औरंगाबाद : गुरुवारी हर्सूल परिसरात एअर पिस्टलने फायरिंग करणाऱ्या जावेद तडवी या आरोपीचे आणखी एक प्रकरण शनिवारी समोर आले. एका बेरोजगाराला पोलीस किंवा लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तडवीने त्याला २ लाख ७० हजार रुपयांचा गंडा घातला होता. या फसवणूकप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात
आला.
पोलिसांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील नगाव येथील राजेंद्र सुरेश पाटील हा युवक नोकरी शोधत होता. तेव्हा औरंगाबादेत राजे छत्रपती अकॅडमी चालविणारा जावेद नूरभाई तडवी याची पोलीस व लष्करात ओळख असून तो नोकऱ्या लावून देतो, अशी माहिती राजेंद्रला
समजली.
राजेंद्रने त्याच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्याने औरंगाबादला बोलाविले. जुलै महिन्यात राजेंद्रने त्याची भेट घेतली तेव्हा ‘अडीच लाख रुपये दे, मी तुला नोकरी लावून देतो, आतापर्यंत अनेकांना पोलीस किंवा मिलिटरीत मी नोकऱ्या लावून दिल्या आहेत’ असे जावेदने सांगितले.
त्याच्यावर विश्वास ठेवून राजेंद्रने ३० जुलै रोजी जावेदला १ लाख रुपये रोख रक्कम दिली. त्याच दिवशी जावेदने राजेंद्रची ओळख मंत्री ज्ञानोबा जाधव (रा. लखमापूर तांडा, रेणापूर, लातूर) याच्यासोबत करून दिली. ‘जाधव तुझ्या नोकरीची आॅर्डर काढून देईल, फक्त त्याच्या सांगण्याप्रमाणे कर’ असे जावेदने सांगितले.
मग जाधवनेही नोकरीची आॅर्डर काढण्यासाठी आणखी १ लाख ७० हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम जाधवने आपल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर जमा करून घेतली. नंतर मात्र जावेद आणि जाधव हे दोघे राजेंद्रचा फोन उचलेना अन् नोकरीचे काय झाले ते सांगेना. शेवटी राजेंद्र शुक्रवारी बेगमपुरा पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी जावेद व जाधवविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली.