विजय सरवदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पर्यटनाच्या जागतिक नकाशावर औरंगाबाद जिल्हा प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो देशी- विदेशी पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना भेट देत असतात. अपंगांना विदेशी भाषा अवगत झाल्यास ते विदेशी पर्यटकांसोबत सहज संवाद साधतील. स्वयंरोजगाराच्या वेळी त्यांना भाषेचा अडसर ठरणार नाही, या हेतूने जिल्हा परिषदेने पहिल्यांदाच समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून अपंग तरुणांना विदेशी भाषेचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
अपंगांच्या योजनांप्रती अधिकारी- कर्मचाºयांच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ नुकतेच ‘प्रहार’ संघटनेने जिल्हा परिषदेसमोर ‘झोपा काढो’ आंदोलन केले होते. असे असले तरी जिल्हा परिषदेने या आंदोलनापूर्वीच आपल्या अर्थसंकल्पात अपंगांसाठी विविध लोकोपयोगी योजनांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विदेशी भाषा विभागाच्या माध्यमातून अपंगांना विदेशी भाषेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी समाजकल्याण विभागाने १० लाख रुपयांची तरतूद केली आहे. ज्या सुशिक्षित बेरोजगार अपंगांना विदेशी भाषेचे ज्ञान संपादन करायचे आहे, अशा अपंगांकडून २१ आॅगस्टपर्यंत प्रस्ताव मागविले जाणार आहेत.
अपंगांबरोबर ग्रामीण भागातील अनुसूचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांनाही विदेशी भाषा आणि स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. ‘बार्टी’मार्फत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते. यामध्ये मोजक्याच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लाभ मिळतो. जे विद्यार्थी- विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले भवितव्य घडवू इच्छितात, त्यांनाही खाजगी संस्थांच्या माध्यमातून मार्गदर्शन घेता यावे, यासाठी जि.प.च्या समाजकल्याण विभागाने या योजनेचा नव्याने समावेश केला आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.