Hemophilia patients get 'Swavalamban card' | हिमोफेलिया रुग्णांना मिळाले ‘स्वावलंबन कार्ड’
हिमोफेलिया रुग्णांना मिळाले ‘स्वावलंबन कार्ड’

औरंगाबाद : रक्तदोषामुळे येणाऱ्या दिव्यांगत्वासह एकूण २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाने बाधित व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर घाटीत गुरुवारपासून दिव्यांगत्व प्रमाणपत्र, स्वावलंबन कार्ड (यूडीआयडी) देण्यास सुरुवात झाली. पहिल्यांदाच स्वावलंबन कार्ड प्राप्त झाल्याने हिमोफेलियाच्या रुग्णांनी समाधान व्यक्त केले.


थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल यासारख्या रक्तदोषाने रुग्णांना अपंगत्व येते. केवळ दिव्यांग प्रमाणपत्राअभावी अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर येत होती. राज्य सरकारने त्यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय १४ सप्टेंबर रोजी जाहीर केला होता. तेव्हापासून दिव्यांगांना स्वावलंबन कार्ड मिळण्याची प्रतीक्षा होती. याविषयी जागतिक अपंगदिनी ३ डिसेंबर रोजी ‘लोकमत’ने वृत्तही प्रकाशित केले. अखेर घाटीत गुरुवारी दिव्यांगत्व प्रमाणपत्र, कार्ड वितरणास सुरुवात झाली.


रुग्णालयाचा व्यवसाय आणि भौतिकोपचार केंद्रात या कार्डाचे वाटप झाले. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. चंद्र्रकांत थोरात, वरिष्ठ व्यवसाय उपचारतज्ज्ञ डॉ. सतीश मसलेकर, भौतिक व्यवसाय उपचारतज्ज्ञ आणि विभागप्रमुख डॉ. अभिषेक कल्लूरकर, डॉ. मुक्तदीर अन्सारी, डॉ. अब्दुल्ला अन्सारी आणि डॉ. आलक पठाण, तसेच विजय वारे यांची उपस्थिती होती.


यावेळी सागर चुगडे यास पहिले कार्ड प्राप्त झाले. यासह सौरभ धूत, वरुण साबळे, मुबसीर खान आणि अमोल जाधव यांना प्रमाणपत्र मिळाले. यावेळी निवासी डॉ. शरद साळोखे, डॉ. मिलिंद लोखंडे, डॉ. श्रेयस घोटवडेकर, डॉ. अनुज पाटील, डॉ. मशुद्दूल शेख, डॉ. प्रतीक राठोड उपस्थित होते.

रक्त गोठत नाही
रक्तातील विशिष्ट घटकाच्या कमतरतेने हिमोफेलियात रक्त गोठत नाही. त्यामुळे रक्तघटक घ्यावे लागतात. पूर्वी सुविधा नसल्याने रुग्णांना मुंबईला जावे लागले. आता जिल्हा सामान्य रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध झाली आहे. याबरोबरच स्वावलंबन कार्डची सुविधा घाटीत सुरू झाली आहे, असे डॉ. सतीश मसलेकर यांनी सांगितले.


मुंबईला जाणे थांबले
पूर्वी रक्त घटकासाठी मुंबईला जावे लागत असे. दोन महिन्यांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात सुविधा मिळाली. त्यामुळे मुंबई गाठायची वेळ येत नाही, असे सागर चुगडे, सौरभ धूत यांनी सांगितले.
 


Web Title: Hemophilia patients get 'Swavalamban card'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.