आंतरराष्ट्रीय जलतरणपटू विष्णू लोखंडे यांनी रचला इतिहास; सलग १२ तास पोहत विक्रमांची केली नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 02:01 AM2018-06-18T02:01:28+5:302018-06-18T12:25:05+5:30

औरंगाबादचे माजी नायब तहसीलदार आणि ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय जलतरणपटू विष्णू लोखंडे यांनी त्यांचा ६१ वा वाढदिवस अनोख्यारीतीने साजरा करताना रविवारी एमजीएम स्विमिंगपुलवर इतिहास रचला.

International Swimmer Vishnu Lokhande created history | आंतरराष्ट्रीय जलतरणपटू विष्णू लोखंडे यांनी रचला इतिहास; सलग १२ तास पोहत विक्रमांची केली नोंद

आंतरराष्ट्रीय जलतरणपटू विष्णू लोखंडे यांनी रचला इतिहास; सलग १२ तास पोहत विक्रमांची केली नोंद

googlenewsNext
ठळक मुद्देसलग १२ तास स्विमिंगची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये झाली नोंदसलग १२ तास स्विमिंग करणारे विष्णू लोखंडे भारतातील पहिलेच सीनिअर सिटीझन जलतरणपटू

औरंगाबाद : औरंगाबादचे माजी नायब तहसीलदार आणि ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय जलतरणपटू विष्णू लोखंडे यांनी त्यांचा ६१ वा वाढदिवस अनोख्यारीतीने साजरा करताना रविवारी एमजीएम स्विमिंगपुलवर इतिहास रचला.

विष्णू लोखंडे यांनी रविवारी सलग १२ तास पोहत ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड’ आणि ‘आशिया बुक रेकॉर्ड’मध्ये विक्रमाची नोंद केली. ६१ व्या वर्षी सलग १२ तास स्विमिंग करणारे विष्णू लोखंडे हे भारतातील पहिलेच सीनिअर सिटीझन असलेले जलतरणपटू ठरले. त्याचप्रमाणे त्यांनी सलग १२ तास स्विमिंग करताना आशिया बुक आॅफ रेकॉर्डसमध्ये असलेला सलग दहा तासांचा विक्रमही मोडित काढला.

मराठवाड्याची पहिली महिला एव्हरेस्टवीर ठरलेल्या मनीषा गिर्यारोहक हिच्या उपस्थितीत विष्णू लोखंडे यांनी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी स्विमिंग करण्यास सुरुवात केली. नियमानुसार त्यांना ५५ मिनिटे पोहणे व ५ मिनिटे ब्रेक घेण्याची सवलत होती. त्यानुसार त्यांनी तीनदा ब्रेक घेतला. पहिला ब्रेक हा ९.५५ मिनिटांनी ५ मिनिटांचा घेतला त्यात त्यांनी नारळपाणी सेवन करीत केळी खाल्ल्या व दुसरा गॅप त्यांनी २ वाजता १0 मिनिटांचा घेतला. त्या वेळेस त्यांनी नारळपाणी, एनर्जी ड्रिंक सेवन करीत खजूर व भिजलेले बदाम सेवन केले. तिसरा ब्रेक त्यांनी दुपारी ४ वाजता १५ मिनिटांचा घेतला. त्यात त्यांचे वैद्यकीय तपासणी झाली. त्यात ब्लडप्रेशर आणि पल्स रेट तपासण्यात आले. यावेळी निरीक्षक म्हणून ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड’चे रेखा सिंग आणि ‘एशिया बुक आॅफ रेकॉर्ड’चे नरेंद्रसिंग उपस्थित होते.

विष्णू लोखंडे हे औरंगाबादचे आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आहेत. त्यांची २०१७ मध्ये स्विमिंग फेडरेशन इंडियाने हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथील आंतरष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. तसेच विष्णू लोखंडे यांनी २००८ मध्ये बंगळुरू आणि २००९ मध्ये हैदराबाद येथील राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत कास्यपदक जिंकले आहे. त्याचप्रमाणे महसूल विभागातर्फे २००१ ते २०१५ दरम्यान आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सातत्यपूर्वक त्यांनी पदकांची लूट केली आहे. तसेच राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धेतही ते गत दहा वर्षांपासून सातत्यपूर्वक पदके जिंकत आहेत. विष्णू लोखंडे हे जिल्हा क्रिकेट संघटनेचे सदस्य म्हणूनदेखील कार्यरत आहेत.

असा रचला इतिहास
भारतातून सलग १२ तास पोहण्याचा सीनिअर सिटीझन कॅटेगिरीतून कोणीही विक्रम केला नाही. तथापि, आज औरंगाबादमध्ये विष्णू लोखंडे यांनी ही कामगिरी पूर्ण करताना नवीन इतिहास रचताना इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये आपल्या कामगिरीची नोंद केली. विष्णू लोखंडे यांनी आज सलग १२ तास पोहून याआधीचा सलग दहा तास चीनच्या स्विमरकडून पोहण्याचा विक्रम मागे टाकण्याचाही पराक्रम केला. नियमानुसार एका तासात ५५ मिनिटे स्विमिंग करायचे व ५ मिनिटे विश्रांती घ्यायची, असा नियम आहे; परंतु विष्णू लोखंडे यांनी त्यांच्या कामगिरीदरम्यान फक्त तीनदाच ब्रेक घेतला व वयाच्या ६१ व्या वर्षीही वज्रनिर्धार आणि क्षमतेची ओळख उपस्थितांना करवून दिली.
 

पुढील लक्ष्य इंग्लिश खाडी 

वयाची ६१ वी अनोख्या पद्धतीने साजरी करावी. या दृष्टीने काही नवीन करावे असे निश्चित केले होते. त्यानुसार सलग १२ तास स्विमिंग करून इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदवला आणि आशिया बुक आॅफ रेकॉर्डमधील जुना विक्रम मोडला. या कामगिरीचा आणि केलेला संकल्प पूर्ण केल्याचा आपल्याला अतीव आनंद वाटतोय. आज सुरुवातीला सकाळी पोहण्यास सुरुवात केल्यानंतर आपण १२ तास सलग स्विमिंग करू शकू का, याविषयी प्रारंभीच्या २ ते ३ तास थोडा तणाव होता; परंतु नंतर आपण लीलया ही कामगिरी पूर्ण केली. यासाठी महिनाभर सलग सहा तास स्विमिंग करण्याचा आपण सराव केला. वयाच्या चाळिशीनंतरही आरोग्य निरोगी राहावे यासाठी सर्वांनी स्विमिंग करायला हवे. आता आपले पुढील लक्ष्य हे इंग्लंड ते फ्रान्स ही इंग्लिश खाडी पूर्ण करण्याचे आहे.
- विष्णू लोखंडे, आंतरराष्ट्रीय स्विमर

शहरासाठी अभिमानास्पद बाब

ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे नाव चांगल्या बाबींसाठी पुढे जावे, अशी सर्वांची इच्छा असते. विष्णू लोखंडे यांनी एक नव्हे तर दोन रेकॉर्डस् करीत विक्रम रचला ही शहरासाठी अभिमानास्पद बाब आहे. लोखंडे यांनी गिनीज बुक आॅफ वर्ल्डस् रेकॉर्डमध्येही नाव नोंदवावे.
-राजेंद्र दर्डा, लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ

Web Title: International Swimmer Vishnu Lokhande created history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.