चोरांच्या मृत्यूप्रकरणी आठ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:46 AM2018-06-10T00:46:30+5:302018-06-10T00:46:57+5:30

४०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल : पोलिसांच्या कोम्बिंग आॅपरेशनविरुद्ध वैजापुरात मोर्चा

 Eight people arrested on the death of thieves | चोरांच्या मृत्यूप्रकरणी आठ जणांना अटक

चोरांच्या मृत्यूप्रकरणी आठ जणांना अटक

googlenewsNext

वैजापूर : तालुक्यातील चांडगाव -पानव येथे शुक्रवारी जमावाने संशयित चोरांच्या टोळीतील आठ जणांना बेदम मारहाण केल्याने दोघांचा मृत्यू झाला होता, तर ६ चोर जखमी झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी कोम्बिंग आॅपरेशन करुन चांडगाव, जरुळ, पानव भागातील जवळपास चारशे जणांवर खून, जीवे मारण्याचा प्रयत्न व दंगलीचा गुन्हा दाखल केला व आठ जणांना अटक केली.
चोरांच्या दहशतीमुळे आधीच हैराण झालेल्या नागरिकांमध्ये पोलिसांच्या या भूमिकेने भिती निर्माण झाली आहे. दोघांच्या मृत्यू प्रकरणात निष्पाप लोकांना विनाकारण कायद्याच्या कचाट्यात अडकवू नका, अशी मागणी करत माजी आमदार आर.एम. वाणी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी शनिवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
याप्रसंगी वाणी यांच्यासह नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील बोरनारे, माजी जिल्हा परिषद सदस्य अभय पाटील चिकटगावकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नबी पटेल तिडीकर यांच्या शिष्टमंडळाने उपविभागिय अधिकारी डॉ. संदीपान सानप, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, सहायक पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांच्याशी चर्चा करुन निवेदन दिले.
शनिवारी पानव, जरुळ, चांडगाव, भायगाव, रोटेगाव आदी भागातील शेकडो नागरिक वाणी यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर पुतळ्याजवळ जमा झाले व त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून निवेदन दिले. याप्रसंगी बाबासाहेब जगताप, चंद्रकांत कटारे, प्रकाश मतसागर, साईनाथ मतसागर, नंदकिशोर जाधव, धीरजसिंह राजपूत, मंजाहरी गाढे, मोहन साळुंके, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, एराज शेख, दिपकसिंग राजपूत, अ‍ॅड. प्रताप निंबाळकर, अ‍ॅड. नानासाहेब जगताप, दिगंबर मतसागर, दिनकर कुहिले, सागर गायकवाड, अरविंद शेवाळे, अमोल बावचे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.
पोलिसांची कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी
वैजापूर पोलिसांनी शुक्रवारपासून चांडगाव व नांदगाव शिवारातील नागरिकांची धरपकड सुरू केल्याचे तीव्र पडसाद शनिवारी उमटले. पोलिसांची ही कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असल्याची टीका सर्वपक्षीय नेत्यांनी केली. ग्रामीण भागात नागरिक दहशतीखाली आहेत.
निष्पाप लोकांवर कारवाई होणार नाही, असे उपविभागीय पोलीस अधिकारी लांजेवार यांनी सांगितले.
शनिवारी अटक केलेल्या आठ जणांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेत मयत झालेल्या दोघांच्या कुटुंबियांनी मृतदेह नेण्यासाठी चोवीस तास उलटूनही पोलिसांशी संपर्क साधला नाही किंवा तक्रार केली नाही. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title:  Eight people arrested on the death of thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.