तोतया पोलिसाने नोकरीचे आमिष देऊन पाच लाख लुबाडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 05:51 PM2018-10-19T17:51:09+5:302018-10-19T17:51:37+5:30

वन विभागात लिपिकपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ओळखीच्या कुटुंबाकडून पाच लाख रुपये घेऊन पसार

fake police looted five lakhs from relative | तोतया पोलिसाने नोकरीचे आमिष देऊन पाच लाख लुबाडले 

तोतया पोलिसाने नोकरीचे आमिष देऊन पाच लाख लुबाडले 

googlenewsNext

औरंगाबाद : वन विभागात लिपिकपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ओळखीच्या कुटुंबाकडून पाच लाख रुपये घेऊन पसार झालेल्या तोतया पोलिसाला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली.

रवींद्र नाना दांडगे ऊर्फ राजेंद्र जाधव (३२, रा. चेतनानगर, हर्सूल) असे अटकेतील तोतया पोलिसाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की,  संघर्षनगर, मुकुंदवाडी येथील विजय सीताराम हिवाळे हे शासकीय सेवेत आहेत. आरोपी हा त्यांच्या ओळखीचा आहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात आरोपी त्यांना भेटला तेव्हा त्याने तो पोलीस कर्मचारी असून, जालना येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगितले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चांगली ओळख असल्याने आपण आतापर्यंत अनेकांना नोकरीला लावले आहे. कोणाला नोकरीला लावायचे असेल तर सांगा, अशी थाप त्याने मारली. हिवाळे यांचा भाचा पदवीधर असून तो नोकरीच्या शोधात आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भाच्याला नोकरीची गरज असल्याचे सांगितले. ‘मी तुमच्या भाचाला वन विभाग अथवा जेल विभागात क्लार्कपदी नोकरीला लावू शकतो. मात्र त्याकरिता पाच लाख रुपये द्यावे लागतील’, असे  तो म्हणाला.

त्यानंतर तक्रारदारांनी त्यांचे भावजी, बहीण आणि भाचे यांच्यासोबत आरोपीची भेट घेतली. तेव्हा त्याने तातडीने दोन लाख रुपये आणि नोकरीची आॅर्डर हातात पडल्यानंतर तीन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांनी पैशाची जमवाजमव करून आरोपीला दोन लाख रुपये दिले. त्याने तीन महिन्यांत नोकरीचे काम होईल, तेव्हा उर्वरित पैशांची तयारी करा, असे म्हणून तो पैसे घेऊन निघून गेला. 

एक महिन्यानंतर आरोपीने त्यांना फोन करून सांगितले की, तुमच्या भाच्याच्या नोकरीचे काम झाले आहे. तुम्ही तीन लाख रुपये द्या.  आरोपीच्या सांगण्यावरून तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांनी तीन लाख रुपये आरोपीला दिले. 

मुंबईला मंत्रालयात नेले अन् पोबारा केला..
मंत्रालयातून आॅर्डर आणण्यासाठी मुंबईला जायचे आहे, अशी थाप मारून आरोपीने तक्रारदार, त्यांचे भावजीस मुंबईला नेले. ‘मी सरकारी कर्मचारी असल्याने मला मंत्रालयात प्रवेशिका लागत नाही. तुम्ही प्रवेशिका घेऊन दुसऱ्या गेटने वन विभागात या,’ असे तो त्यांना म्हणाला. नंतर आरोपीने फोन बंद करून तो गायब झाला. दिवसभर  थांबूनही तो भेटला नाही. तक्रारदार परत आले आणि त्यांनी थेट आरोपीविरोधात मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक बनसोड यांनी आरोपीला अटक केली.

Web Title: fake police looted five lakhs from relative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.