लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील विविध गावातील विजेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे शेतकºयांना पीकांना पाणीही देता येत तर नाहीच, परंतु रात्रही अंधारात काढावी लागते आहे. त्यामुळे ९ ते १० गावातील शेतकºयांनी शुक्रवारी (दि.१०) विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यास घेराव घालून रोहित्राची मागणी केली. तीन दिवसात रोहित्र बदलून न दिल्यास कार्यालयास कुलपू ठोकण्याचा इशारा राष्टÑवादी काँग्रेसने दिला.
मागील काही दिवसांपूर्वी विद्युत वितरण कंपनीच्यावतीने शेतकºयांना कोणतीही पूर्व कल्पना न देता कृषीचा विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यामुळे शेतकºयांना रबीच्या पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. काही गावठान फिडरचाही पुरवठा खंडीत केल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. शुक्रवारी ९ ते १० गावातील शेतकरी एकत्र आले. राष्ट्रवादीच्या नेतृत्वात त्यांनी महावितरणच्या अभियंत्याच्या दालनासमोर ठिय्या दिला. यावेळी जि. प. उपाध्यक्ष अनील पतंगे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, सपाचे जिल्हाध्यक्ष शेख नईम शेख लाल आदीसह शेतकºयांची उपस्थिती होती. शेतकºयांनी आप- आपल्या गावातील रोहित्राची व्यथा अधिकाºयांसमोर मांडली. यामध्ये उटी ब्रम्हचारी येथे ३ रोहित्र, चिखलागर १, वडहिवरा १, हुडी लिंबाळा १, वरुड गवळी १, वायचाळ पिंपरी २, लोहगाव १, सवना २, गोरेगाव २, वारंगा मसाई ३ असे एकूण १७ रोहित्रांचा प्रश्न समोर आला. यातील काही गावातील रोहित्र महावितरणमध्ये शेतकºयांनी स्वखर्चाने आणून टाकले आहेत. त्यामुळे अनेक गावातील शेतकरी अंधाराचा सामना करत आहे. वीज बिलाचे पैसे भरण्यासाठी कमी भावाने सोयाबीन विकण्याची वेळ आल्याचे शेतकरी मोठ्या पोटतिडकीने सांगत होते. एकूण १४० रोहित्राचा प्रश्न आहे. आॅईल नसल्याने अडचणी येत आहेत. येत्या चार ते आठ दिवसात आॅईल उपलब्ध होणार आहे. सर्वच रोहित्राचा प्रश्न सुटणार असल्याचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांनी सांगितले. तसेच शेतकºयांनी थोडा धीर धरण्याचेही त्यांनी आवाहन केले.