औरंगाबादमध्ये आता ‘ई-नाम’; ओरडून हर्राशी करणे झाले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 03:05 PM2018-03-14T15:05:39+5:302018-03-14T15:06:17+5:30

जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्याच्या अडत बाजारात ‘ओरडून हर्राशी’ करणे बंद झाले आहे.

'E-name' in Aurangabad; The voice was stopped | औरंगाबादमध्ये आता ‘ई-नाम’; ओरडून हर्राशी करणे झाले बंद

औरंगाबादमध्ये आता ‘ई-नाम’; ओरडून हर्राशी करणे झाले बंद

googlenewsNext

औरंगाबाद : जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्याच्या अडत बाजारात ‘ओरडून हर्राशी’ करणे बंद झाले आहे. मागील दोन दिवसांपासून ‘ई-नाम’ या इलेक्ट्रॉनिक्स व्यापार पोर्टलद्वारे ‘ई-आॅक्शन’ करण्यात येत आहे. मंगळवारी दुसर्‍या दिवशी २७७ क्विंटलपैकी १४३ क्विंटल धान्याची विक्री झाली. मात्र, नवीन प्रणाली असल्याने पोर्टल हँग होण्याचा प्रकार अधूनमधून होत आहे. ‘ई-आॅक्शन’ सुरळीत होण्यास निश्चितच आठवडाभराचा अवधी लागणार आहे. यामुळे  खरेदीदार व शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाची स्थिती राहील. 

राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये होणारे रोखीचे व्यवहार बंद करून सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यासाठी, शेतकर्‍यांची होणारी लूट थांबून त्यांच्या शेतीमालास जास्तीत जास्त भाव मिळावा, या हेतूने ‘ई-नाम’प्रणाली केंद्र सरकारने लागू केली आहे. जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारपासून प्रत्यक्षात ‘ई-आॅक्शन’ला सुरुवात झाली. आता बाजार समितीच्या गेटवर नोंदणी केली जाते. त्यानंतर सर्व माल सेल हॉल क्र. २ मध्ये उतरविण्यात येतो. येथे शेतमालाची गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेमध्ये गुणवत्ता तपासली जाते. यानंतर ‘ई-आॅक्शन’ला सुरुवात होते.

मंगळवारी २७७ क्विंटल पैकी १४३ क्विंटल धान्याची विक्री झाली. आता ओरडून हर्राशीऐवजी प्रत्येक  खरेदीदाराच्या हातात मोबाईल असतो व मोबाईलवरच ई-आॅक्शन केले जात आहे. सर्वात जास्त किंमत आल्यावर शेतकर्‍यास विक्री व्यवहार करायचा की नाही, हे विचारले जाते. संबंधिताची संमती असेल तरच शेतीमालाची विक्री होते. नसता दुसर्‍या दिवशी पुन्हा त्या शेतीमालाचे ‘ई-आॅक्शन’ केले जाते. प्रणाली नवीन असल्याने कृउबा कर्मचारी व खरेदीदारांना थोडे अवघड जात आहे. त्यात पोर्टल हँग होत असल्याने ई-आॅक्शनला वेळ लागत आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ यांनी सांगितले की, प्रणाली सुरळीत होण्यास आठवडाभराचा कालावधी लागेल. या ई-आॅक्शनमध्ये शेतकरी व खरेदीदारांना काही अडचणी येत असतील, तर बाजार समिती संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. येत्या काही दिवसांत ई-आॅक्शन सर्वांना दिसावे यासाठी मोठा स्क्रीन बसविण्यात येणार आहे.

ई-आॅक्शन करा; पण अडत्याच्या दुकानासमोर 
‘ई-नाम’ला व्यापार्‍यांचा विरोध नाही. मात्र, ई-आॅक्शन अडत्याच्या दुकानासमोर करण्यात यावे. जाधववाडीतच सर्व माल एका हॉलमध्ये उतरवून तिथे ई-आॅक्शन केले जाते. परिस्थिती अशीच राहिल्यास अडते व त्यांच्यावर अवलंबून कर्मचारी, हमाल सर्व बेरोजगार होतील. 
-हरीश पवार, अडत व्यापारी, जाधववाडी

अडते खरेदी परवाने कृउबाला करणार परत 
आॅनलाईन व्यवहारात शेतकरीच नव्हे, तर खरेदीदारांनाही आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्यातील अन्य बाजार समितीत ‘ई-नाम’ सुरू झाले नाही. यामुळे शेतकरी शेतीमाल तिकडे नेत आहेत. याचा फटका येथील अडते व खरेदीदारांना बसत आहे. शुक्रवारी सर्व अडते आपल्याकडील खरेदी-विक्रीचे परवाने कृउबाला परत देणार आहेत. 
-कन्हैयालाल जैस्वाल, अध्यक्ष, अडत व्यापारी संघटना

हमालांवर बेकारीचे संकट 
अडत्याच्या दुकानाऐवजी शेतीमाल एकाच हॉलमध्ये उतरवून घेतला जात आहे. याचा फटका हमालांनाही बसला आहे. धान्याच्या अडत बाजारात १२५ हमाल व महिला कामगार आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अडत दुकानावरच ई-आॅक्शन व्हावे, यासाठी बुधवारी कृउबाच्या सभापतींना निवेदन देण्यात येणार आहे.
-देवीदास कीर्तिशाही, सचिव, मराठवाडा लेबर युनियन

बाजरीला वाजवी भाव 
९ पोते बाजरी विक्रीला आणली ‘ई-लिलावात’ १००५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. थोडी भिजलेली बाजारी होती. वाजवी भाव मिळाला. अडत्याकडे क्विंटलमागे १५ किलो बाजरीचे नुकसान होत असे व अडतही कापल्या जात होती. ‘ई-नाम’मध्ये शेतकर्‍याचा फायदा आहे. 
-परमेश्वर पठाडे, शेतकरी, वरझडी

शेतकर्‍यांनी भूलथापांना बळी पडू नये
ई-नाम योजना शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी आहे. मात्र, काही व्यापारी शेतकर्‍यांना संभ्रमित करीत आहेत. कमी भाव मिळेल, असे सांगून त्यांची दिशाभूल करीत आहेत. शेतकर्‍यांनी भूलथापांना बळी पडू नये व शेतीमाल कृउबात विक्रीसाठी आणावा. 
-राधाकिसन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

Web Title: 'E-name' in Aurangabad; The voice was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.