लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाºया महिलांचा सखी सन्मान गौरव पुरस्कार देऊन गुरुवारी एका भव्य कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. थाटात संपन्न झालेल्या या सोहळ्यात ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी भरभरुन कौतुक केले.
लोकमत सखीमंचच्या वतीने महिलांसाठी वर्षभर विविध उपक्रम घेतले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हाभरात सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, औद्योगिक- व्यावसायिक, सांस्कृतिक- साहित्यिक, शौर्य आदी गटात अतुलनीय कामगिरी करणाºया महिलांचा गौरव करण्यासाठी सखी सन्मान पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. या पुरस्कारासाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव ‘लोकमत’ कार्यालयाकडे दाखल झाले. छाननी समितीने केलेल्या निवडीनंतर विजेत्यांना पुरस्कार वितरित करण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात सखी सन्मान गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.डॉ.राहुल पाटील यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.विजय भांबळे, पोलीस उपाधीक्षक सुधाकर रेड्डी, जिल्हा नियोजन अधिकारी ज्योती बगाटे, साई बेन्टेक्स ज्वेलरीचे बालासाहेब घिके, मंगलाताई घिके यांची उपस्थिती होती. यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जया बाळासाहेब जाधव यांना तर क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल राज्य व राष्ट्रीय पातळीवर खो-खो व मैदानी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून परभणीचे नाव उंचावणाºया दीपाली सुक्रे या खेळाडूचा गौरव करण्यात आला. सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या ३० वर्षांपासून गायन करणाºया आशा अशोकराव जोंधळे यांचा तर सामाजिक क्षेत्रात ३१७ महिला गटांच्या माध्यमातून ४ हजार ३१४ महिलांचे संघटन करुन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात मोलाची भूमिका बजावणाºया जयश्री उत्तमराव टेहरे यांचा गौरव करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात एचआयव्ही बाधित महिलांसाठी गेल्या १० वर्षांपासून विविध शिबिरे घेऊन मार्गदर्शन करणाºया व त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणाºया डॉ.दीपाली सुधीर काकडे यांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शौर्य पुरस्कार जम्मू काश्मिर येथे काही दिवसांपूर्वी शहीद झालेले जवान बालाजी अंबोरे यांच्या वीर पत्नी अंजना बालाजी अंबोरे यांना प्रदान करण्यात आला. तसेच पाण्याच्या हौदात पडलेल्या चार वर्षीय अवंती या बालिकेचा जीव वाचविणाºया र्निमयी मुळी या सहा वर्षीय चिमुकलीचा यावेळी प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. गेल्या १८ वर्षांपासून स्व: कर्तृत्वाने कापड व्यवसायाच्या माध्यमातून मुलांचे शिक्षण करुन त्यांना उच्चपदावर नोकरी मिळवून देण्यासाठी खटाटोप करणाºया सेलू येथील यशस्वी उद्योजिका चंदा मेहता यांचाही यावेळी उद्योजक या गटातून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अखिल भारतीय साहित्य संमेलन, मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन, दूरचित्रवाहिन्या आदींच्या माध्यमातून स्त्रियांच्या प्रश्नांवर लिखाण करणाºया व बाजू मांडणाºया लेखिका सरोज चंद्रकांत देशपांडे यांचा यावेळी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रत्येक गटातून द्वितीय क्रमांकावर असलेल्या महिला सदस्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हा नियोजन अधिकारी ज्योती बगाटे यांनी ‘लोकमत’च्या वतीने महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू कांबळे यांनी तर कार्यक्रमाची भूमिका शाखाधिकारी मोहन शिंदे यांनी विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्र्यंबक वडसकर यांनी तर आभार मोहन बोराडे यांनी मानले. या कार्यक्रमाचे प्रायोजक साई बेन्टेक्सचे बालासाहेब घिके होते.