डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंची चौकशी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:19 AM2018-05-22T00:19:37+5:302018-05-22T00:23:07+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळातील कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची अनियमितता, नेमणुकांमधील गोंधळाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना राज्य सरकारने केली होती. विद्यापीठात ही समिती सोमवारी (दि.२१) दाखल झाली. या समितीमुळे प्रशासकीय इमारतीत निरव शांतता होती.

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Vice-Chancellor inquired | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंची चौकशी सुरु

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंची चौकशी सुरु

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यापीठ : समिती दाखल; बेकायदा नेमणुका, आर्थिक भ्रष्टाचाराचा होणार पर्दाफाश

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळातील कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची अनियमितता, नेमणुकांमधील गोंधळाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना राज्य सरकारने केली होती. विद्यापीठात ही समिती सोमवारी (दि.२१) दाखल झाली. या समितीमुळे प्रशासकीय इमारतीत निरव शांतता होती.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याविरोधात राज्यपाल कार्यालय आणि विधिमंडळात लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीवरून उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी २८ मार्च रोजी उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती. यासाठी माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.
परंतु कुलगुरूची चौकशी करण्यासाठीचे पत्र डॉ. पाटील यांना खूप उशिरा मिळाले. राज्य सरकारने डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीत जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी. बी. पाटील आणि नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कथलाकुट्टे हे सदस्य आहेत. ही त्रिसदस्यीय समिती विद्यापीठात सोमवारी (दि.२१) पहिल्यांदाच दाखल झाली. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्या अ‍ॅन्टीचेंबरमध्ये समितीचे सदस्य बसले होते. त्याठिकाणीच त्यांनी चौकशीसाठी लागणाऱ्या सुविधा, कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यानुसार विद्यापीठ प्रशासनाला समितीला सर्व प्रकारची मदत करावी लागणार आहे.
आमचेही म्हणणे ऐकून घ्या
विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. भाऊसाहेब राजळे आणि विद्यापरिषद सदस्य डॉ. विलास खंदारे यांनी समिती अध्यक्षांना चौकशीदरम्यान बाजू मांडण्यासाठी वेळ देण्याची विनंती निवेदनाद्वारे केली. मराठवाडा विकास कृती समितीचे डॉ. दिगंबर गंगावणे, अ‍ॅड. शिरीष कांबळे आदींनी हीच मागणी केली.
विद्यापीठ देणार तीन अधिकारी व कर्मचारी
विद्यापीठ प्रशासन उपकुलसचिव व इतर दोन कर्मचारी समितीच्या मदतीला देणार आहे. तसेच समितीच्या सदस्यांसाठी संगणक, प्रिंटर आदी साहित्यही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. साधना पांडे यांनी दिली.

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Vice-Chancellor inquired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.