Ganpati Festival: Near Paithan, the country's only Nidrist Ganapati Temple | Ganpati Festival : पैठणजवळ आहे देशातील एकमेव निद्रिस्त गणपती मंदिर
Ganpati Festival : पैठणजवळ आहे देशातील एकमेव निद्रिस्त गणपती मंदिर

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : खुलताबाद येथील निद्रिस्त अवस्थेतील भद्रा मारुती बहुतांश भक्तांनी बघितला आहे. मात्र, त्याच सारखा निद्रिस्त गणपती आहे.  हे वाचून आपल्याला आर्श्चयाचा धक्का बसला असेल; पण हे तेवढेच सत्य आहे. पैठणपासून अवघ्या ३० कि.मी. अंतरावर आव्हाणे या गावात श्रीगणेशाचे मंदिर आहे. असे म्हणतात की, देशातील ही गणरायाची निद्रिस्त अवस्थेतील एकमेव मूर्ती आहे. ती सुमारे ५०० वर्षे जुनी असल्याचे म्हटले जाते.  

ऐकावे ते नवलच... असेच उच्चार आपल्या मुखातून बाहेर पडले असतील. यंदाच्या गणेशोत्सवात निद्रिस्त श्रीगणेशाच्या मूर्तीचे दर्शन घेणे गणेशभक्तांसाठी पर्वणीच ठरणार आहे. पैठणपासून ३० कि.मी, तर शेवगावपासून १३ कि.मी. अंतरावर आव्हाणे (बुद्रुक) नावाचे छोटेशे खेडे आहे. याच ठिकाणी निद्रिस्त अवस्थेतील दक्षिणमुखी गणपतीची स्वयंभू मूर्ती आहे. पूर्वी येथे छोटेशे मंदिर होते.  राज्य सरकारने २००५ मध्ये  या मंदिराचा समावेश तीर्थक्षेत्राच्या यादीत केला. त्याद्वारे मिळालेल्या ४४ लाख रुपये निधीतून  मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला.  येथे आता  चिरेबंदी मंदिर उभे राहिले आहे.  जमिनीपासून तीन फूट खोल असलेली गणपतीची मूर्ती तीन बाय अडीच फुटांची व शेदरी रंगातील तिही दक्षिणमुखी आहे. वरील बाजूस काचेचे तावदान केले आहे. आत मूर्ती दिसण्यासाठी छोटासा लाईटही बसविण्यात आला आहे. ही श्रीमूर्ती पाहून प्रत्येक गणेशभक्त लीन होतो.

या मूर्तीच्या पाठीमागील बाजूस भिंतीमध्ये मोरेश्वराची मूर्ती ठेवण्यात आली आहे,  तर बाजूच्या गाभाऱ्यात आणखी एक गणेशमूर्ती आहे.  उल्लेखनीय म्हणजे एकाच मंदिरात वेगवेगळ्या आकारातील तीन गणेशमूर्ती आपणास पाहण्यास मिळतात.   निसर्गरम्य परिसरात, प्रसन्न, शांत व निवांत वातावरणात भाविक हरखून जातात. 

स्वयंभू गणेशमूर्ती
निद्रिस्त गणपती मंदिराचे पुजारी  प्रदीप भालेराव यांनी सांगितले की, दादोबा देव हे गणेशभक्त होते. दरवर्षी ते मोरगावच्या मोरेश्वराच्या दर्शनाला पायी जात. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र गणोबा देव हे शेतात नांगरणी करताना नांगराचा फाळ एका वस्तूला लागून अडला. उकरल्यावर एक स्वयंभू गणेशाची निद्रिस्त अवस्थेतील मूर्ती दिसली. ही घटना ५०० वर्षे जुनी आहे. त्याच ठिकाणी आता भव्य मंदिर बांधले आहे. 


Web Title: Ganpati Festival: Near Paithan, the country's only Nidrist Ganapati Temple
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.