केज : पाल्याला मारहाण केल्याची विचारणा करणाऱ्या पालकावर शिक्षकाने चाकूने हल्ला केल्याची घटना केज तालुक्यातील नांदुरघाट फाट्यावर गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. मात्र, दुष्काळ पडला असल्याने गावातील लोक वारंवार पैसे मागत असल्याने राग अनावर झाल्याने हा प्रकार घडला असल्याचे शिक्षक शाम गुंजोटे याने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले. त्यामुळे खरे कोणाचे हा पेच पोलिसांना पडला आहे.
शाम गुंजोटे असे त्या चाकू हल्ला करणाऱ्या शिक्षकाचे नाव असून ते केज तालुक्यातील खाडेवाडी येथील प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. या जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षक आहेत. पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलास शाम गुंजोटे याने बुधवारी शाळेत मारले होते. यामुळे त्या मुलाच्या शरीरावर सूज आली होती. त्याने हा प्रकार घरी सांगितला.
दरम्यान मुलाचे आजोबा श्रीराम भानुदास खाडे ( वय ५०, रा. खाडेवाडी) यांना शाम गुंजोटे हे नांदुरघाट फाट्यावर भेटले असता त्यांनी याबाबतची विचारणा केली असता त्यांना शिविगाळ करून राम गुंजोटे याने त्यांच्यावर चाकूहल्ला केल्याचे खाडे यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.
हल्ला झाल्यानंतर खाडे घाटनांदुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
केज पोलिसांनी शिक्षक शाम गुंजोटे यास ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. खाडे यांचा जबाब घेतल्यानंतर शिक्षक गुंजोटे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, दुष्काळ पडल्याने गावातील लोक वारंवार पैसे मागण्यासाठी येत असत. गुरुवारी पैसे मागण्यासाठी गावातील खाडे आले होते.
राग अनावर झाल्याने हे कृत्य घडले असल्याचे गुंजोटे यांनी पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले. मुलाला मारहाण का केली ? अशी विचारणा करणाऱ्यावर चाकु हल्ला शिक्षक करु शकतो ही बाब बुद्धीला न पटणारी आहे.
दोघांचे म्हणणे पोलिसांनी ऐकले असून तपासानंतरच खरा प्रकार समोर येईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (वार्ताहर)