नळदुर्ग : नळदुर्गसह अणदूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री खंडोबाच्या यात्रेस बुधवारपासून प्रारंभ होत आहे. मंदिर व्यवस्थापन व नगरपालिकेच्या वतीने भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदापासून पौष कृष्ण अष्टमीपर्यंत श्री खंडोबाचे येथील मैलारपुरात वास्तव्य असते. या काळात पौष पौर्णिमेदिवशी मोठी यात्रा भरते. यावर्षी १२ जानेवारी रोजी मोठी यात्रा भरत असून, ही यात्रा तीन दिवस चालते. ११ ते १३ जानेवारी या काळात विविध कार्यक्रम होत आहे. १२ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता काकडा आरती, पहाटे ४ वाजता महापूजा व श्रींचा अभिषेक, दिवसभर भक्तांचे नवस, नैवेद्य दर्शन विधी, रात्री १२ वाजता मानाच्या काठ्यांचे आगमन, नळदुर्ग व अणदूरच्या काठ्यासह, घोडे यांचे मैलारपुरात आगमन, या दरम्यान शोभेचे दारूकाम, मध्यरात्री २ वाजढता अणदूर व नळदुर्गच्या मानकऱ्यांचा मानपान सोहळा, शुक्रवारी पहाटे ३ वाजता काठ्या, घोडे, पालखीसह छबिना आदी कार्यक्रम होतील. शुक्रवारी दुपारी २ वाजता नगरपालिकेच्या वतीने जंगी कुस्त्यांच्या फडाचे आयोजन करण्यात आले आहे.