लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात दोन महिन्यांपासून फैलावलेले तापी, डेंग्यूचे आजार ग्रामीण भागात नियंत्रणात येत असल्याचे दिसत असून, बीडमध्ये मात्र अद्यापही डेंग्यू ‘अनकंट्रोल’ असल्याचे चित्र खाजगी रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्ण संख्येवरुन दिसून येत आहे. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी आठवडाभरापूर्वी न. प. ला ताकिद दिल्यानंतरही डेंग्यूचा मुक्काम लांबतो आहे.
नियमित पाणीपुरवठ्याची सोय नसल्याने करण्यात येणारे साठे, डबके, कच-यांच्या ढिगा-यांवर होणारी डासांची पैदास यामुळे ताप आणि डेंग्यूच्या रुग्णात भर पडली. जिल्हा आरोग्य विभागही खडबडून जागा झाला. सर्वेक्षण सुरु केले. जास्त रुग्ण आढळणा-या गावांत उद्रेकस्थिती लक्षात घेत उपाययोजना केल्या. स्वच्छतेसह पाण्याचे साठे नष्ट करण्यात आले. अबेटींग, धुरळणी करण्यात आली. दरम्यान बीड शहरात कच-याची विल्हेवाट लावण्यात नगर पालिका अपयशी ठरली. त्यामुळे अनेक दिवस शहरातील रस्त्यांवर गटारीलगत कचºयांचे ढीग होते. ग्रामीण भागातील ताप, डेंग्यूचे लोण बीडमध्ये पसरले. शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. मागील आठवड्यात बैठकीत बीड शहरातील साथरोग स्थितीचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. त्यानंतर शहरात स्वच्छतेच्या कामांना वेग आला. मात्र नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही शहरातील रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या पाहता डेंग्यूचा मुक्काम सुरुच असल्याचे दिसून आले.