जालना : मागासवर्गीय प्रवर्गातील कुटुंबांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने उपकरातून विविध साहित्य खरेदी करून त्याचे पंचायत समितीमार्फत संबंधित लाभार्थ्यांना वितरण केले जाते. त्यानुसार जिल्हा परिषदेमार्फत सर्व पंचायत समित्यांना या साहित्याचे वाटपही झाले आहे. परंतु, महिना उलटला तरी लाभार्थ्यांच्या याद्याच मिळाल्या नसल्याने हे साहित्य पंचायत समिती आवारातच वाटपाविना पडून आहे.
जिल्ह्यातील मागास प्रवर्गातील एसटी, व्हीजेएनटी या प्रवर्गातील कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीसाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने उपकरातून विशेष निधी ठेवला होता. त्यानुसार गत सप्टेंबरमध्ये या प्रवर्गातील नागरिकांकडून मिनी दाळ मिल, डिझेल इंजिन, पाण्याची मोटार, पिठाची गिरणी या साहित्यांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते.
या योजनाचा लाभ मिळावा म्हणून या प्रवर्गातील अनेकांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यामुळे प्रस्तावांची संख्या जवळपास ४ हजार झाली होती. या प्रस्तावांची छाननी करण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने निविदेद्वारे ३७ मिनी दाळ मिल, १०० डिझेल इंजिन, दीडशेच्या जवळपास पाण्याच्या मोटारी आणि ३०० पेक्षा जास्त पिठाची गिरणी या साहित्यांची खरेदी करण्यात आली. यात एका मिनी दाळमिलची किंमत ८० हजार, डिझेल इंजिनची किंमत २४ हजार, पाण्याची मोटार २२ हजार तर पिठाच्या गिरणीचा दर १५ हजार रुपये आहे.
हे साहित्य पुरवठादाराकडून उपलब्ध झाल्याने समाजकल्याण विभागाने जालना तालुक्यासह अंबड, परतूर, जाफराबाद, भोकरदन, मंठा, घनसांगवी येथील पंचायत समित्यांकडे डिसेंबरमध्येच याचे वितरण केले. मात्र, महिना उलटला तरी अद्यापही लाभार्थ्यांची निवड करुन सदरील लाभार्थ्यांच्या याद्या पंचायत समितीकडे पाठविल्या नाहीत. परिणामी, हे साहित्य धूळखात पडून असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)