औरंगाबाद बाजार समितीमध्ये येत्या सोमवारपासून धान्याचा ई-लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 07:38 PM2018-03-07T19:38:34+5:302018-03-07T19:40:02+5:30

शेतीमालास चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘ई-नाम’ची अंमलबजावणी जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झाली आहे.

E-auction of grains from Aurangabad market committee on Monday | औरंगाबाद बाजार समितीमध्ये येत्या सोमवारपासून धान्याचा ई-लिलाव

औरंगाबाद बाजार समितीमध्ये येत्या सोमवारपासून धान्याचा ई-लिलाव

googlenewsNext

औरंगाबाद : शेतीमालास चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘ई-नाम’ची अंमलबजावणी जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झाली आहे. या अंतर्गत येत्या सोमवार, १२ मार्चपासून प्रत्यक्षात धान्याचा ई-लिलाव (हर्राशी)ला सुरुवात होणार आहे. अडत्याने किंवा खरेदीदाराने परस्पर शेतीमाल खरेदी केला, तर कारवाई करण्यात येणार आहे. 

केंद्र शासनाची राष्ट्रीय कृषी बाजार योजना राबविण्यासाठी राज्यातील ६० बाजार समित्यांची निवड करण्यात आली आहे. यात पहिल्या ३० मध्ये जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश करण्यात आला आहे. शेतकर्‍यांनी आणलेल्या शेतीमाल खरेदीत स्पर्धा निर्माण व्हावी, शेतीमाल खरेदी केल्यावर लगेच संबंधित  शेतकर्‍याच्या बँक खात्यात सर्व रक्कम जमा व्हावी, या उद्देशाने ‘ई-नाम’ योजना सुरू करण्यात आली आहे.

जाधववाडीतील बाजार समितीमध्ये यासाठी खास टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आली आहे. मागील दोन ते तीन आठवड्यांपासून येथील प्रशिक्षित कर्मचार्‍यांनी धान्य, कडधान्याची तपासणी करणे, ग्रेडिंग करणे व ई-नाम पोर्टलवर त्यांची माहिती अपलोड करण्याचे काम केले. आता प्रत्यक्षात ई-लिलाव करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतेच बाजार समितीने सर्व अडते व खरेदीदारांना ‘परिपत्रक’ पाठविले आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी सांगितले की, १२ मार्चपासून बाजार समितीतील धान्याच्या अडत बाजारात येणार्‍या प्रत्येक शेतीमाल व शेतकर्‍याची नोंद करण्यात येणार आहे. यानंतर सर्व शेतकर्‍यांच्या शेतीमालाने भरलेल्या गाड्या सेल हॉल क्र. २ येथे आणण्यात येतील. येथेच ई-लॅब असणार आहे. तिथेच धान्याचे नमुने घेऊन त्याचे ग्रेडिंग करण्यात येईल व माहिती ई-नाम पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. त्यानुसार खरेदीदारांना ई-लिलावाद्वारे शेतीमाल खरेदी करावा लागेल. तोंडी हर्राशी सोमवारपासून बंद होणार आहे. ज्यांच्या बँक खात्यात जेवढी रक्कम असेल तेवढ्याच किमतीचा शेतीमाल खरेदीची मुभा देण्यात येईल. माल खरेदी करताच खरेदीदारांच्या खात्यातून रक्कम शेतकर्‍याच्या बँक खात्यात जमा केली जाईल. परस्पर शेतीमाल खरेदी करताना कोणी आढळून आले तर त्या खरेदीदारावर कारवाई करण्यात येईल. 

अडत्या, खरेदीदारांची बैठक 
‘ई-नाम’चे परिपत्रक मिळताच मंगळवारी औरंगाबाद अडत व्यापारी संघटनेची तातडीची बैठक जाधववाडीत पार पडली. ई-नाममध्ये अडत्यांना कोणतेच स्थान नसल्याने अडत्यांनी काय करावे, असा संतप्त सवाल यावेळी व्यक्त करण्यात आला. ई-नाम लागू करण्यात अनेक अडचणी आहेत. यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. शेतकर्‍यांनी आणलेला शेतीमाल अडत्याकडेच उतरविण्यात यावा, तिथेच हर्राशी करण्यात यावी, आदी सूचना यावेळी मांडण्यात आल्या. यासंदर्भात बाजार समितीला अडत्या व खरेदीदारांतर्फे  निवेदन देण्यात येणार आहे. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल, दिलीप गांधी, हरीश पवार, मधुकर निकम, राजेंद्र बादशहा, कैलास निकम, विजय पांडे, मुकेश गंगवाल, जुगलकिशोर दायमा आदींची उपस्थिती होती. 

Web Title: E-auction of grains from Aurangabad market committee on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी