ठळक मुद्दे शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र काही थांबले नसून आज मराठवाड्यातील चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी कर्जापायी आपली जीवनयात्रा संपवली. मराठवाड्यातील बीड, परभणी , उस्मानाबाद व नांदेड अशा चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी केल्या आत्महत्या

मराठवाडा : शेतकरी कर्जमाफी मिळण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे.मात्र, तरीही शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र काही थांबले नसून आज मराठवाड्यातील चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी कर्जापायी आपली जीवनयात्रा संपवली. 

पावसाचे प्रमाण जास्त असो कि कमी शेतक-यांच्या मागची कर्जाची आणि नापिकीचे चक्र काही सुटता सुटत नाही. याचीच प्रचीती सातत्याने होत असलेल्या शेतक-यांच्या आत्महत्येमुळे येत आहे. सरकारने नुकतीच शेतक-यांना कर्जमुक्ती जाहीर केली असून त्या रकमेचे वितरणही सुरु झाले आहे. मात्र, असे असतानाही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.  आज मराठवाड्यातील बीड, परभणी , उस्मानाबाद व नांदेड अशा चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

परभणी - 
पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील बाळासाहेब रणेर या ३२ वर्षीय उच्चशिक्षित शेतक-याने कर्जबाजारीपणामुळे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला ३ एकर जमीन होती व त्याच्या नवे राष्ट्रीयकृत बँकेचे १ लाख ८० हजार इतके कर्ज होते. 

बीड -
पाटोदा तालुक्यातील लिंबादेवी ऊखंडा येथील अडाले वस्तीवरील राहणा-या बाळासाहेब महादेव जाधव या ३२ वर्षीय शेतक-याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या वडिलांच्या नावे बँकेचे कर्ज असून त्यांना ४ एकर जमीन होती.  

नांदेड - 
लोहा तालुक्यातील पिंपळगाव (ढगे) येथील 38 वर्षीय शेतकरी तुकाराम माधव कापसे या शेतक-याने आज सकाळी आपल्याच शेतात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. २ एकर ६ गुंठे जमीन असलेल्या कापसे यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळुन आपल्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 

 

उस्मानाबाद - 
परंडा तालुक्यातील आवारपिंपरी येथे हातचे खरीप पीक वाया गेल्याने व बँकेकडे कर्जासाठी अर्ज करूनही त्याचे वितरण न झाल्याने लांबाजी डाकवाले या ४२ वर्षीय शेतक-याने आज सकाळी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. डाकवाले यांच्या मुलीचा विवाह निश्चित झाला आहे. यापूर्वीच त्यांनी आर्थिक विवंचनेने त्रस्त होत आपली जीवनयात्रा संपवली. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.