‘स्टारडम’ न बाळगता काम करणारा अभिनेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 04:53 PM2019-06-11T16:53:24+5:302019-06-11T17:01:09+5:30

शिव कदम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सरगम’ या मराठी चित्रपटात कर्नाड यांनी भूमिका साकारली असून, हा त्यांचा शेवटचा  चित्रपट ठरला आहे.

Girish Karnad : a actor works without 'Stardom' | ‘स्टारडम’ न बाळगता काम करणारा अभिनेता

‘स्टारडम’ न बाळगता काम करणारा अभिनेता

googlenewsNext
ठळक मुद्दे या चित्रपटाचे शूटिंग इगतपुरी, भंडारदरा, कळसूबाई या भागात झाले. ते संपूर्ण चित्रीकरण होईपर्यंत सेटवरच असायचे. त्यांना दिलेली स्वतंत्र गाडीही त्यांनी नाकारली होती. 

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : अभिनेते, नाटककार म्हणून ते खूप मोठे होते. पण तरीही त्यांच्या या प्रसिद्धीचे वलय, ‘स्टारडम’ कुठेही न बाळगता त्यांनी अगदी समरसून आमच्यासोबत काम केले. गिरीश कर्नाड यांच्या याच साधेपणामुळे आपण एखाद्या दिग्गज व्यक्तीसोबत काम करीत आहोत, याचे आम्हालाही कधी दडपण जाणवले नाही, अशा शब्दांत दिग्दर्शक शिव कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि गिरीश कर्नाड यांच्या आठवणींना उजाळा दिला.

शिव कदम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सरगम’ या मराठी चित्रपटात कर्नाड यांनी भूमिका साकारली असून, हा त्यांचा शेवटचा  चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण झाले असून, हा चित्रपट आता सेन्सॉरला गेला आहे आणि लवकरच काही दिवसांमध्ये प्रदर्शित होईल. पण कर्नाड यांच्या निधनामुळे आता हा चित्रपट पाहताना ते आमच्यासोबत नसतील, अशी खंत कदम यांनी व्यक्त केली.

चित्रीकरणादरम्यानच्या आठवणी सांगताना कदम म्हणाले की, आतापर्यंत आपण कर्नाड यांना अत्यंत गंभीर भूमिकांमध्ये पाहिले आहे. पण या चित्रपटातील त्यांची भूमिका वेगळी आहे. नोकरी सोडून जंगलामध्ये भटकंती करणारा, गावकऱ्यांमध्ये मिसळून त्यांच्यापैकीच एक झालेला अवलिया त्यांनी यात साकारला आहे. या चित्रपटाचे शूटिंग इगतपुरी, भंडारदरा, कळसूबाई या भागात झाले. या भागातील लोक हटकर कानडी भाषा बोलतात. 
चित्रपटातही हीच भाषा वापरण्यात आली आहे. कर्नाड सरांना ही भाषा बोलता यायची, त्यामुळे ते गावकऱ्यांमध्येही अगदी सहज मिसळून गेले होते. चित्रपटाचा गंधही नसलेल्या त्या गावकऱ्यांना जाणीवही नसेल की, कर्नाड यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत आपण राहत होतो. चित्रीकरण ८ वाजता सुरू व्हायचे. कर्नाड यांचे शेड्युल उशिरा असायचे, तरी पण ते बरोबर ८ वाजता सेटवर उपस्थित असायचे. इतर ज्येष्ठ कलाकार आपला शॉट झाला की लगेच त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसतात. पण कर्नाड कधीच असे करायचे नाहीत. ते संपूर्ण चित्रीकरण होईपर्यंत सेटवरच असायचे. त्यांना दिलेली स्वतंत्र गाडीही त्यांनी नाकारली होती. आपण सगळे एकत्रच प्रवास करू जेणेकरून आपल्या गप्पा होतील, असे ते कायम म्हणायचे. त्यांच्या याच साधेपणामुळे सेटवरचे वातावरण कायम आनंदी, प्रसन्न राहायचे.

कर्नाड यांना भावला ‘दगडांचा देश’
महाराष्ट्राला ‘दगडांच्या देशा’ असे का म्हटले जाते हे आजवर मला कळालेच नव्हते. पण या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, सह्याद्रीच्या भागात फिरलो आणि या प्रश्नाचे उत्तर मिळाले. ‘दगडांच्या मधले सौंदर्य’ आज तुमच्यामुळे मला पाहायला मिळाले, अशा शब्दांत कर्नाड यांनी शिव कदम यांच्याकडे महाराष्ट्राबाबतच्या भावना व्यक्त केल्या होत्या. 

साधेपणा भावला
चित्रपटात भूमिका साकारावी म्हणून कर्नाड यांना फोन केला तर लगेच त्यांनी फोनवरच होकार कळविला. चित्रपटाची कथा तर ऐका, असे म्हणताच ते म्हणाले की, ‘तुम्ही एवढी खटपट करून माझ्यापर्यंत आला आहात, यातच सगळे आले’. सहजासहजी कोणीही ज्येष्ठ अभिनेता होकार देण्यापूर्वी दिग्दर्शक कोण, चित्रपटातील इतर व्यक्ती कोण याबाबत चौकशी करतात; पण कर्नाड यांनी असा कोणताही व्यावसायिकपणा दाखविला नाही. अगदी जुजबी मानधन घेऊन त्यांनी आमच्यासोबत काम केले, असेही कदम यांनी सांगितले.

गिरीश कर्नाड यांच्या आठवणी
गिरीश कर्नाड कधी औरंगाबादला आल्याचे मला आठवत नाही. १९७६ साली कमलाकर सोनटक्के नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख असताना कर्नाड यांचे ‘तुघलक’ नाटक साकारण्याची जय्यत तयारी आपल्याकडे सुरू झाली होती. यामध्ये माझीही भूमिका होती. तालमी भरपूर झाल्या; पण काही कारणांमुळे नाटकाचे प्रयोग होऊ शकले नाहीत. २०१३ साली कर्नाड यांना ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पुणे येथे ‘समग्र गिरीश कर्नाड’ हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात मी सहभागी झालो होतो, तेव्हा चार दिवस कर्नाड यांचा भरपूर सहवास मिळाला. त्यांचे विविध भाषांवर असणारे प्रभुत्व प्रामुख्याने जाणवले. या महोत्सवात कर्नाड यांनी त्यांच्या जन्माचा मोठा रंजक किस्सा सांगितला होता. तो असा की, कर्नाड गर्भात असताना त्यांच्या आई-वडिलांना हे मूल नको होते. अ‍ॅबॉर्शन करण्यासाठी त्यांचे आई-वडील पुणे येथील डॉ. गुणे यांच्या दवाखान्यात गेले; पण काही कारणांमुळे नियोजित वेळी नेमक्या डॉ. गुणे तेथे येऊ शकल्या नाहीत आणि अ‍ॅबॉर्शन करणे राहून गेले आणि कर्नाड यांचा जन्म होऊ शकला. त्यामुळेच या महोत्सवात प्रकाशित करण्यात आलेले कर्नाड यांचे आत्मचरित्र ‘खेळता खेळता आयुष्य’ त्यांनी डॉ. गुणे यांनाच समर्पित केले होते.                      - - - सुधीर सेवेकर

Web Title: Girish Karnad : a actor works without 'Stardom'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.