शांतीगिरींना यापूर्वी पराभवाची धूळ चारली आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:57 AM2018-01-23T00:57:11+5:302018-01-23T00:57:56+5:30

शांतीगिरी महाराजांना आपण याआधी एकदा निवडणुकीत पराभवाची धूळ चारली आहे. यामुळे त्यांनी धर्माची मानहानी होईल असे वर्तन करू नये, असा सल्ला खा. चंद्रकांत खैरे यांनी शांतीगिरी महाराजांना सोमवारी दिला.

I have beaten Shantigiri Maharaj earlier- Khaire | शांतीगिरींना यापूर्वी पराभवाची धूळ चारली आहे

शांतीगिरींना यापूर्वी पराभवाची धूळ चारली आहे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शांतीगिरी महाराजांना आपण याआधी एकदा निवडणुकीत पराभवाची धूळ चारली आहे. यामुळे त्यांनी धर्माची मानहानी होईल असे वर्तन करू नये, असा सल्ला खा. चंद्रकांत खैरे यांनी शांतीगिरी महाराजांना सोमवारी दिला. ते लोकमत प्रतिनिधीशी शांतीगिरी महाराजांच्या लोकसभेच्या संभाव्य उमेदवारीबद्दल बोलत होते. त्यांच्याबाबत खूप काही बोलण्याची गरज वाटत नसल्याचेही खैरे यांनी स्पष्ट केले.
शांतीगिरी महाराजांनी स्वत:च आगामी लोकसभा निवडणूक भाजपकडून लढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर भाजपमध्ये इच्छुक असलेल्या १० ते १२ जणांवर ‘जय बाबाजी’ करण्याची वेळ आली आहे. गेल्या महिन्यात शांतीगिरी महाराजांची महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन स्नेहभोजन घेतले होते. त्यामुळे त्यांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. जर भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाहीतरी ते मैदानात येणार आहेत. भाजपचे मंत्री पाटील यांनी महाराजांची भेट घेऊन चूक तर केली नाही ना, असे भाजपच्या गोटात वाटू लागले आहे. औरंगाबादमधून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविण्याचे सूचक वक्तव्य केल्यानंतर रविवारी शांतीगिरी हे एनजीओच्या मेळाव्यात मार्गदर्शनासाठी आले होते.
मेळाव्यात महाराजांची उपस्थिती व त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या मनसुब्याबाबत खा. खैरे म्हणाले, शांतीगिरी महाराजांना आपण याआधी एकदा निवडणुकीत पराभवाची धूळ चारली आहे. यामुळे त्यांनी धर्माची मानहानी होईल असे वर्तन करू नये. तसेच काल झालेला एनजीओचा मेळावा हे शासकीय व्यासपीठ असेल तर तेथे महाराजांना का बोलावले. त्यांची कोणती एनजीओ आहे. याबाबत विभागीय आयुक्तांना जाब विचारू, असेही खा. खैरे म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. सद्यस्थितीवरुन शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षात लोकसभा निवडणुकीसाठी युती होणार नाही, असेच वातावरण दिसत आहे. युती होणार नसल्याची शक्यता गृहित धरुनच विविध विधाने समोर येत आहेत.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपचे उमेदवार असलेले खैरे यांना शांतीगिरी महाराजांनी जेरीस आणले होते. दीड लाखांच्या आसपास भक्त परिवाराची मते शांतीगिरी महाराजांनी मिळविली होती, त्यामुळे खैरेंचे मताधिक्य घटले. सोबत काँग्रेसच्या उमेदवाराचाही पराभव झाला होता. २०१९ च्या संभाव्य लोकसभा निवडणूक मैदानात शांतीगिरी महाराज उतरणार आहेत.
भाजपने उमेदवारी दिली नाहीतर अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. शांतीगिरी महाराजांना निवडणूक रिंगणात उतरविण्यामागे भाजप मतांच्या बेरजेचे राजकारण करण्याच्या विचारात असण्याची शक्यता आहे. महाराजांना अपक्ष लढविण्यासाठीच भाजपची तयारी असल्याचे दिसते.

Web Title: I have beaten Shantigiri Maharaj earlier- Khaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.