लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्याला जलसंपदाचे स्वतंत्र कार्यालय व मनुष्यबळ नसल्याने कायम परावलंबी राहावे लागत होते. कार्यकारी अभियंत्यांसह उपविभाग मंजूर झाल्यानंतरही पुन्हा तेच चित्र निर्माण झाले असून काही कार्यालये तर कुलूपबंदच राहात आहेत.
हिंगोली येथे लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालय आले. मात्र कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता व इतर तांत्रिक पदे रिक्त आहेत. केवळ कारकुनी कर्मचारी हजर असतात. त्यापैकीही काही या अनागोंदीचा फायदा घेण्यात यशस्वी होत आहेत. हिंगोली उपविभागाच्या अधिकाºयांकडेच हा सर्व पदभार आहे. त्यांच्याकडे हा विभाग अतिरिक्त पदभाराचा असल्याने आपले काम सांभाळून ते सोयीनुसार या कार्यालयाचा कारभार पाहतात. बैठका व इतर महत्त्वपूर्ण बाबी वगळता त्यांनाही वेगळ देणे शक्य नाही. तर नवीन कोणतीच कामे नसल्याने येथे कोणी इतर अधिकारी यायला तयार नाही. अनुशेष मंजूर झाल्याशिवाय कोणी येईल, याचीही सुतराम शक्यता नाही. मात्र तूर्त तरी हे कार्यालय अधून-मधून गजबजलेले व कायम ओसच पडलेले पहायला मिळते. या कार्यालयाचे इतर उपविभाग तर कुलूपबंदच असतात.
या विभागात कार्यकारी अभियंता-१, उपकार्यकारी अभियंता -१, उपविभागीय अभियंता-३, कनिष्ठ व शाखा अभियंता-१८, लेखापाल-१, आरेखक-१, सहायक आरेखक-१, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक- १२, अनुरेखक ३, वरिष्ठ लिपिक-५, कनिष्ठ लिपिक-१0, टंकलेखक ६, वाहनचालक ५, शिपाई ९ अशी एकूण ८४ पदे जिल्हाभरातील कार्यालयांत रिक्त आहेत. तर केवळ ४0 जणांवर या विभागाचा कारभार चालत आहे. त्यातच तीन उपविभाग व विभागाला प्रमुख अधिकाºयांचीच पदे रिक्त असल्याने कुलूपबंद राहिल्यास कोणी लक्ष देण्यासही तयार नाही. त्यामुळे या कार्यालयाकडे लक्ष देण्यासाठी आधी त्यांना विविध कामांना निधी मंजूर करून देणे गरजेचे आहे. तसे झाल्यास येथे येण्यास अधिकारीही उत्सुक राहतील, असे चित्र आहे.