मराठवाड्यात पाऊस लांबल्याने खरीपाची ९ हजार कोटींची गुंतवणूक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:33 AM2018-08-14T11:33:39+5:302018-08-14T11:37:48+5:30

मराठवाड्याचे खरीप पीकाखालील क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्टर असून त्यापैकी ४४ लाख १९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Kharif's 9,000 crore investment crisis due to the delay in the monsoon rains | मराठवाड्यात पाऊस लांबल्याने खरीपाची ९ हजार कोटींची गुंतवणूक संकटात

मराठवाड्यात पाऊस लांबल्याने खरीपाची ९ हजार कोटींची गुंतवणूक संकटात

googlenewsNext
ठळक मुद्देमराठवाड्यात साधारण महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविली आहे.यामुळे शेतीमधील अंदाजे ८ ते ९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक संकटात आली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्याचे खरीप पीकाखालील क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्टर असून त्यापैकी ४४ लाख १९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. साधारण महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने अंदाजे ८ ते ९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक संकटात आली आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आणि काही प्रमाणात उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यात अपेक्षित पावसापेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामाची दुबार पेरणी करणेही अवघड असून दुष्काळाच्या उंबरठ्यावर मराठवाडा उभा आहे. येत्या काही दिवसांत अपेक्षित पाऊस झाला नाही तर परिस्थिती आवाक्याबाहेर जाण्याची चिन्हे आहेत. आॅगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झालेला आहे. या महिन्यांत दुबारपेरणी कशी करणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतांना कृषि विभागाने मराठवाड्यात दुबारपेरणीचे संकट असल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाला गेल्या आठवड्यात दिला आहे.

विभागात मका २ लाख ३५ हेक्टरवर पेरणी करण्यात आला आहे. कापूस १४ लाख ३२ हजार हेक्टर (बोंडअळीच्या संकटाने पीक धोक्यात), तूर ४ लाख ३३ हजार हेक्टर, मूग १ लाख ६२ हजार हेक्टर, उडीद १ लाख ४५ हजार हेक्टर, सोयाबीन १७ लाख ५१ हजार हेक्टर, बाजरी १ लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. या सर्व पिकांना पावसाची आवश्यकता आहे. या सर्व पिकांच्या पेरण्याचा खर्च वेगवेगळा असतो. यातील मका, कापूस, सोयाबीन पेरणीचा खर्च जवळपास सारखाच असतो. कडधान्य व बाजरी पेरणीचा खर्च तुलनेने थोडा कमी येतो.

१५ ते २० हजारांचा हेक्टरी खर्च 
नांगरणीसाठी २५०० रुपये हेक्टरी खर्च झाला आहे. मोगडण्यासाठी १२५० रुपये, चरी पाडण्यासाठी १२५० रुपये, ५ हजार रुपयांचे बियाणे  हेक्टरी लागतात. निंदण्यासाठी ३ हजार ७५० रुपये हेक्टरी खर्च झाला आहे. १०:२६ च्या खतांच्या दोन बॅगा हेक्टरी लागल्या आहेत. शिवाय युरिया आणि फवारणीचा खर्च वेगळा झाला आहे. वखरण्यासाठी १२५० रुपये हेक्टरी खर्च झाला आहे. ४ वेळा शेतकऱ्यांनी वखरणी केली आहे. या सगळ्या खर्चाची गोळाबेरीज केली तर सरासरी १५ ते २० हजार रुपये हेक्टरी खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. काही ठिकाणी जास्तीचा खर्च झाला असल्याचे गंगापूर तालुक्यातील आंबेगाव येथील शेतकरी मनोहर थोरात यांनी सांगितले. 

विभागीय महसूल उपायुक्त म्हणतात...
मराठवाड्यातील खरीप हंगामाबाबत सोमवारी सचिव पातळीवर आढावा घेण्यात आला. खत, पेरणी, बियाणे, मजुरी, नांगरणी व इतर शेतीकामांच्या खर्चात वाढ होत आहे. विभागातील खरीप हंगामात शेतीमध्ये झालेल्या गुंतवणुकीचा निश्चित आकडा सांगणे अवघड आहे. परंतु जी काही गुंतवणूक विभागातील शेतकऱ्यांनी केली, ती पावसाअभावी संकटात असल्याचे प्रभारी महसुल उपायुक्त शिवानंद टाकसाळे यांनी व्यक्त केले. 

Web Title: Kharif's 9,000 crore investment crisis due to the delay in the monsoon rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.