अभियांत्रिकी ‘एटीकेटी’ची मर्यादा वाढ रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:25 AM2017-11-21T00:25:49+5:302017-11-21T00:25:54+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाने अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाला कॅरिआॅन आणि इतर वर्षांसाठी ५० टक्क्यांपर्यंत एटीकेटीची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला होता.

 Engineering 'ATKT' limit extension canceled | अभियांत्रिकी ‘एटीकेटी’ची मर्यादा वाढ रद्द

अभियांत्रिकी ‘एटीकेटी’ची मर्यादा वाढ रद्द

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाने अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाला कॅरिआॅन आणि इतर वर्षांसाठी ५० टक्क्यांपर्यंत एटीकेटीची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे कुलपती तथा राज्यपालांच्या आॅर्डिनन्सचे उल्लंघन होत असल्यामुळे विद्यमान परीक्षा संचालकांनी एटीकेटीची मर्यादा वाढविण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. यामुळे ही वाढ रद्द करत सर्वच वर्षांना कॅरिआॅन देण्याची घोषणा कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी केली.
विद्यापीठ प्रशासनाने अभियांत्रिकीची काही महाविद्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न झाल्यामुळे अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सरसकट कॅरिआॅन दिली, तर संघटनांच्या आंदोलनांमुळे द्वितीय, तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या एटीकेटीची मर्यादा २५ टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर करण्यात आली होती. मात्र विद्यापीठांच्या कुलपतींनी एटीकेटीसंदर्भात सर्वांसाठी एक आॅर्डिनन्स (अधिनियम) मंजूर केलेला आहे. या आॅर्डिनन्सनुसार एटीकेटीची मर्यादा वाढवता येत नाही. ती वाढविण्यासाठी आॅर्डिनन्समध्ये बदल करावा लागतो. ही कोणतीही प्रक्रिया विद्यापीठ प्रशासनाने पाळली नसल्यामुळे नुकताच परीक्षा संचालकपदाचा पदभार घेतलेले डॉ. दिगंबर नेटके यांनी एटीकेटीची मर्यादा वाढविण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. यामुळे मागील निर्णयानुसार विद्यार्थ्यांनी पुढील वर्षात घेतलेले प्रवेश धोक्यात आले होते. यावर तोडगा काढण्यासाठी मागील आठवड्यापासून अभियांत्रिकीचे प्राचार्य, परीक्षा विभागातील अधिकाºयांचा खल सुरू होता. यावर शेवटी सोमवारी तोडगा निघाला. यात एटीकेटीची मर्यादा वाढ रद्द करण्यात आली आहे. तर प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना कॅरिआॅन देण्याचा निर्णय घेतला आहे.
असा मिळणार पुढील वर्गात प्रवेश
विद्यापीठाने कॅरिआॅन आणि एटीकेटीसंदर्भात १९,२४ आणि २८ आॅगस्ट रोजी काढलेली परिपत्रके रद्द केली आहे. नवीन परिपत्रकानुसार एटीकेटीऐवजी कॅरिआॅन देण्यात आला आहे. अभियांत्रिकीच्या सर्वच अभ्यासक्रमाच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रथम वर्षातून द्वितीय वर्षात, द्वितीयमधून तृतीय आणि तृतीय वर्षातून अंतिम वर्षात अनुक्रमे कॅरिआॅन अंतर्गत तात्पुरता प्रवेश मिळेल. हे विद्यार्थी लेखी, प्रात्यक्षिक परीक्षासह अंतर्गत टेस्ट, टर्म वर्क पूर्ण करण्यास पात्र समजण्यात येतील; परंतु या विद्यार्थ्यांना लगतच्या पुढील वर्गामध्ये प्रवेश घेण्यापूर्वी मागील वर्गातील टर्म नियमानुसार पूर्ण करणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी प्रथम वर्षात उत्तीर्ण नाहीत. त्यांनी द्वितीय वर्षाला एटीकेटीअंतर्गत प्रवेश घेऊन टर्म पूर्ण केलेली आहे. त्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात उत्तीर्ण असल्याशिवाय तृतीय वर्षाची लेखी, प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अर्ज भरता येणार नाही.
मात्र, तृतीय वर्षाला तात्पुरता प्रवेश घेऊन क्लास टेस्ट, टर्मवर्क पूर्ण करूशकतात. हे विद्यार्थी प्रचलित नियमानुसार पात्र ठरल्यावरच द्वितीय सत्राची किंवा त्यापुढील तृतीय वर्षाच्या दोन्ही सत्रांची परीक्षा देऊ शकणार आहेत. हाच नियम द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही अंतिम वर्षासाठी लागू असणार आहे.

Web Title:  Engineering 'ATKT' limit extension canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.