दुष्काळाचे सावट सारुन लाखो भाविक नाथचरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:33 AM2019-03-27T00:33:50+5:302019-03-27T00:34:40+5:30

नाथषष्ठी सोहळा : वारकऱ्यांच्या उत्साहाने पैठणनगरी भक्तिरसात न्हाली; वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेचा ठायीठायी अनुभव

 Lakhs of pilgrims from Drought | दुष्काळाचे सावट सारुन लाखो भाविक नाथचरणी

दुष्काळाचे सावट सारुन लाखो भाविक नाथचरणी

googlenewsNext

पैठण : ‘धन्य आजि दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीण गेला, मज वाटे त्यासी आलिंगण द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे’ या नाथ महाराजांच्या अभंगाप्रमाणे मंगळवारी लाखो वारकऱ्यांची नाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर अवस्था झाली. ४ लाख भाविकांनी गेल्या दोन दिवसांत नाथ समाधीचे दर्शन घेतल्याचे नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे यांनी सांगितले.
संत एकनाथ महाराजांच्या दर्शनाच्या ओढीने शेकडो किलोमीटरचे अंतर पायी कापत आलेल्या वारकऱ्यांना आज समाधी दर्शनानंतर अलौकिक समाधान प्राप्त झाले. वारकºयांच्या उत्साहाने पैठणनगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली. मुखातून ‘भानुदास एकनाथ’चा जयघोष व समोरासमोर भेट होताच एकमेकांच्या होणाºया चरणस्पर्शाच्या दृश्याने वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेचा शहरात ठायीठायी अनुभव येत होता. दुष्काळाच्या संकटाने ग्रासलेल्या वारकºयांनी यंदा चांगला पाऊस पाडून शेतकºयांची ईडा पिडा टळू द्या, असे साकडे नाथ महाराजांना घातले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या नाथषष्ठी सोहळ्यासाठी वारकºयांची संख्या घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, मात्र संत एकनाथ महाराजांवर असलेल्या अपार श्रध्देने सर्व शक्यता मोडीत काढीत वारकºयांनी नाथषष्ठीची वारी दुष्काळाचे सावट दूर सारून उत्साहात पूर्ण केली.
नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दिवसभर पैठण शहरात विविध मार्गाने वारकºयांच्या दिंड्यांचे आगमन होत होते. हातात भगवा ध्वज, गळ्यात तुळशीमाळ, महिला वारकºयांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, मुखात भानुदास एकनाथांचा जयघोष, हाताने टाळ मृदंगाचा गजर करत भगवा ध्वज फडकावत शहराच्या रस्त्यावरून निघालेल्या दिंड्या, सोबत सजवलेल्या पालख्या, पुढे अश्वाची रूबाबदार स्वारी, जिकडे पाहावे तिकडे वारकरी आणि हरिनामाचा गजर, दुसरे काहीच नाही, असे पैठणनगरीचे आजचे चित्र होते. अवघी पैठणनगरी नाथभक्तीत लीन झाली होती. पैठण शहरात विसावलेल्या शेकडो दिंड्यांतून दिंडीप्रमुख, फडप्रमुख व ह.भ.प. महाराजांनी आपापल्या फडावर कीर्तन, प्रवचन करून गुरू -शिष्य परंपरेनुसार मार्गदर्शन केले.
विजयी पांडुरंगास अभिषेक
आज फाल्गून वद्य षष्ठी असल्याने पहाटे गावातील नाथ मंदिरात असलेल्या विजयी पांडुरंगास पंचामृत स्नान व अभिषेक नाथवंशजांच्या वतीने घालण्यात आला व विधिवत पूजा करून पुन्हा स्थानापन्न करण्यात आले. त्याचवेळी बाहेरील नाथ मंदिरातील संत एकनाथ महाराजांच्या समाधीची सुद्धा विधिवत पूजा करण्यात आली. दुपारी गावातील नाथ मंदिरातून नाथवंशज व मानकºयांची मानाची निर्याण दिंडी पारंपरिक अभंग म्हणून काढण्यात आली. दिंडीच्या अग्रभागी सजवलेला रूबाबदार अश्व, त्यानंतर जरी पटका, भानुदास महाराजांचे निशाण, झेंडेकरी त्यानंतर दिंडी विणेकरी, त्यानंतर अमृतराय संस्थानची छत्री, नाथवंशजांच्या छत्र्या, त्यानंतर संस्थानिक अंमळनेरकर महाराजांची दिंडी, भगवान गडाची दिंडी व सर्वात शेवटी वारकरी अशा क्रमाने अभंगाच्या तालावर मार्गक्रमण करण्यात येत होते. मानाची ही दिंडी गावातील नाथ मंदिरातून निघून कावळे गल्ली, उदासी महाराज मठमार्गे गोदावरीच्या वाळवंटातून बाहेरील नाथ मंदिरात पश्चिम भागातील गोदावरी द्वारातून नेण्यात आली.
या ठिकाणी ‘अवघेची त्रैलोक्य आनंदचि आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन, एका जनार्दनी एक पणी उभा, चैतन्याची शोभा शोभतसे’ जलसमाधी घेण्याअगोदर हाच अभंग घेत नाथ महाराजांनी शेवटचे कीर्तन केले होते म्हणून हा अभंग परंपरेने घेण्यात आला. यानंतर भानुदास एकनाथांच्या गजरात पूर्वद्वाराने दिंडी बाहेर पडली व परत गावातील नाथ मंदिरात नेण्यात आली. तेथे महाद्वारास भानुदास महाराजांचे निशाण लावून आरतीने सांगता करण्यात आली . नाथवंशजांच्या दिंडीचे परंपरेनुसार वाळवंटात नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी स्वागत केले. नाथवंशजांच्या दिंडीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी, भाविक दिंडी मार्गावर स्थिरावले होते.
स्नानासाठी वारकरी धरणावर
यंदा दुष्काळामुळे गोदावरीत पाणी न मिळाल्याने वारकºयांनी स्नानासाठी थेट मोर्चा जायकवाडी धरणाकडे वळविला. लाखो वारकरी व भाविकांनी धरणात स्नान करून गोदावरीच्या स्नानाचे पुण्य प्राप्त केले. पहाटे जायकवाडीच्या धरणाच्या पिचिंगवर दगडाऐवजी वारकरी असे विहंगम दृश्य फुलून आले होते.

Web Title:  Lakhs of pilgrims from Drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.