Drought In Marathwada : दुष्काळाची दाहकता सांगताना पालकमंत्र्यासमोर ढसढसा रडला बळीराजा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 05:19 PM2018-10-17T17:19:49+5:302018-10-17T17:26:57+5:30

मायबाप सरकारने भरपूर मदत द्यावी, अशी कळकळीची मागणी या शेतकऱ्याने यावेळी केली.

Drought in Marathwada: While speaking about drought, the farmer crying loudly before the guardian minister | Drought In Marathwada : दुष्काळाची दाहकता सांगताना पालकमंत्र्यासमोर ढसढसा रडला बळीराजा 

Drought In Marathwada : दुष्काळाची दाहकता सांगताना पालकमंत्र्यासमोर ढसढसा रडला बळीराजा 

googlenewsNext

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यात दुष्काळ दौऱ्याची पाहणी सुरू असताना गेवराई सेमी येथील शेतकऱ्याने पालकमंत्री दिपक सावंत यांच्या गळ्यात पडून अक्षरश : हंबरडा फोडला. दुष्काळी परिस्थितीत कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, याचे कथन या बळीराजाने केले. यावेळी उपस्थित सर्वांनाच गहिवरून आले. मायबाप सरकारने भरपूर मदत द्यावी, अशी कळकळीची मागणी या शेतकऱ्याने यावेळी केली.

राज्य शासनाने सिल्लोड तालुक्यातील निल्लोड मंडळात सर्वात कमी ३७ टक्के  पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, तालुक्यात केवळ ३४१ मि.मी. पाऊस झाला आहे. यामुळे भीषण दुष्काळाची दाहकता बघून आतापासूनच शेतकऱ्यांच्या जीवाचा थरकाप होऊ लागला आहे. त्यांचे अवसान गळाले आहे. या भयावह दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज पालकमंत्री दीपक सावंत निल्लोड महसुल मंडळातील गेवराई सेमी येथे आले होते.

पालकमंत्री सावंत यांनी विविध गावांना भेटी देऊन पावसाअभावी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी निल्लोड महसुल मंडळातील गेवराई सेमी येथे आले असता येथील गट क्रंमाक १६८ मधील दुष्काळी शेत शिवार पाहणी करत असताना नागोराव ताठे हे शेतकरी अक्षरश : पालकमंत्र्याच्या गळ्यातपडून  ढसढसा रडले. या शेतकऱ्याने दुष्काळ परिस्थितीमुळे कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो. याचा पाढाच वाचला. यामुळे उपस्थित सर्वांनाच गहिवरून आले.

पावसाअभावी सर्वच पिके हातातून गेली. पिण्याच्या पाण्यासाठी वनवण भटकावे लागत आहे. जनावरांसाठी चाराच न राहिल्याने कवडीमोल भावात पशुधन विकावे लागत आहे. हाताला काम नसल्याने अर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे मायबाप सरकारने शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने भरपाई म्हणून एकरी २५ हजार रुपये द्यावे, अशी मागणी यावेळी या शेतकऱ्याने केली.

विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी येथील कपाशी, मका या पिकांची पाहणी करून पुढील दौऱ्याकडे आपला मोर्चा वळवताना शेतकऱ्यांना कुठलेही ठोस आश्वासन दिले नाही. त्यामुळे हताश होऊनच सर्व शेतकरी आपापल्या शेतवस्तीकडे परतले. सरकारने पाठविलेल्या पालकमंत्र्यांनी आमचे नुसते आसु पुसले. मात्र, आम्ही केलेल्या त्या मागण्या संदर्भात काहीच उत्तर दिले नाही, याचा खेद वाटतो, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

दरम्यान, पालकमंत्री दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा, बाभुळगाव, वरखेडी, भायगाव, निल्लोड परिसरातील मोठ्या संख्यने शेतकरी एकत्र आले होते. पालकमंत्री आपल्या मागण्यांकडे लक्ष देतील, अशी सर्वांना आश होती. मात्र, गेवराई सेमी येथे शेतकऱ्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांबद्दल कुठलेही ठोस उत्तर न मिळाल्याने शेतकरी निराश होऊन घरी परतले. 

Web Title: Drought in Marathwada: While speaking about drought, the farmer crying loudly before the guardian minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.