इलियास शेख, कळमनुरी
संपूर्र्ण जिल्ह्याच्या राजकीय नेतेमंडळीचे लक्ष लागलेल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघात यावेळी प्रमुख राजकीय पक्षांकडून कोणाला उमेदवारी मिळेल, याविषयीची उत्सुकता वाढली आहे.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे राजीव सातव यांनी शिवसेनेचे गजाननराव घुगे यांचा पराभव केला होता. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घुगे यांनी तालुक्यातून १२ पैकी ११ जिल्हा परिषद सदस्य निवडून आणून पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केल्याचे दाखवून दिले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव सातव यांनी या मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे त्यांना तब्बल २० हजार ८८ मतांची निर्णायक आघाडी मिळाली. त्यामुळे पुन्हा एकदा या मतदारसंघाच्या मतांचा दोलक काँग्रेसच्या बाजूने झुकल्याचे दिसून आले. राजीव सातव आता खासदार झाल्याने काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळवू पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये आदिवासी युवक कल्याण संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. संतोष टारफे, माजी शिक्षण सभापती संजय बोंढारे, दिलीप देसाई, बाबा नाईक, जकी कुरेशी यांचा समावेश आहे. असे असले तरी काँग्रेसचा उमेदवार कोण? हे शेवटी राजीव सातव हेच ठरविणार आहेत.
दुसरीकडे शिवसेनेकडून पुन्हा एकदा माजी आ. गजाननराव घुगे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत कळमनुरी विधानसभेतून काँग्रेसला आघाडी मिळाली. यावरून घुगे यांना शिवसेनेतील अन्य काही नेत्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. परंतु घुगे यांच्या समर्थकांनी काही दिवसापूर्वीच प्रसिद्धीपत्रक काढून संबंधितांच्या आरोपांना उत्तर दिले. असे असले तरी घुगे यांनी त्यांच्या गावातून शिवसेनेला आघाडी मिळवून दिली, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. घुगे यांच्या व्यतिरिक्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, चंद्रकांत देशमुख, राजेश्वर पतंगे हेही उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खा. शिवाजी माने यांनीही काही दिवसांपूर्वी या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी सुरू असल्याचे खासगीमध्ये बोलताना सांगितले होते. मध्येच अ‍ॅड. माने शिवसेनेत जाणार, अशीही अफवा फसरविली गेली. लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. माने यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचा प्रचार केला. त्यामुळे या अफवेला काहीसे बळही मिळाले होते; परंतु माने यांनी नंतर राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले होते. याशिवाय मनसे, भारिप बहुजन महासंघ, बसपा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आदींचे उमेदवारही ऐनवेळी जाहीर होणार आहेत. असे असले तरी उत्सुकता मात्र काँग्रेस, शिवसेना आणि अ‍ॅड. शिवाजी माने यांच्या उमेदवारीविषयी मतदारांना लागली आहे.
काँग्रेसराजीव सातव ६७,८०४
शिवसेनागजानन घुगे ५९,५७७
बसपासंतोष टारफे २५,८९३
इच्छुकांचे नाव पक्ष
गजानन घुगे शिवसेना
चंद्रकांत देशमुखशिवसेना
राजेश्वर पतंगेशिवसेना
संतोष बांगरशिवसेना
डॉ. संतोष टारफेकाँग्रेस
दिलीप देसाईकाँग्रेस
बाबा नाईककाँग्रेस
संजय बोंढारेकाँग्रेस
जकी कुरेशीकाँग्रेस
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीरिपा आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांना २०,०८८ एवढे मताधिक्य मिळाले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.