Her stubbornness could have been possible; Republic Day Parade will be inaugurated by Khan Almas | तिची जिद्द होती म्हणूनच झाले शक्य; खान अल्मास अंजूम करणार प्रजासत्ताक दिनी परेड
तिची जिद्द होती म्हणूनच झाले शक्य; खान अल्मास अंजूम करणार प्रजासत्ताक दिनी परेड

ठळक मुद्देअल्मास ही येथील शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाच्या बी.ए. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आहे.तिचे वडील अहेफाज हे टेलरिंगचे काम करतात. घरी परिस्थिती बेताचीच. सुरुवातीला तिच्या वडिलांना तिने ‘एनएसएस’मध्ये जाणे मान्य नव्हते. अल्मास १ जानेवारीपासून सुमारे एका महिन्याच्या प्रशिक्षणासाठी दिल्लीला जाणार आहे.

औरंगाबाद : जिद्द असेल तर काहीच अशक्य नाही. गरज आहे ती फक्त प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची. अशा जिद्दीचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे औरंगाबादची खान अल्मास अंजूम ही विद्यार्थिनी. येत्या प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी) दिल्ली येथे राजपथावर होणार्‍या परेडमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिची निवड झाली आहे. 

अल्मास ही येथील शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाच्या बी.ए. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. ‘राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये (एनएसएस) स्वत:साठी नाही, तर दुसर्‍यांसाठी काम करण्याची शिकवणूक दिली जाते. ही गोष्ट मला खूप भावली. म्हणून मी पदवीच्या पहिल्या वर्षी ‘एनएसएस’मध्ये सहभाग घेतला’, असे ती सांगते. तिचा हा निर्णय वाटतो तितका सोपा नव्हता. तिचे वडील अहेफाज हे टेलरिंगचे काम करतात. घरी परिस्थिती बेताचीच. सुरुवातीला तिच्या वडिलांना तिने ‘एनएसएस’मध्ये जाणे मान्य नव्हते. मुलीने असे एकट्याने शिबिरासाठी बाहेरगावी जाण्याची चिंता त्यांना होती; परंतु अल्मासचा निश्चय पक्का होता. तिने वडिलांना हर प्रकारे समजावून सांगितले. महाविद्यालयातील प्राध्यापकांनीही वडिलांना ‘एनएसएस’चे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर वडिलांनी परवानगी दिली. घरून पाठिंबा मिळाल्याने तिचा निश्चय अधिकच दृढ झाला. 

दिल्लीसाठी निवड होणे हे एक मोठे आव्हान असते. मराठवाड्यातील महाविद्यालयांतून प्रत्येकी एका मुला-मुलीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणार्‍या दोनदिवसीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली. त्यातून १५ मुले आणि १५ मुलींची सोलापूर जिल्ह्यातील बार्शीसाठी आणि तेथून महाराष्ट्रातील २७ मुले व २७ मुलींना हैदराबाद येथे झालेल्या प्री-एनआरडी शिबिरात पाठविण्यात आले. दहा दिवसांच्या थकवून टाकणार्‍या प्रशिक्षणाच्या शेवटी ७-७ मुला-मुलींची दिल्लीच्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड झाली. या सात मुलींमध्ये अल्मास एक आहे. अल्मास १ जानेवारीपासून सुमारे एका महिन्याच्या प्रशिक्षणासाठी दिल्लीला जाणार आहे.

कुटुंबियांचा पाठिंबा
मुलीचे हे यश पाहून वडिलांनाही अभिमान वाटतो. ‘मी हे करू शकले, ते केवळ माझ्या कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे. माझे वडील जरी अशिक्षित असले तरी त्यांनी मला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. आमच्या संपूर्ण घरातून पदवी शिक्षण घेणारी मी पहिली मुलगी आहे. मुलगी असूनही ते मला खूप स्वातंत्र्य देतात, त्यासोबतच प्राचार्या रोहिणी पांढरे-कुलकर्णी, प्रल्हाद अढागळे, डी.डी. गायकवाड, लक्ष्मण म्हस्के, अर्चना चौफुलीकर व प्राध्यापकवृंदाने खूप सहकार्य केले,’ अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.

अभिमान वाटतो
संपूर्ण शिबिरामध्ये परेडमधील ड्रिल, शिस्त, वैयक्तिक स्वभाव, नेतृत्वगुण, सांस्कृतिक प्रदर्शन आदींच्या आधारावर निवड केली जाते. महाराष्ट्राची गौरवशाली संस्कृती राष्ट्रीय स्तरावर दाखविण्याचा बहुमान मला मिळाला याचा मला अभिमान वाटतो.
-खान अल्मास अंजूम


Web Title: Her stubbornness could have been possible; Republic Day Parade will be inaugurated by Khan Almas
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.