The life imprisonment for both the Azhu builder murderer | अज्जू बिल्डरचा खून करणा-या दोघांना जन्मठेप
अज्जू बिल्डरचा खून करणा-या दोघांना जन्मठेप

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकीतील वादातून अज्जू बिल्डर यांचा खून करणारे आरोपी शेख अय्युब ऊर्फ बाबा शेख कादर व शेख अकबर शेख कादर या दोघांना सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड शुक्रवारी (दि. ८ फेब्रुवारी) ठोठावला. २२ एप्रिल २०१३ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इंदिरानगर-बायजीपुरा परिसरातील नूर मशिदीमध्ये नमाज पढून अज्जू बिल्डर दुचाकीवर निघाले असता, त्यांना अडवून त्यांच्यावर लाठ्या-काठ्या-तलवारीने गंभीर स्वरुपाचा हल्ला करण्यात आला होता. अज्जू बिल्डर खाली पडले असता, त्यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. त्यावेळी अज्जू बिल्डरचा भाऊ शेख अथर मदतीसाठी धाऊन आला असता, त्यालाही जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हल्ल्यानंतर अज्जू बिल्डरला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता, मृत घोषित करण्यात आले होते.
यासंदर्भात जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर दुस-याच दिवशी शेख अय्युब ऊर्फ बाबा शेख कादर (२४), शेख अकबर शेख कादर (२८), मुश्ताक सय्यद पाशा (३६) आणि शेख कादर शेख दाऊद (५१, सर्व रा. इंदिरानगर-बायजीपुरा) यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते अटकेत होते. पोलीस निरीक्षक जी. एस. पाटील यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते.
सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी शेख अय्युब ऊर्फ बाबा शेख कादर व आरोपी शेख अकबर शेख कादर यांना भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड ठोठावला. तसेच कलम ३२३ अन्वये सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. इतर दोन आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडले. सहायक सरकारी वकील शिरसाठ यांना अ‍ॅड. नितीन मोने, पैरवी अधिकारी उत्तम तायडे आणि पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी सहकार्य केले.


Web Title: The life imprisonment for both the Azhu builder murderer
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.