‘घाटी’ची विश्वासार्हता टिकवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील - सहसंचालक तात्याराव लहाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 06:29 PM2018-05-26T18:29:14+5:302018-05-26T18:32:09+5:30

रुग्णालय सध्या काही अडचणींना तोंड देत आहे. परंतु घाटीची विश्वासार्हता टिकली पाहिजे. त्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी शुक्रवारी (दि.२५) पत्रकार परिषदेत सांगितले.

Efforts will be made to maintain the 'Ghati Hospitals' credibility - Joint director Tatyarao Lahane | ‘घाटी’ची विश्वासार्हता टिकवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील - सहसंचालक तात्याराव लहाने

‘घाटी’ची विश्वासार्हता टिकवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील - सहसंचालक तात्याराव लहाने

googlenewsNext

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) हे एक शासकीय महाविद्यालय, शासकीय रुग्णालय आहे. गोरगरीब रुग्णांना त्याचा आधार मिळतो. घाटी रुग्णालयाची विश्वासार्हता कमी झाली तर खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ गोरगरिबांवर येईल. रुग्णालय सध्या काही अडचणींना तोंड देत आहे. परंतु घाटीची विश्वासार्हता टिकली पाहिजे. त्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी शुक्रवारी (दि.२५) पत्रकार परिषदेत सांगितले.

डॉ. लहाने यांनी घाटी रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत संवाद साधला. राज्यभरातील १६ वैद्यकीय महाविद्यालयांना ते भेटी देत असून, येथील विविध विभागांमधील अडचणी काय आहेत, याची माहिती शासनाला दिली जाणार आहे. घाटीतील नवीन वसतिगृह आणि ग्रंथालयास फर्निचर मिळण्याची प्रतीक्षा आहे. निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु अटींच्या पूर्ततेअभावी फेरनिविदा मागविण्यात येणार आहे. लवकरच फर्निचर प्राप्त होईल, असे ते म्हणाले.

घाटी रुग्णालय हे सेकंडरी, टर्शरी केअरसाठी आहे. प्राथमिक उपचाराची जबाबदारी ही जिल्हा सामान्य रुग्णालय, शहरी आणि ग्रामीण आरोग्य केंद्रांवर आहे. डॉक्टर, कर्मचारी चांगली सेवा देत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने उभारण्यात येणाऱ्या स्वतंत्र सुपर स्पेशालिटी विभागाचे काम पूर्ण होऊन तीन महिन्यांत त्याचे हस्तांतर होईल. त्यानंतर ३० कोटींची यंत्रसामुग्री मिळणार आहे.

पुढील वर्षांपर्यंत याठिकाणी विविध आठ विभाग कार्यान्वित केले जातील, असे डॉ. लहाने यांनी सांगितले. घाटीला २० व्हेंटिलेटरची गरज आहे. औषधी, अपुरे व्हेंटिलेटर, अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्थितीची तात्काळ दखल घेऊन संचालकांना माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णाला स्ट्रेचरवरून वॉर्डात दाखल करण्याची जबाबदारी ही कर्मचाऱ्यांची आहे; परंतु नातेवाईकच स्ट्रेचरवरून रुग्णाला हलवितात. याविषयी डॉ. लहाने म्हणाले, रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. परंतु ही कर्मचाऱ्यांचीच जबाबदारी आहे. ती त्यांनी पार पाडली पाहिजे. आगामी वर्षात वैद्यकीय शिक्षणात डॉक्टर-रुग्ण नाते यासंदर्भातील संवाद कौशल्य अभ्यासक्रमाचा समावेश केला जाणार आहे.  

राजेंद्र दर्डा यांच्या पोस्टची दखल
घाटी रुग्णालयाच्या दुरवस्थेसंदर्भात ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी ११ मे रोजी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टने वैद्यकीय व आरोग्य सेवा क्षेत्रातील सर्वांचेच लक्ष वेधले.फेसबुकवरील या पोस्टची दखल घेऊन डॉ. तात्याराव लहाने यांनी सोलापूर येथे छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयातील सुविधांच्या पाहणीप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना पुढील आठवड्यात ‘घाटी’ची पाहणी करून रुग्णालयाच्या दुरवस्थेची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. यानंतर डॉ. लहाने यांनी शुक्रवारी घाटीची पाहणी करून अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध सूचना केल्या.


दीड महिन्यात सगळी औषधी
आतापर्यंत पुणे, सोलापूर, कोल्हापूर, मिरज महाविद्यालयांना भेट दिली. सगळीकडे औषधांचा तुटवडा आहे. हाफकीन मंडळातर्फे औषधी खरेदी करण्यात येणार आहे. १ जून रोजी ४० औषधींची दर निविदा (रेट कॉन्ट्रॅक्ट) होणार आहे. त्यानंतर दीड महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये सगळी औषधी उपलब्ध होईल. अत्यावश्यक औषधी दोन दिवसांत मिळतील. यंत्रसामुग्रीची प्रक्रियाही शेवटच्या टप्प्यात आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Efforts will be made to maintain the 'Ghati Hospitals' credibility - Joint director Tatyarao Lahane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.