औरंगाबाद : प्रसिद्ध गायक नट
कृष्णराव हेरंबकर यांचा न्यू ऋग्वेदी हॉल सार्वजनिक उत्सव मंडळाने सत्कार आयोजित केला होता. या सोहळ्यात सत्कारमूर्तींनाच येण्यास उशीर होतो. उशीर का होतो, त्यांना कार्यक्रमस्थळी येण्यासाठी काय काय करावे लागते याचे विनोदी चित्रण दिलीप प्रभावळकर लिखित ‘हसवाफसवी’ या धमाल नाटकाच्या रूपाने सखींसमोर सादर करण्यात आले. या सोहळ्यातील विनोदी संवादांनी हास्याचे कारंजे फुलले.
लोकमत सखी मंचतर्फे सखी मंच सदस्यांसाठी जिगिषा आणि अष्टविनायक निर्मित ‘हसवाफसवी’ या नाटकाचा सखींनी मनसोक्त आस्वाद घेतला. अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी या नाटकात एक नाही, दोन नाही, तब्बल सहा विनोदी भूमिका साकारल्या. ‘हसवाफसवी’ नाटकाच्या दोन्ही अंकांत वातावरण खिळवून ठेवले. दिलीप प्रभावळकरांनी इतिहास घडवलेली सहा पात्रे पुष्कर श्रोत्रींनी हुबेहूब सादर करून रसिकांची दाद मिळवली. यात चिमणराव, प्रिंन्स वाटूकिंग, चिंग्पो अ‍ॅलन, नाना पुंजे, सहा मुलांची आई पूर्वी श्रोत्री आणि शेवटी कृष्णराव हेरंबकर या पात्रांचा समावेश आहे. यातील स्त्री पात्र पूर्वी श्रोत्रीला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
माहेरवाशीण असलेली पूर्वी आपल्या पती आणि मुलांना परदेशात कशी सांभाळते, तसेच पुष्करची जुळी बहीण असूनही त्याच्यापासून दूर कशी या संदर्भातील सविस्तर माहिती ‘तिने’ विनोदी ढंगात मांडली.
सत्कार सोहळ्यासाठी सज्ज असलेल्या व्यासपीठावर वाघमारे आणि मोहिनी यांची शब्दांची उत्कृष्ट जुगलबंदी रसिकांना हसवण्यास भाग पाडत होती. ताण, कामाचा व्याप विसरून या जुगलबंदीच्या विनोदावर सखी मनसोक्त हसत होत्या. त्यांनी टाळ्या आणि हशा यांच्या साहाय्याने कलाकारांचा उत्साह द्विगुणित केला. या नाटकातून पुष्कर श्रोत्री यांच्या नसान्सात भिनलेला अभिनय दिसून आला. कृष्णराव हेरंबकर यांचा चाहता असलेला चिमणराव घरातून खोटे बोलून सत्कार समारंभासाठी उपस्थित कसा राहतो याचे उत्कृष्ट सादरीकरण त्यांनी केले. त्यांनी साकारलेल्या सर्व भूमिकांनी रसिकांच्या मनात घर केले. त्यात कोंबडी विक्रेता, त्याचा मुलगा, चीनचा राजपुत्र, पूर्वी श्रोत्री या भूमिकांनी रसिकांसाठी ‘हसवाफसवी’चा प्रयोग खऱ्या अर्थाने सफल झाला.
यावेळी सखी मंचच्या सचिव अनिता कोटगिरे, कमिटी मेंबर गीता अग्रवाल, पद्मजा मांजरमकर, नीता पानसरे आदींची उपस्थिती होती.