इज्तेमासाठी देश-विदेशातून जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:04 AM2018-02-26T01:04:00+5:302018-02-26T11:16:05+5:30

शहराच्या इतिहासात प्रथमच होत असलेल्या राज्यस्तरीय इज्तेमाने गर्दीचे सर्व विक्रम रविवारी मोडले. दोन हजारपेक्षा अधिक एकरांवर पसरलेल्या या इज्तेमास्थळी पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नाही. सोमवारी सकाळी ११ वाजता दिल्लीच्या मकरजचे प्रमुख हजरत मौलाना साद साहब यांच्या उपस्थितीत विशेष दुआचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे साथींचा ओघ रविवारीही सुरूच होता. दिवसभर वाळूज ते लिंबेजळगाव रस्त्यावर लांबलचक रांगा लागल्या होत्या. हजारो साथींनी इज्तेमास्थळी पायी जाणे पसंत केले.

Jagtar from India and abroad for Ijtema | इज्तेमासाठी देश-विदेशातून जनसागर

इज्तेमासाठी देश-विदेशातून जनसागर

googlenewsNext
ठळक मुद्देइज्तेमास्थळी पाय ठेवायलाही जागा शिल्लक नाही : आज सकाळी ११ वाजता विशेष दुआचे आयोजन

मुजीब देवणीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहराच्या इतिहासात प्रथमच होत असलेल्या राज्यस्तरीय इज्तेमाने गर्दीचे सर्व विक्रम रविवारी मोडले. दोन हजारपेक्षा अधिक एकरांवर पसरलेल्या या इज्तेमास्थळी पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नाही. सोमवारी सकाळी ११ वाजता दिल्लीच्या मकरजचे प्रमुख हजरत मौलाना साद साहब यांच्या उपस्थितीत विशेष दुआचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे साथींचा ओघ रविवारीही सुरूच होता. दिवसभर वाळूज ते लिंबेजळगाव रस्त्यावर लांबलचक रांगा लागल्या होत्या. हजारो साथींनी इज्तेमास्थळी पायी जाणे पसंत केले. ३ हजार सामूहिक विवाह सोहळ्याने इज्तेमाला चाँद लावले. सोमवारी दुपारी तीनदिवसीय इज्तेमाचा समारोप करण्यात येणार आहे.
शनिवारी इज्तेमाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून साथी आले. त्यासोबतच इतर राज्यांमधील साथींनीही हजेरी लावली. विदेशातूनही मोठ्या संख्येने इज्तेमासाठी जमातचे साथी आले. रविवारी सकाळी ६ वाजेपासून शहरात मोठ्या प्रमाणात साथी येणे सुरूच होते. रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती बसस्थानकासह खाजगी वाहनांद्वारे येणाºयांची संख्या लाखोंच्या घरात होती. औरंगाबाद ते इज्तेमास्थळापर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर तर इज्तेमास्थळी हजारो साथी पायीच येत असल्याचे दिसून आले. उद्या सकाळी ११ वाजता दिल्ली मरकजचे प्रमुख हजरत मौलाना साद साहब यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक ‘दुआ’चे आयोजन करण्यात आले आहे. या दुआसाठी लाखो साथी इज्तेमास्थळी दाखल होत आहेत. संयोजकांनी गृहीत धरलेल्या आकड्यापेक्षा कितीतरी जास्त साथी दाखल झाले आहेत. त्यामुळे रविवारी इज्तेमाच्या मुख्य मंडपाच्या बाहेर पाय ठेवायला जागाच शिल्लक नव्हती.
दुपारी ‘जोहर’ आणि सायंकाळी ‘असर’च्या नमाजसाठी अक्षरश: जनसागरच उसळला होता. जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत मानवी सागरच दिसून येत होता. सकाळी ‘फजर’च्या नमाजनंतर भाई मुश्ताक यांनी मार्गदर्शन केले. दुपारी जोहरनंतर मौलाना शमीम साहब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
सायंकाळी जिल्हानिहाय मंडपांमध्ये सामूहिक विवाह लावण्यात आले. हजरत मौलाना साद साहब यांनी ‘निकाह’वर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांचा आदर्श आपल्यासमोर ठेवावा, असे आवाहनही त्यांनी
केले.
‘जन्नत’साठी अल्लाहची इबादत, पैैगंबर यांची शिकवण आचरणात आणा
वाळूज महानगर : ‘जन्नत’ मिळविण्यासाठी जगात अल्लाहची इबादत व त्यांचे लाडके नबी प्रेषित मोहंमद पैैगंबर यांनी दिलेली शिकवण आचरणात आणण्याचा सल्ला मौलाना शमीम साहब यांनी दिला. राज्यस्तरीय इज्तेमामध्ये रविवारी ‘जोहर’च्या नमाजनंतर त्यांनी लाखो साथींना मार्गदर्शन केले. पवित्र धर्मग्रंथ ‘कुरआन’ आणि ‘हदीस’चे विविध दाखले देत प्रत्येकाने भक्तीच्या मार्गाचा अवलंब करावा, असे त्यांनी नमूद केले.
राज्यस्तरीय इज्तेमामध्ये सकाळी फजरच्या नमाजनंतर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर दुपारी शमीम साहब यांनी नमूद केले की, अल्लाह संपूर्ण मानवजातीचा दाता व शक्तिमान असून, अल्लाहचा संदेश प्रत्येकाकडे पोहोचविण्याचे काम प्रेषितांनी केले. संपूर्ण सृष्टीचा पालनहार एकमेव अल्लाह असून, अल्लाहच्या नजरेत मनुष्य अनमोल आहे. तमाम मानवजातीचे कल्याण व्हावे, यासाठी अल्लाहने जवळपास १ लाख २४ हजार प्रेषित (दूत) पृथ्वीतलावर पाठविले. प्रेषित पैगंबर हे अल्लाहचे शेवटचे दूत होते. यानंतर दूत पाठविण्याचा सिलसिला बंद झाल्यामुळे अल्लाहची इबादत, नबीचे विचार, कुरआनची तिलावत करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे मौलाना शमीम यांनी सांगितले.
मौलाना शमीम पुढे म्हणाले की, ‘कलमा’ ज्याने मनात ठेवून चांगले आचरण केले तोच जीवनात यशस्वी होऊ शकतो. अल्लाहच्या सर्वच दुतांनी जीवन कसे जगावे, याविषयी मार्गदर्शन करून ‘इमान व दीन’चे महत्त्व पटवून दिले आहे. प्रत्येकाने अल्लाह हा एकच असून, तोच सर्वांचा ‘खालिक व मालिक’ असल्यामुळे प्रत्येकाने अल्लाहची शिकवण व प्रेषितांनी दाखविलेल्या मार्गावरून जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाने पाच वेळा नमाज न चुकता अदा करावी, ‘कुरआन’चे वाचन करावे.

Web Title: Jagtar from India and abroad for Ijtema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.