधा कमी असल्याने त्याची नाराजीही व्यक्त केली. विदेशी लॉजिस्टिक कंपन्या आल्या तर त्याचा फायदा येथील उद्योजकांना, व्यावसायिकांना, मालवाहतूकदारांना मोठ्या प्रमाणात होईल. मात्र, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींंनी  इच्छाशक्ती दाखविणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

वाहतूकनगरला मिळावी गती 
देशातील मालवाहतुकीपैकी ६० टक्के मालवाहतूक ट्रकद्वारे होत आहे. त्यात देशात रस्ते, उडणपूल तयार करण्याचे काम वेगाने होत आहे. राज्य शासनाने औरंगाबाद शहरात वाहतूकनगर उभारण्यासाठी तीसगाव परिसरातील खराडी येथे ३६ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात लालफितीमध्येच वाहतूकनगर अडकले आहे. राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने वाहतूकनगर उभारण्यासाठी सक्रिय व्हावे, यामुळे लॉजिस्टिक हबला प्रोत्साहन मिळेल. 
- फैयाज खान, अध्यक्ष, मालवाहतूकदार संघटना 

लॉजिस्टिक हबसाठी भौगोलिकदृष्ट्या योग्य 
लॉजिस्टिक हबसाठी भौगोलिकदृष्ट्या योग्य शहर औरंगाबादची ओळख निर्माण होत आहे. येथे पश्चिम भारताचे लॉजिस्टिक हब होण्यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाने पुढाकार घेतला आहे. या कार्यात उद्योजकांची संघटना सीएमआयए व मासिआ यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. भविष्यात सर्व संघटना मिळून लॉजिस्टिक हबसाठी आणखी पोेषक वातावरण तयार करण्यात येईल. यासाठी या क्षेत्रातील उद्योजक, मालवाहतूकदार यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सतत राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. त्यादृष्टीने महासंघाने कार्य सुरू केले आहे. 
- अजय शहा, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

आधीपासूनच वेअरहाऊस उभारणीला सुरुवात 
वाळूज औद्योगिक वसाहतीत ४ हजार, तर चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, शेंद्रा औद्योगिक वसाहती मिळून लहान-मोठे सुमारे ४ हजार युनिट कार्यरत आहेत. वाळूज,बीड बायपास रोड, पुणे रोड आदी मार्गांवर वेअरहाऊस उभारले आहेत व काही उभारले जात आहे. मालवाहतुकीच्या दृष्टीने औरंगाबाद मध्यवर्ती ठिकाण आहे. उत्पादन निर्यातीसाठी मुंबई बंदर असो वा गुजरात राज्यातील बंदरावर माल १२ तासांत पोहोचू शकतो. समृद्धी महामार्ग किंवा सोलापूर-धुळे महामार्ग झाल्यावर हे अंतर आणखी कमी होऊ शकते. लॉजिस्टिक हबसाठी आमची संघटनाही प्रयत्न करीत आहोत. 
- प्रसाद कोकिळ, अध्यक्ष, सीएमआयए

Web Title: 'Logistic Hub' capacity in Aurangabad city; Initiatives taken by District Traders Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.