- डॉ. खुशालचंद बाहेती 
औरंगाबाद : तरुणांमध्ये सतत आॅनलाइन राहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, त्यांना याचे व्यसनच जडत असल्याचे दिसून येत आहे. मनोविकारतज्ज्ञांकडे अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालकांनी धाव घेणे सुरूकेले आहे.
मानसोपचारतज्ज्ञांच्या मते आॅनलाइनचे व्यसन हा नवीन मानसिक विकार अनेक तरुणांमध्ये दिसून येत आहे. पालकांमध्ये मात्र याकडे पाहिजे तितक्या प्रमाणात गांभीर्याने लक्ष दिले जात असल्याचे दिसत नाही. पालक लहान मुलांना गप्प बसविण्यासाठी त्यांच्या हातात मोबाइल देऊन आपली सोय करून घेतात; मात्र मुले यामुळे अधिकाधिक त्याच्या आहारी जात आहेत. नेट चॅटिंग, सोशल मीडिया, स्वस्त आणि सहज उपलब्ध गेम, पॉर्न साइटस्च्या आकर्षणामुळे हे प्रमाण वाढतच आहे. मोफत वायफाय किंवा अत्यल्प दरात नेट पॅक यामुळेही यात वाढ होत आहे.

व्यसनाधीन होणा-यांमध्ये १८ ते २० वयोगटातील मुलांचे प्रमाण जास्त आहे. यामुळे मुले अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. अशा मुलांमध्ये चिडचिड करणे, एकलकोंडे राहणे, खाण्या-पिण्याकडे लक्ष न देणे अशा तक्रारी सुरुवातीस दिसतात.

व्यसनाच्या पुढच्या टप्प्यात कपड्यांमध्ये मलमूत्र करणे सुरू होते. मुलांना निद्रानाश होतो व हे व्यसन आणखी वाढायला लागते. अशी मुले दिवसभर मोबाइलला चिकटलेली असतात.

जगभरात ६ टक्के लोकांना या व्यसनाची लागण झाली असल्याचे आंतरराष्ट्रीय संशोधनात आढळून आले आहे. अन्य एका संशोधनात देशातील शहरी भागांत या व्यसनाचे प्रमाण २४ टक्क्यांपर्यंत असल्याचे आढळून आले आहे.

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संजीव सावजी यांच्या मते, हे प्रमाण वाढत आहे; मात्र मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याकडे पालकांचा कल कमीच आहे. सध्या आठवड्यामध्ये २ किंवा ३ पालक अशा मुलांना घेऊन येतात; मात्र यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात मुलांमध्ये हे व्यसन जडले आहे. पालकांसाठी ही धोक्याची घंटा आहे. वेळीच लक्ष न दिल्यास सिझोफ्रे निया सारखे विकार निर्माण होऊ शकतात.
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.