Highprofile international sex racket exposed, Gorakhdhada was started in a hidden way | हायप्रोफाईल आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, छुप्या मार्गाने सुरू होता गोरखधंदा

औरंगाबाद: शहरातील प्रोझोन मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पोलिसांनी गुरुवारी रात्री पर्दाफाश केला. दोन वेगवेगळ्या स्पा सेंटरवर एकाचवेळी मारलेल्या धाडीत तीन ग्राहक, मॅनेजरसह थायलंडहून आणण्यात आलेल्या १२ मुलींना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईने खळबळ मॉल संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या धडाकेबाज कारवाईविषयी अधिक माहिती अशी की, प्रोझोन मॉलमधील पहिल्या मजल्यावर अनंतरा स्पा आणि दी स्ट्रेस हब स्पा अ‍ॅण्ड सलून या नावाने दोन स्पा सेंटर दोन ते तीन वर्षांपासून सुरू आहे. या सेंटरमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालते आणि तेथे विदेशातून आणण्यात आलेल्या मुली ग्राहकांना वेश्यागमनासाठी पुरविण्यात येत असल्याची माहिती खब-याकडून पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांना मिळाली. यानंतर त्यांनी लगेच महिला तक्रार निवारण मंचच्या निरीक्षक किरण पाटील, पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक बिरारी आणि विशेष शाखा, पारपत्र शाखा, सायबर क्राईम सेल अशा विविध शाखेच्या सुमारे २५ कर्मचा-यांना सोबत घेऊन रात्री ८ वाजेच्या सुमारास मॉल गाठले.

दोन्ही स्पा सेंटरवर एकाचवेळी डमी ग्राहक पाठवून तेथील गोरखधंद्याची खात्री केली. अन लगेच दोन्ही स्पा सेंटरवर छापा मारला. दि स्ट्रेस हब स्पामध्ये पाच मुली, दोन ग्राहक आणि एक मॅनेजर होता. तर अनंतरा मध्ये दोन विदेशी ग्राहकांसह आठ विदेशी मुली आढळल्या. यापैकी काही जणी ग्राहकांसोबत नको त्या अवस्थेत आढळल्या. यावेळी सर्व मुलींकडे थायलंडचा पासपोर्ट मिळाला. या मुली येथे कधी आल्या आणि त्यांना कोणता व्हिसा मिळाला, याबाबतची चौकशी पारपत्र शाखा करणार असल्याचे उपायुक्त डॉ. घाडगे यांनी पत्रकारांना सांगितले. पोलिसांची ही कारवाई रात्री ८ पासून रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याविषयी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांना न जुमानणा-या विदेशी व्यक्तींवर रोखले रिव्हॉल्वर
अनंतरामध्ये पोलिसांनी धाड मारली तेव्हा तेथे दोन विदेशी व्यक्ती सापडले. धडधाकट बांधा असलेले हे दोन्ही आरोपी पोलिसांना हातही लावू देत नव्हते.पोलिसांनी त्यांना पकडून बाजूला घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी पोलिसांच्या हाताला हिसका दिला. त्यांना आवरण्याचा प्रयत्नांत त्यांनी चांगलाच धिंगाणा घातला. ते आवरत नसल्याचे लक्षात येताच पोलीस उपनिरीक्षक बिरारी यांनी त्यांच्यावर रिव्हाल्वर रोखले आणि गप्प केले.

आठ दिवसांनंतर बदलत होत्या मुली
दोन्ही स्पाचे मालक वेगवेगळे आहे. स्पा च्या नावाखाली सुरू असलेला हाय प्रोफाईल आंतरराष्ट्रीय स्तरावर चालत असत. तेथे सतत वेगवेगळ्या देशातील मुली आणि ग्राहक नजरेस पडत. आज तेथे थायलंड येथील मुली आढळल्या. काही दिवसाापूर्वी तेथे रशियन मुली होत्या, असे सूत्रांनी सांगितले.
---

दोन्ही स्पा सेंटरचा भाडेकरार रद्द
दि स्ट्रेस स्पा चा मालक मुंबईतील फैजान शेख असून त्याने २०१४ हा स्पा सुरू केला. तर अनंतरा स्पा चा मालक डेरेक मच दो आहे. त्याने २०१५ प्रोझोन मॉलमध्ये हा स्पा सुरू के ला. स्पा च्या नावाखाली त्यांनी घाणेरडा धंदा केल्याचे समोर आल्याने आम्ही या दोन्ही मॉलचा भाडेकरार रद्द करीत असल्याचे प्रोझोन मॉलच्या व्यवस्थापनाने सदर प्रतिनिधीला सांगितले.