औरंगाबादेत नशेच्या पाच हजार गोळ्या जप्त; सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 01:29 PM2019-01-21T13:29:58+5:302019-01-21T13:31:45+5:30

औरंगाबाद शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्याची पहिलीच कारवाई आहे.

Five thousand drug tablets seized in Aurangabad; Big action on the second day in a row | औरंगाबादेत नशेच्या पाच हजार गोळ्या जप्त; सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई

औरंगाबादेत नशेच्या पाच हजार गोळ्या जप्त; सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देएक दिवसापूर्वी ८०० गोळ्या जप्तआरोपीकडून नायट्रोसनच्या गोळ्या जप्त.

औरंगाबाद : नशेसाठी नायट्रोसन या गुंगी आणणाऱ्या औषधी गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एकाला जिन्सी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपीकडून नायट्रोसनच्या तब्बल पाच हजार गोळ्या जप्त केल्या. औरंगाबाद शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्याची पहिलीच कारवाई आहे.

सय्यद झकियोद्दीन सय्यद शमशुद्दीन (वय २६, रा. नायगाव रोड, सावंगी), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. चंपा चौकात एका दुचाकीवरून येणाऱ्याकडे नायट्रोसनच्या गोळ्यांचा मोठा साठा असल्याची माहिती खबऱ्याने जिन्सी पोलिसांना दिली. त्यावरून पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त गुणाजी सावंत, पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर, पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके, सहायक उपनिरीक्षक अय्युब पठाण,  कर्मचारी संजय गावंडे, धनंजय पाडळकर, गणेश नागरे यांनी शनिवारी दुपारी चंपाचौकात सापळा रचला.

संशयित तरुण मोटारसायकलवरून तेथे येताच पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडील बॅगची पोलिसांनी झडती घेतली असता बॅगमध्ये नायट्रोसन या गुंगी आणणाऱ्या औषधांची तब्बल पाचशे पाकिटे (स्ट्रीप ) आढळली. या स्ट्रीपमध्ये एकूण पाच हजार गोळ्या असल्याचे समोर आले. आरोपीविरोधात जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसूरकर यांनी दिली.

जिन्सी पोलिसांनी सांगितले की, शहरातील विविध वसाहतींमधील तरुण नशा करण्यासाठी नायट्रोसन गोळ्या खातात. या गोळ्यांचे सतत सेवन केल्यामुळे मानवी शरीरावर प्रचंड दुष्पपरिणाम होतो. शिवाय गोळ्यांची नशा करणारा कोणताही गुन्हा करताना मागचा-पुढचा विचार करीत नाही. यामुळे शहरातील गुन्हेगारी वाढल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना प्राप्त झाल्या होत्या. आयुक्तांनी याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. 

एक दिवसापूर्वी ८०० गोळ्या जप्त
जिन्सी पोलिसांनी एक दिवसापूर्वी नायट्रोसन गोळ्यांची विक्री करणाऱ्या तीन जणांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे ८०० गोळ्या जप्त केल्या. ही कारवाई ताजी असतानाच आज पुन्हा धडक कारवाई करून नशेखोरांना दणका दिला. 

Web Title: Five thousand drug tablets seized in Aurangabad; Big action on the second day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.