‘जुमलेबाज’ सरकारला उघडे पाडण्यासाठी फिरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:19 AM2018-10-24T00:19:51+5:302018-10-24T00:24:39+5:30

‘डाटा स्वस्त आणि आटा महाग’ असे धोरण असलेल्या जुमलेबाज सरकारला उघडे पाडण्यासाठी राज्याचा दौरा करीत आहे. कर्जमाफी, उज्ज्वला योजना, शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न हे सर्व थोतांड आहे. प्रत्यक्षात जनतेला लाभ मिळालेला नाही. आकड्यांची घोषणा करण्यातच केंद्र आणि राज्यातील सरकार मग्न असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

 'Jumlebazar' is going to open the government | ‘जुमलेबाज’ सरकारला उघडे पाडण्यासाठी फिरतोय

‘जुमलेबाज’ सरकारला उघडे पाडण्यासाठी फिरतोय

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेना गटप्रमुखांचा मेळावा : उद्धव ठाकरे यांची भाजप सरकारवर टीका

औरंगाबाद : ‘डाटा स्वस्त आणि आटा महाग’ असे धोरण असलेल्या जुमलेबाज सरकारला उघडे पाडण्यासाठी राज्याचा दौरा करीत आहे. कर्जमाफी, उज्ज्वला योजना, शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न हे सर्व थोतांड आहे. प्रत्यक्षात जनतेला लाभ मिळालेला नाही. आकड्यांची घोषणा करण्यातच केंद्र आणि राज्यातील सरकार मग्न असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. अयोध्येत राममंदिर उभारणार हासुद्धा जुमलाच होता. तो उघड करण्यासाठी २५ नोव्हेंबरला अयोध्याला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा श्रीहरी पॅव्हेलियन येथे मंगळवारी (दि.२३) दुपारी आयोजित केला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकार, राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. गटप्रमुख हा शिवसेनेचा कणा आहे. येत्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजयात गटप्रमुखांचा खारीचा नव्हे, तर सिंहाचा वाटा असणार असल्याचे सांगतानाच गटप्रमुखांनी सरकारचा खोटेपणा उघडा करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’मध्ये लोकांशी संवाद साधतात. त्यात संवाद साधलेल्या महिला शेतकºयांना विचारतात, उत्पन्न दुप्पट झाले का? ती महिला हो म्हणते. मात्र, त्यातील सत्य तपासले असता, प्रत्यक्षात काहीच नसते. मोदींसोबत संवाद साधण्यासाठी सरकारी अधिकारी शेतकºयांना खोटे बोलण्याचे प्रशिक्षण देतात. उज्ज्वला गॅस योजनेचा डांगोरा पिटला जात आहे. प्रत्यक्षात लोक गॅस केवळ चहा करण्यासाठीच वापरतात. सबसिडीचे पैसे मिळत नाहीत. गॅस नगदी घेण्यासाठी ८५० रुपये कोठून आणणार, असा प्रश्न निर्माण होतो. कडुलिंब अनेक रोगांवर रामबाण उपाय करणारे झाड आहे. या सरकारच्या काळात कडुलिंबालाच रोग लागला. काँग्रेसला ६० वर्षांत हे करता आले नाही. मात्र, या सरकारने चार वर्षांत करून दाखवले असल्याची उपरोधिक टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार संदीपान भुमरे, संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...तर राम मंदिर कोण बांधणार?
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाकीत व्यक्त केलेय नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. हे भाकीत खरे ठरल्यास राम मंदिर कोण बांधणार? की राम मंदिर हासुद्धा जुमलाच होता का? अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत न्यायालयाने निर्णय दिला. तो निर्णय बदलण्यासाठी सरकारने कायदा केला. मग राम मंदिरासाठी कायदा होऊ शकत नाही का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनाही शिवसेनेचा मुद्दा पटला आहे. यामुळे २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाऊन जुमलेबाजी उघड करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
दैवत बदलणारी औलाद कोण?
जेलमधून जामिनावर सुटलेल्या; पण जमिनीवर न आलेल्या एकाने अयोध्येला निघालात; पण तुमचे दैवत तर बाळासाहेब आहेत, असा सवाल केला आहे. तुमच्यासारखी दैवत बदलणारी आमची औलाद नाही. बाळासाहेबांनी दिलेला भगवाच खांद्यावर घेऊन पुढे जात असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे नाव न घेता केली.
अजित पवारांना धरणाजवळ फिरकू देऊ नका
पुन्हा भीषण दुष्काळ येतोय. धरणे आटत आहेत. मात्र, अजित पवार यांना धरणाच्या आजूबाजूला फिरकू देऊ नका. त्यांना सांगा घरातील पिंप भरा, आमच्याकडे येऊ नका, अशी खिल्ली उडवत मोडकळीस आलेल्या पक्षाने आम्हाला कसे वागावे, हे शिकवू नये. आम्ही अयोध्याला जातोय, बारमध्ये नाही. बारमध्ये निघालो तर तुम्ही याल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसवर उद्धव ठाकरे यांनी केली. या दुष्काळात शिवसेना शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संभाजीनगर नावात मुख्यमंत्र्यांची आडकाठी : खैरे
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने अलाहाबादचे नाव बदलले. मात्र, औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यात मुख्यमंत्र्यांना कोणी अडवले? औरंगाबादचे नाव संभाजीनगर केल्यास शिवसेना आणखीन मजबूत होईल, या भीतिपोटीच मुख्यमंत्री आडकाठी आणत असल्याची टीका शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे यांनी केली.
व्यासपीठावर रामाची मूर्ती
शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात व्यासपीठावर रामाची धनुष्यबाण हातात असलेली भव्य मूर्ती ठेवण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी या मूर्तीला हार घालून ‘जय श्रीराम’चा नारा दिला. उद्धव ठाकरे यांच्या पूर्वी बोललेल्या प्रत्येक वक्त्याने भाषणाचा शेवट, ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम’ असा केला.

Web Title:  'Jumlebazar' is going to open the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.