येथे गुदमरतोय श्वास ! कचरा, वाहनांमुळे औरंगाबाद शहराला प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 08:04 PM2019-06-05T20:04:35+5:302019-06-05T20:07:57+5:30

वाहनांच्या वाढत्या संख्येसह कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे ही अवस्था

Here breathtaking is hard ! Pollution increased due to garbage and vehicles in Aurangabad city | येथे गुदमरतोय श्वास ! कचरा, वाहनांमुळे औरंगाबाद शहराला प्रदूषणाचा विळखा

येथे गुदमरतोय श्वास ! कचरा, वाहनांमुळे औरंगाबाद शहराला प्रदूषणाचा विळखा

googlenewsNext
ठळक मुद्देदोन वर्षांत प्रदूषणामध्ये दुपटीने वाढ

- राम शिनगारे 

औरंगाबाद : आशिया खंडात सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर अशी बिरुदावली औरंगाबाद मिरवत होते. मात्र, सद्य:स्थितीत शहर वाढण्याऐवजी शहरात प्रदूषण वाढीचा वेग प्रचंड झाला आहे. आता प्रदूषण वाढणाऱ्या शहरांत औरंगाबादचा समावेश होण्याची वेळ आली आहे. सहा वर्षांपूर्वीच प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली असून, कचरा जाळण्याचा प्रकार आणि वाहनांच्या बेसुमार संख्येमुळे त्यात भर पडत १५० ते १५५ मानकापर्यत पोहोचले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे शहरातील प्रदूषणाचे नियंत्रण, मोजमाप करण्याचे काम सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयातून करण्यात येते. यासाठीचा ‘एअर क्वॉलिटी मॉनिटरिंग’ प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत शहरातील तीन ठिकाणी प्रदूषणाचे मोजमाप करणारी यंत्रणा बसवली आहे. त्यात स.भु. महाविद्यालय, कडा आॅफिस आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसराचा समावेश आहे. ही यंत्रणा प्रत्येक दिवसात शहरात बदलत जाणारे प्रदूषणाचे प्रमाण नोंदविण्याचे काम करते. २००५ पासून ही यंत्रणा कार्यरत असून, प्रदूषणाचे प्रमाण  हे मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटरमध्ये मोजण्यात येते. हवेत तरंगणारे धूलिकण १०० मानकापेक्षा अधिक गेल्यास धोकादायक स्थिती निर्माण होते. शहरातील प्रदूषणाने २०१३ सालीच ही धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती प्रकल्प समन्वयक डॉ. रेखा तिवारी यांनी सांगितले. शहरातील सद्य:स्थितीत हवेतील प्रदूषणाचे प्रमाण हे नियमित मानकाच्या १५० ते १५५ दरम्यान पोहोचले आहे. हे प्रमाण १०० च्या आत राहिले पाहिजे. दिवाळीमध्ये हेच प्रमाण १८० ते २०० मानकापर्यंत पोहोचते, असेही प्रा. तिवारी यांनी स्पष्ट केले.

प्रशासन काय उपाय करतेय?
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे शहरातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एअर क्वॉलिटी मॉनिटरिंग’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत शहरातील विविध भागांतील प्रदूषणाची पातळी तपासण्यात येते. या तपासणीतून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर उपाययोजना करण्यासाठी मंडळ प्रयत्न करीत असते. राज्य शासनाने राज्यातील १७ महापालिकांमधील हवा प्रदूषणाचा आराखडा तयार केला आहे. त्यात औरंगाबाद पालिकेचा समावेश आहे. हा आराखडा केंद्र शासनाने मंजूर केला असून, अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा बसविण्यात येत आहे. यात रस्त्यावरील धुळीची स्वच्छता, कचरा न जाळणे, रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करणे, गर्दी होणाऱ्या ठिकाणी हवा शुद्धीकरण केंद्र बसविणे, हवेची गुणवत्ता दाखविण्यासाठी डिस्पले बोर्ड बसविणे यासाठीचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. याशिवाय ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठीचा आरखडा तयार आहे. त्यानुसार या वर्षभरात कार्यवाही केली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. व्ही.एम. मोटघरे यांनी दिली.

२०१९ ची थीम ‘वायू प्रदूषण’
संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरणविषयक मुद्यासंबंधी एक ‘थीम’ जाहीर केली जाते. सद्य:स्थितीत जगाला भेडसावणाऱ्या पर्यावरणविषयक प्रश्नांशी संबंधित ही ‘थीम’ असते. संबंधित विषयावर जगातील राष्ट्रांनी चिंतन करावे, तसेच कृती कार्यक्रम तयार करावा, अशी अपेक्षा या दिनाच्या निमित्ताने असते. २०१९ या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संयुक्त राष्ट्राने घोषित केलेली ‘थीम’ ‘हवेतील प्रदूषण’ ही आहे. यंदाचा जागतिक पर्यावरण दिन चीनमध्ये साजरा होत आहे. 

वायू प्रदूषणाची कारणे व ठिकाण
औरंगपुरा
।  उखडलेले रस्ते आणि त्यावर साचलेली धूळ वाहनांच्या वर्दळीमुळे हवेत उडते. त्यातील धूलिकण हवेत तरंगत राहतात. त्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते.
जालना रोड ।  चोवीस तास जालना रोडवर शेकडो वाहने सतत धावत असतात. या वाहनांमधून  कार्बन डायआॅक्साईड, नायट्रोजन डायआॅक्साईड, कार्बन मोनोक्साईड असे विषारी वायू बाहेर पडतात. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वनराईची आवश्यकता असते. मात्र, त्याचा जालना रोडवर अभाव आहे.

बीड बायपास ।  बीड बायपास रस्त्यावरही धूळ आणि वाहनांतून बाहेर पडणारा धूर आणि कचरा जाळला जाण्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे.

नागरिकांना जाणीव करून द्यावी लागेल 
प्रदूषण कसे होते, हे दिसत नाही. ऑक्सिजन किती आहे हेसुद्धा समजत नाही. आपल्याकडे साधनेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रदूषण ओळखण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा सर्वात अगोदर उभारली पाहिजे. मात्र, तसे होताना दिसून येत नाही. नागरिकांनाही आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे. त्याशिवाय हा विषय महत्वाचा वाटणार नाही.
-डॉ. क्षमा खोब्रागडे, पर्यावरण अभ्यासक

Web Title: Here breathtaking is hard ! Pollution increased due to garbage and vehicles in Aurangabad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.