उस्मानाबाद : उस्मानाबाद शहराची ओळख राज्याच्याच नव्हे तर देशाच्या नकाशावर झळकाविणार्‍या आणि राज्य संरक्षित स्मारक म्हणून दर्जा मिळालेल्या धाराशिव लेण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे़ झालेल्या विकास कामांचा बोर्‍या वाजला असून, विघ्नसंतोषी लोक, प्रेमवीरांच्या प्रतापामुळे येथील मंदिरासह लेण्यांच्या भिंतींवर वेगळाच रंग चढला आहे़ उस्मानाबादच्या या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याकडे शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे़ बालाघाटच्या डोंगररांगात उस्मानाबाद शहरापासून सात किलोमीटर अंतरावर धाराशिव लेण्या आहेत़ करकंडचरिअु आणि बृहत्कथाकोष ह्या दोन जैन ग्रंथात या कोरीव लेण्यांचा उल्लेख आढळून आला आहे़ चार जैन आणि तीन हिंदू लेण्या अशा एकूण सात लेण्यांचा हा परिसर आहे़ पाचव्या ते सहाव्या शतकातील या लेण्या असल्याचा पुरातत्त्व विभागाचा अंदाज आहे़ उस्मानाबाद शहराची खरी ओळख या लेण्यांमुळे देशभर झाली़ या लेण्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन शासनाने या लेण्यांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. सद्यस्थितीत पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत या लेण्या आहेत़ अप्रतिम कोरीव शिल्प, हस्तकलेचा उत्तम नमुना असलेल्या या धाराशिव लेण्या देखभाल-दुरूस्तीअभावी अखेरची घटिका मोजत असल्याचे दिसत आहे़ लेण्यांकडे जाणार्‍या रस्त्यासह परिसराची मोठी दुरवस्था झाली आहे़ लेण्यांच्या सुरक्षेच्या आणि संरक्षणाच्या दृष्टीने अपेक्षित कामे न झाल्याने अनेक ठिकाणच्या दरडी कोसळू लागल्या आहेत़ पूर्वीचे वैभव आता इथे राहिले नसल्याचे काही वयोवृध्द नागरिकांनी सांगितले़ एक ना अनेक समस्यांनी या लेण्या ग्रासल्याने शहरासह परिसरातील नागरिकांसह पर्यटकही याकडे पाठ फिरवू लागले आहेत़ उस्मानाबादचा ऐतिहासिक वारसा व शहराचे वैभव वाढविणार्‍या या लेण्यांकडे लोकप्रतिनिधींसह अधिकार्‍यांचे झालेले दुर्लक्ष हे उस्मानाबाद शहराचेच नव्हे तर जिल्ह्याचे दुर्देव म्हणावे लागेल़ (प्रतिनिधी) मुजोरांवर कारवाईची गरज धाराशिव लेण्या व येथील मंदिराची दुरवस्था करणार्‍या मुजोरांवर वेळोवेळी कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे़ अनेका प्रेमवीरांनी प्रेमग्रंथ लिहिल्याप्रमाणे या ऐतिहासिक ठेवण्याच्या भिंती रंगविल्या आहेत़ या भिंतींकडे पाहून हा ऐतिहासिक ठेवा इथे नसायलाच हवा होता, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे़ या मुजोरांच्या निषेधार्ह कर्तृत्वामुळे भविष्यात या ऐतिहासिक ठेव्याची मोठी होणी होणार आहे़ त्यामुळे वेळीच अशांना लगाम लावून कारवाईची कठोर पावले उचलण्याची गरज आहे़ पहारेकरी एक, जबाबदार्‍या अनेक धाराशिव लेण्या, उस्मानाबादचा ऐतिहासिक दर्गाह, तेर येथील जैनस्तंभ, गोरोबाकाका मंदिर या चार ठिकाणी पाहणी करण्यासाठी केवळ एकच पहारेकरी नियुक्त करण्यात आला आहे़ या चारही ठिकाणांचे ऐतिहासिक महत्त्व पाहता याचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी शासन, प्रशासन किती उत्सुक आहे, हे या पहारेकर्‍याच्या जागेवरून दिसून येते़ विशेष म्हणजे हा पहारेकरी कोठे पहारा देतो, याचा पत्ता कोणालाच लागत नाही़ या चारही ठिकाणी किमान प्रत्येकी दोन पहारेकर्‍यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी होत आहे़ नावालाच राज्य संरक्षित स्मारक राज्य शासनाने जैन लेण्यांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करून पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत या लेण्यांची देखभाल, दुरूस्तीसह इतर जबाबदारी देण्यात आली आहे़ मात्र, राज्य संरक्षित स्मारकाची सध्याची अवस्था पाहता हे केवळ नावालाच राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्याचे दिसत आहे़ लेण्यांचे महत्त्व पाहता अनेक पर्यटक येथे येतात़ सुंदर हस्तकला, ऐतिहासिक ठेवा पाहून अनेकांची यात्रा सफल होते़ मात्र, हा ठेवा जतन करण्याकडे होणारे दूर्लक्ष हा संतापाचा विषय ठरतो़ मात्र, दाद मागायची कोणाकडे हाच प्रश्न सर्वांसमोर आहे़


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.