Good evening at Sai Prakash in Vaijapura | वैजापुरात साईभक्तीचे मंगलमय सूर
वैजापुरात साईभक्तीचे मंगलमय सूर

वैजापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री साईभक्त बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या ‘साईची वारी, शिर्डीच्या दारी’ या उपक्रमांतर्गत शहरातील मोठ्या संख्येने साईभक्तांनी वैजापूर ते शिर्डी पायी दिंडीमध्ये सहभाग नोंदविला. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर सार्इंचाच जयघोष ऐकू येत होता.
सार्इंच्या गजरात दंग झालेल्या वैजापूरकरांमुळे रविवारी शहराला शिर्डीची शोभा आली होती. वृक्षलागवड ,स्वच्छता, पर्यावरण असे विविध विषय हाती घेऊन वारकऱ्यांसोबत माळकरी आणि टाळकरी विद्यार्थीही दिंडीमध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, नयनरम्य पालखी सोहळ्याने वैजापूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. टाळ-मृदंगामुळे वातावरणात सार्इंचाच गजर ऐकू येत होता. विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत वारकºयांच्या सेवेसाठी रस्त्यावर स्टॉल लावले होते. पहाटे चार वाजता शहरातील महादेव मंदिरापासून साईबाबांच्या पालखीसह शिर्डी दिंडीस सुरुवात झाली.
यावेळी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, संस्थेचे अध्यक्ष विशाल संचेती, कैलास साखरे, योगिता साखरे, राजेंद्र लालसरे, रेवती लालसरे, आशाबाई आगळे, प्रशांत गायकवाड, नितिन लुनावत, शुभम् लालसरे, मनोज दौडे, सुधीर लालसरे, पारस घाटे, उमेश वाळेकर, धोंडीरामसिंह राजपूत, शैलेश पोंदे यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली. नागपूर-मुंबई महामार्गावरील आठ तासांच्या प्रवासादरम्यान वैजापूर पालिका, साईभक्त, महादेव मित्र मंडळ व इतर संस्थांच्या वतीने दिंडीतील भाविकांसाठी चहा, नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रविवारी दुपारी दिंडी शिर्डीत पोहोचल्यानंतर या भाविकांसाठी साई संस्थानने दर्शनाची व्यवस्था केली होती.
४२ कि. मी. पायी दिंडी
पहाटे चार वाजता शहरातील महादेव मंदिरापासून साईबाबांच्या पालखीसह शिर्डी दिंडीस सुरुवात झाली. तब्बल ४२ कि.मी. अंतर आठ ते नऊ तासात पूर्ण करण्यात आले. पालखी वैजापुरातून जाणार म्हणून रस्ते झाडून पुसून ठेवल्यासारखे दिसत होते. पालखी मार्गावर सडे रांगोळ्या काढलेल्या होत्या. वातावरणात एक वेगळाच उत्साह होता. बेलगाव, सटाणा, कोपरगाव मार्गे दुपारी साईभक्त शिर्डीला पोहोचले.
नजर जाईल तिथपर्यंत भक्तसागर
पायी दिंडीत दहा वर्षांपासून ते सत्तर वर्षे वयोगटातील भक्तांचा जनसागर रस्त्यावर दिसत होता. कोणी गप्पा टप्पा करत तर कुणी भजन म्हणत, काही तर मौन पाळत भक्तिभावाने निघाले. अर्ध्यापेक्षा जास्त भक्त अनवाणी पायाने चालत होते. पहाटेच्या वेळेस थंड वारा मन उल्हासित करत होता. डोक्यामध्ये विचारचक्र चालू झाले होते. सारे जण साईच्या दर्शनासाठी उतावीळ झाले होते. रस्त्यात ठिकठिकाणी खिचडी, पोहे, पाणी वाटप केले जात होते.


Web Title:  Good evening at Sai Prakash in Vaijapura
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.