महिला शेतकर्‍यांची शासकीय अधिकार्‍यांकडून घोर थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:57 PM2018-03-26T22:57:04+5:302018-03-26T23:00:27+5:30

परिस्थितीने पिळवटून निघालेल्या आणि दु:ख गिळून पुन्हा नव्याने उभ्या राहिलेल्या अनेक एकल महिला सोमवारी मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे झालेल्या चर्चासत्रात त्यांच्या व्यथा मांडत होत्या.

Government Officials makes jokes against women Farmer's | महिला शेतकर्‍यांची शासकीय अधिकार्‍यांकडून घोर थट्टा

महिला शेतकर्‍यांची शासकीय अधिकार्‍यांकडून घोर थट्टा

googlenewsNext

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : परिस्थितीने पिळवटून निघालेल्या आणि दु:ख गिळून पुन्हा नव्याने उभ्या राहिलेल्या अनेक एकल महिला सोमवारी मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे झालेल्या चर्चासत्रात त्यांच्या व्यथा मांडत होत्या. त्यांच्या अडचणी विभागीय आयुक्तांना, राज्य महिला आयोगाला सांगत होत्या. त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीची दाहकता उपस्थितांना चटके देत होती आणि त्याचवेळी या महिलांच्या संदर्भात सरकारी अधिकार्‍यांनी सादर केलेला सरकारी अहवाल धादांत खोटा असल्याची धक्कादायक माहिती विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांना समजली आणि त्यांनी दि. ४ एप्रिलला पुन्हा एकदा मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. 

महाराष्ट्र राज्य महिला आयोग, महिला किसान अधिकार मंच (मकाम) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विभागीय आयुक्तालय यांच्या सहकार्याने दि. २६ रोजी ‘मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकर्‍यांचे प्रश्न’ या विषयावर दोनदिवसीय चर्चासत्राचे आयोजन क रण्यात आले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, उपायुक्त वर्षा ठाकूर, महसूल प्रबोधिनीचे संचालक सावरगावकर, मकामच्या सीमा कुलकर्णी, तहसीलदार आम्रपाली कासोदेकर, जिल्हा महिला बालविकास अधिकारी तृप्ती ढेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेचे उद्घाटन झाले.

उपस्थितांशी संवाद साधताना भापकर यांनी प्रश्न विचारला की, दि. १५ नोव्हेंबर २०१७ रोजी विभागीय आयुक्तालयातर्फे मराठवाड्यातील ४०० अधिकार्‍यांना आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेले होते, त्यानुसार आपल्यापैकी किती जणींच्या घरी हे अधिकारी येऊन गेले? यावर १०० ते १५० महिलांपैकी अवघ्या तीन-चार महिलांनीच अधिकारी येऊन गेल्याचे सांगितले. हे धक्कादायक सत्य कळाल्यावर सरकारी अधिकार्‍यांनी कामात केलेला ढिसाळपणा आयुक्तांच्या लक्षात आला आणि आता दि. ४ एप्रिल रोजी पुन्हा एकदा हे अधिकारी मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करतील, इतकेच नव्हे तर या कुटुंबांच्या अडचणी सोडविण्यासाठी एकेक कुटुंब दत्तक घेतील, असे आश्वासन दिले. त्याचबरोबर येत्या सहा महिन्यांत सर्वेक्षण करून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना सरकारी योजनेतून घर क से देता येईल, याचा जोरदार प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

भापकर यांनी तुतीची लागवड, रेशीम उत्पादन, गटशेती यासारखे उपाय समजावून सांगितले. त्याचबरोबर आपल्या शेतात पिकणारा माल योग्य किमतीत विकण्यासाठी ‘मार्के टिंग’चे तंत्र शिकून आपण सक्षम बनावे, असे नमूद केले. दरम्यान, स्थानिक पर्यायी संस्थांचे विश्वनाथ तोडकर यांनी प्रास्ताविकातून या महिलांना न्याय, शासकीय धोरण, हाताला काम आणि समाजाक डून सन्मान मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. कुलकर्णी यांनी मकाम संस्थेची माहिती दिली. 

वारसाहक्क नोंदणी शिबिराची आवश्यकता

शेतकरी महिलांच्या नावावर जमीन, विहीर, घर यापैकी काहीही नसते. त्यामुळे तालुकास्तरावर वारसाहक्क नोंदणी शिबिरांचे आयोजन करावे, असे विजया रहाटकर यांनी विभागीय आयुक्तांना सुचविले. त्याचबरोबर ‘प्रेरणा’ या आरोग्यविषयक प्रकल्पामध्ये शेतकर्‍याची पत्नी आणि मुले यांना सहभागी करावे आणि एकल महिलांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यास मदत व्हावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष संसाधन कक्ष सुरू करावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

आमच्या लेकरांना शिक्षण द्या

आमचे आयुष्य तर असेच गेले; पण आता आमच्या लेकरांना तरी चांगले शिक्षण मिळावे, कामधंदा मिळावा, हीच आमची अपेक्षा आहे. आमच्यासाठी काही करू नका; पण आमच्या लेकरांना शिक्षण देण्यास मदत करा, त्याच अपेक्षेने आम्ही इथे आलो आहोत, अशी व्यथा अनेक जणींनी मांडली. अनेकींकडे स्वत:चे रेशनकार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड नाही. ८० टक्के महिलांचे वय हे २२ ते ३० या वयोगटातले आहे. समाजाच्या वाईट नजरा, आर्थिक चणचण आणि मुलांच्या भविष्याची चिंता हे प्रश्न प्रत्येकीपुढे आ-वासून उभे आहेत. औरंगाबादमध्ये होणार्‍या या परिषदेला औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील एकही महिला उपस्थित नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे. पर्यायी संस्थेच्या सुनंदा खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद येथून आलेल्या महिलांची संख्या मात्र सर्वाधिक आहे. 

लेकरांनो, पप्पांनी टाकून दिलं, तरी मी आहे...

नवर्‍याने आमचा विचार न करता स्वत:ला संपवलं. शेतही माझ्या नावावर नव्हतं आणि राहायला घरही नव्हतं. दु:खाचा डोंगर कोसळला होता, ‘आई आता पप्पा न्हायी, आपण काय करायचं’ असं म्हणून पोरगा सारखं रडायचा. तेव्हा धीर एकवटला आणि म्हटले, माझ्या चिमण्यांनो पप्पांनी टाकून दिलं तरी मी खंबीर होऊन तुम्हाला सांभाळील. चार फळ्या जोडल्या आणि आडोसा करून लेकराबाळांना घेऊन तशा घरात राहू लागले. सोन्याचे मणी होते तेवढे मोडले आणि संसाराला सुरुवात केली, अशी स्वत:ची कहाणी तुळजापूर तालुक्यातल्या रुक्मिणी बरगंडे यांनी धीरगंभीर शब्दांत सांगितली आणि उपस्थितांची हृदये पिळवटून निघाली.

Web Title: Government Officials makes jokes against women Farmer's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.